धर्मयात्रेच्या या भागात आम्ही आपल्याला प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणार्या खान्देशातील शेंदुर्णीला घेऊन जात आहोत. येथील त्रिविक्रम मंदिराला मोठी पार्श्वभूमी आहे. श्री संत कडोजी महाराज शेंदूर्णी या पावन नगरीत वास्तव्यास होते. शिवकालीन श्री त्रिविक्रम मंदिराची स्थापना कडोजी महाराजांच्या हस्ते 1744 मध्ये झाली.
कार्तिक शुध्द एकादशीला रथोत्सवात हरिनामाच्या गजराने अवघी शेंदुर्णी नगरी दुमदुमून जात असते.
WD
या मंदिराच्या स्थापनेमागेही आख्यायिका आहे. श्री संत कडोजी महाराज मंदिरातील गादीचे आठवे वारसदार शांताराम महाराज भगत यांनी ही आख्यायिका सांगितली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीसंत कडोजी महाराज दरवर्षी विठ्ठलचे दर्शन घेण्यासाठी पायी वारी करत असत. एकदा ते कार्तिक शुध्द एकादशीला पंढरपूरला निघाले असता वाटेतच त्यांना पांडुरंगाचा साक्षात्कार झाला. 'अरे मी तुझ्याच गावास असून तू एवढ्या लांब कशासाठी निघालास, तुझ्या शेंदुर्णी नगरीत असलेल्या उकिरड्याखाली मी आहे. माझे वाहन वराह आहे. तू मला वर काढून माझी स्थापना कर.' या साक्षात्कारानंतर कडोजी महाराज वारी अर्ध्यातच थांबवून शेंदुर्णीला परतले. झालेला प्रकार गावकर्यांना सांगितला. परंतु, गावकर्यांनी त्यांना वेड्यात काढले. मात्र, महाराजांची पांडुरंगाच्या साक्षात्कारावर दृढ श्रद्धा होती. अखेर त्यांनी स्वत: उकिरडा खोदायला सुरवात केली. खोदतानाच काही फुटावरच पांडूरंगाने सांगितल्याप्रमाणे पाषाणाचा भव्य वराह बाहेर निघाला. आता गावकर्यांचा महाराजांवर विश्वास बसला. मग तेही या खोदकार्यात सामील झाले. अवघ्या 25 फुटावर काळ्या पाषाणातील साडेचार फुटाची पांडुरंगाची मूर्ती बाहेर आली. तीच मूर्ती सध्या मंदिरात आहे.
WD
मूर्तीच्या उजव्या हाताला गरूड तर डाव्या हाताला हनुमान आहे. मुर्तीचा चेहरा हसरा असल्याने भाव बदलतात असे वाटते. विष्णूरूपी पांडूरंग असल्याने त्याचे श्री त्रिविक्रम असे नामकरण करण्यात आले. मंदिरातील वराहाला खांदा आहे. खोदकाम करताना कुदळीचा वार पांडुरंगाच्या नाकाला लागला होता व जखमेतून रक्त आले होते, अशी ही आख्यायिका आहे. महाराष्ट्रावर कोसळलेल्या नैसर्गिक आपत्तीचे निवारण करण्यासाठी वडार समाजबांधव शेंदुर्णी येथे वराह पुजनासाठी येत असतात.
WD
संत कडोजी महाराजांनी त्रिविक्रमाच्या रथोत्सवास प्रारंभ केला. परंपरेनुसार शेंदुर्णी येथे कार्तिक शुध्द एकादशीला रथोत्सवाचे आयोजन करण्यात येते. येथे 263 वर्षांपूर्वी सागवान लाकडाचा 25 फूट उंच भव्य रथ असून संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्यात जुना हा रथ आहे. रथाचा तोल सांभाळण्यासाठी भाविकांकडून रथाच्या चाकाला मोगरी लावण्याचे काम केले जाते. चोपदार व भालदार अशी प्राचीन परंपरा येथे पहावयास मिळते. चोपदार हा सोनार समाजाचा तर भालदार हा सुतार समाजाचा आहे. येथील वडनेरे घराण्यातील सातवे वारसदार जगन्नाथ चिंधु वडनेरे हे चोपदार आहेत व एकनाथ वामन सुतार हे भालदार म्हणून काम पाहत आहेत. भाविक मोठ्या संख्येने रथोत्सवात सहभागी होत असतात.
WD
WD
शेंदुर्णी नगरीतून भव्य मिरवणूक काढली जाते. गावात ज्या ठिकाणी रथ थांबला त्या ठिकाणी भाविक श्रीफळ, केळी, कानगी (दक्षिणा) वाहून रथाचे मोठ्या श्रध्देने दर्शन घेतात. सर्वधर्मातील नागरिक रथोत्सवात सहभाग घेत असतात. मुस्लिम बांधव ढोलताशे वाजवत मिरवणुकीत सहभागी होतात. तसेच लेझीम झांजे पथक व खेड्यापाड्यावरून आलेल्या वारकर्यांच्या टाळ मृदंग व हरिनामाच्या गजराने शेंदुर्णी नगरी दुमदुमून जाते.
यात्रोत्सव: शेंदुर्णी नगरीतून वाहणाऱ्या सोन नदीच्या पात्रात कार्तिक शुध्द पोर्णिमेपासून 10 दिवसाची भव्य यात्रा भरत असते. दशमीपासून चतुर्दशी दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते.
कसे पोहचाल-
महामार्ग- जळगाव जिल्ह्यातील जामनेरपासून अवघ्या 16 किलोमीटरवर हे मंदिर आहे. तसेच पाचोरा येथूनही शेंदूर्णी येथे जाण्यासाठी खाजगी वाहन सहज उपलब्ध होतात. औरंगाबादहून सोयगावमार्गे शेंदुर्णीला पोहचता येते.
रेल्वे मार्ग- जामनेर- पाचोरा नॅरोगेज रेल्वे मार्गावर शेंदुर्णी रेल्वे स्थानक आहे. हा रेल्वे मार्ग मध्य रेल्वेच्या पाचोरा स्थानकाशी जोडण्यात आलेला आहे.
हवाई मार्ग- शेंदूर्णी येथे येण्यासाठी सगळ्यात जवळचे विमानतळ औरंगाबाद येथे आहे. औंरगाबाद- सोयगावमार्गे- शेंदूर्णी 125 किमी अंतर आहे.