Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाशिकचे काळाराम मंदिर

वेबदुनिया
दक्षिण काशी असलेल्या नाशिकमध्ये प्रभू रामचंद्रांचे वास्तव्य काही काळ होते. रामचंद्रांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे. त्याची पदचिन्हे अनेक मंदिरांच्या रूपाने आजही नाशिकमध्ये दिसतात. नाशिकचे काळाराम मंदिर हे त्यातीलच एक. प्रसिद्ध पंचवटीतच हे मंदिर वसले आहे.

WD
नाशिकमध्ये रामाची मंदिरे तशी खूप. काळाराम, गोरा राम, मुठ्यांचा राम, बायकांचा राम. पण या सगळ्यात काळारामाचे वैशिष्ट् काही आगळेच. हे मंदिर ऐतिहासिकदृष्ट्या जुने तर आहेच. पण त्याची बांधणीही काही खास आहे. शिवाय या मंदिराला सामाजिक इतिहासही लाभला आहे.

पेशव्यांचे सरदार रंगराव ओढेकर यांनी हे मंदिर १७८२ मध्ये बांधले. मंदिराची संपूर्ण बांधणी काळ्या पाषाणात असून बांधकामाची शैली नागर आहे. मंदिरातील श्रीरामाची मूर्तीही काळ्या दगडातीलच आहे. म्हणूनच त्याला काळाराम असे म्हणतात.

WD
संपूर्ण मंदिर ७४ मीटर लांब व ३२ मीटर रूंद आहे. मंदिराला चार दिशांना चार दरवाजे आहेत. पूर्व महाद्वारातून प्रवेश केल्यानंतर भव्य सभामंडप लागतो. त्याची उंची बारा फूट आहे. त्यात चाळीस खांब असून तेथे असलेला मारूती समोरच्या मंदिरातील श्रीरामाच्या चरणी पाहतो, असा भाव आहे. सभामंडपाच्या बाजूला तीस फूट उंचीवर नगारखाना आहे.

मंदिराचे गर्भगृह काटकोनी असून त्यावरची नक्षीही सुंदर आहे. मंदिराची कळसापर्यंतची उंची ६९ फूट आहे. कळस ३२ टनी शुद्ध सोन्याचा आहे. या मंदिराला मोठा कोटही आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराला तीन दालने आहेत. तिसर्‍या दालनात मंदिराचा गाभारा आहे. तिथे श्रीराम, लक्ष्मण व सीता यांची मूर्ती आहे.

मंदिराला १७ फूट उंचीचा चिरेबंदी कोट आहे. त्याच्या चारही बाजूला ओवर्‍या आहेत. या मंदिराची बांधणी अशी काही आहे, की एकावर दुसरा पाषाण रचून त्याचे संतुलन साधण्यात आले आहे. पाषाण जोडण्यासाठी सिमेंट किंवा चुन्याचा वापर केलेला नाही. तर खोबणीद्वारे दगड एकमेकांत अडकवले आहेत. त्यामुळेच मंदिराचे स्थापत्य आगळे वेगळे ठरते.

WD
हे राममंदिर प्राचीन पर्णकुटीच्या जागेवर असल्याचे बोलले जाते. तिथे आधी नागपंथीय साधू रहात. मंदिरालगत भैरवनाथ व गोरक्षनाथांचे मंदिरही आहे. काही नागपंथी साधूंना अरूणा-वरूणा नद्यांच्या संगमावर या मूर्ती सापडल्या आणि त्यांनी लाकडी मंदिर बांधले. पुढे १७८० मध्ये माधवराव पेशव्यांच्या मातोश्री गोपिकाबाई यांनी सरदार रंगराव ओढेकरांना हे मंदिर बांधण्याची सूचना केली. १७९० मध्ये मंदिर बांधून पूर्ण झाले. त्याकाळी या बांधकामासाठी २३ लाखाचा खर्च आला.

या मंदिरात पूर्वी दलितांना प्रवेश नव्हता. त्यामुळे त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली मोठा लढा उभारण्यात आला. बरीच वर्षे लढा चालूनही त्याला यश आले नाही. अखेर याच घटनेने विदग्ध होऊन डॉ. आंबेडकरांनी येवला येथे हिंदू धर्मात जन्माला आलो तरी मरणार नाही, अशी घोषणा केली. पुढे या मंदिरात दलितानाही प्रवेश देण्यात आला. या लढ्याला काही वर्षांपूर्वीच ७५ वर्षे पूर्ण झाली. त्यावेळी मंदिराच्या पुजार्‍यांच्या आजच्या पिढीतल्या प्रतिनिधींनी दलित भाविकांना सन्मानाने मंदिरात प्रवेश देऊन त्यांच्या हस्ते पूजा बांधली. ७५ वर्षात हे सामाजिक स्थित्यंतर त्या घटनेने घडले.

WD
बघण्यासारखे इतर काही
याच मंदिराच्या परिसरात प्रसिद्ध सीतागुंफा आहेत. येथेच सीतेने साधना केल्याचे बोलले जाते. पंचवटी हे नाव ज्यामुळे पडले ते पाच प्रसिद्ध वटवृक्षही याच परिसरात आहेत. मंदिरापासूनच जवळच गोदावरी नदी वाहते. प्रसिद्ध रामकुंडही तेथेच आहे. शिवाय इतर मंदिरेही याच परिसरात आहेत.

कसे जाल?

रस्ता- नाशिक मुंबईहून १६० किलोमीटर व पु्ण्याहून २१० किलोमीटरवर आहे. मुंबई-आग्रा महामार्ग नाशिकमधूनच जातो.
रेल्वे- नाशिक मध्य रेल्वेवरील महत्त्वाचे स्टेशन आहे. मध्य रेल्वेच्या मुंबईकडे जाणार्‍या जवळपास सर्व गाड्या नाशिकमधूनच जातात.
हवाई मार्ग- नाशिकला आता हवाई वाहतूकही होते. किंगफिशरद्वारे मुंबई ते नाशिक हवाई वाहतूक केली जाते.

शनिवार : वारांचे उपवास आणि व्रत कैवल्य

Diwali Padwa Wishes 2024 दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा

दिवाळी लक्ष्मीपूजन आरती

भारतातील पाच प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिर

घरात लक्ष्मी पूजन कसे करावे? योग्य पद्धत Diwali Laxmi Puja in Marathi

अनेक महिने खराब होणार नाही मिठाई, या सोप्या टिप्स अवलंबवा

Healthcare Tips : दिवाळीच्या काळात दमा रुग्णांनी आरोग्याची काळजी घेण्यासाठी टिप्स

आर्थिक संकटातून सुटका हवी असेल तर दिवाळीत हे नक्की खरेदी करा

दिवाळीचे साप्ताहिक राशिभविष्य, जाणून घ्या या आठवड्यात कोणत्या राशींवर देवी लक्ष्मीची कृपा असेल 28 ऑक्टोबर ते 03 नोव्हेंबर 2024

दिवाळीत या जीवांना पाहणे शुभ मानले जाते, जाणून घ्या काय महत्त्व

Show comments