Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

व्रत

डॉ. भारती सुदामे
'' आई, तू पोहोचते आहेस ना इथे, श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी? पहिला श्रावण सोमवार केव्हा आहे, ती आठवण कर मला. माझ्या लक्षात राहिलं नाही तर पंचाईत व्हायची. आतापर्यंत बरं होतं ग! फक्त शेवटच्या सोमवारी उपवास केला तरी चालायचा. आता तसं कसं चालेल.'' ऋतुजा, नुकतंच लग्न झालेली माझी मुलगी, पुण्याहून फोनवर बोलत होती. पुढं आणखीही कितीतरी निकाय-काय विचारत होती- माझं लक्षच नव्हतं. आज अचानक मन मागे गेलं. खूप मागे- चाळीस वर्षे मागे.

शाळा दुपारी दोन वाजताच सुटली. घरी आल्या आल्या आईची आज्ञा झाली- ''आज शेवटाचा सोमवार आहे. कितीही गर्दी असली तरी देवळात जाऊन आल्यावरच उपवास सोडायचा.''

मी मान डोलावली अन् हातपाय धुवून, आईला भाजी चिरून द्यावी म्हणून स्वयंपाकघरात गेले.

'' माझं सगळं झालं आहे आज. फक्त वरणाला फोडणी देते अन् पोथी वाचायला बसते. तू मुलांकडे बघ. त्यांना तयार कर. नुसतं हो म्हणू नकोस आणि हो- पुस्तक वाचत बसू नकोस.'' आईनं बजावलं. दर श्रावण सोमवारी ती शिवलीलामृताचा बारावा अध्याय वाचायची. तशी रोज कितीतरी स्त्रोत नि श्लोक सकाळी उठूंन म्हणत असे. आमचं
NDND
सगळं पाठांतर तिचं म्हणणं ऐकूनच झालं होतं.

शेवटचा सोमवार म्हणून देवळात खूंपच गर्दी होती. रांग वगैरे प्रकार तेव्हा फक्त शाळेच्या मैदानावरच अस्तित्वात असे. भंडार्‍यासारख्या खेडेगावात तर या गोष्टी अजीबातच अपेक्षित नव्हत्या. सगळा गोंधळ, चिखल, बेलच्या पानांचा खच, पांढर्‍या फुलांची घाण.... म्हणून देवळात जावसंच वाटायचं नाही. मी बाहेर तळ्यापाशी रेंगाळायची. 'या सगळ्या व्रतांपेक्षा देवळं स्वच्छ ठेवायचं व्रत का कोणी घेत नाही माझ्या मनात आलं! ''चल गं, कितीवेळ रेंगाळतेस?'' आईनं ‍हटकलं. मी मुकाट्यानं चालू लागले.

NDND
खाम तलावाजवळचं महादेवाचं मंदिर खूप प्रसिद्ध होंत. त्याचीही एक कहाणी होती. तिथलं शिवलिंग मधोमध दुभंगलं होतं म्हणे अन् त्याच्यात केसांची बट दिसते. केव्हातरी पूवीची गोष्ट - 'एका सुनेला तिचा नवरा नि सासू खूप त्रास द्यायचे. का, तर ती दुपारभर देवळात येऊन बसते. त्यांना, ती कोणालतरी भेटावयास येते, असा संशय होता. एकदा दुपारी तिचा नवरा तिला शोधत शोधत आला. ही देवळात देवालां गार्‍हाणं सांगत बसलेली.

नवरा भडकला, हातात कुर्‍हाड होती. ती उगारून 'तुझं तुकडंच करतो' म्हणत तिच्या अंगावर धावला. बिचारी सून घाबरली. बचावांसाठी ती खाली झुकली अन् तिनं महादेवाच्या पिंडाला मिठी मारली. कुर्‍हाडीचा घाव पिंडीवर बसला. पिंड दुभंगली अन् आत जायला पायर्‍या दिसू लागल्या. सून चट्‍दिशी उठली. पायर्‍या उतरून पिंडीतून आत गेली. नवरा पाठोपाठ जाऊ लागला, तो पिंड पुन्हा जुळली. खाली जाणार्‍या सुनेच्या वेणीच्या केसांचा झुबका तसाच बाहेर राहिला होता.' मी जेव्हा पण देवळात गेले की बारकाईनं निरीक्षण करायची.

'' हं- चल. पुढे चला. बाकीच्यांना दर्शन घ्यायचं आहे.'' पुजारीबुवा म्हणाले अन् मी भानावर आले, बाहेर पळाले. आई बाहेर खाली पायरापाशी उभी होती.

आम्ही घरी आलो. आईन वरण-भाजी गरम करायला स्टोव्ह पेटवला. मी पाट-पाणी घेऊ लागले पानं वाढली. नैवेद्य झाला. स्तो‍त्र म्हणून जेवायला सुरुवात करणार तोच - ''बाई श्याण आणलं'' म्हणून शेवंताबाईची हाळी आली.

'' अरे राम! आता आली का ही, केव्हाची वाट बघत होते मी.'' आई म्हणाली ''उठ बाई तूच - दे तिला भाजीपोळी. बरी उपास सोडायच्या सवाष्ण आली ती.''

वाढलेल्या ताटाकडे बघत मी नाइलाजानं उठले. शेवंताबाई शेण गोळा करून घरोघरी नेऊन देत असे. तिथं मिळणार्‍या भाकरतुकड्यावर तिची नि पोराबाळांची गुजराण व्हायची. नवरा कधी पैसे द्यायचा कधी नाही. सकाळी सड्याला नि रात्री स्वयंपाकाचा ओटा सारवायला शेण लागायचं रोज तेव्हा.

'' आज बरा उशीर केलास गं?''

NDND
'' हो जी, बेलाने गेल्तो नव्हं जेहेलांकडे अन् पानीबी तो होता इरभर.'' आपल्या टोपलीत फडक्यात भाजीपोळी नीट ठेवत ती म्हणाली- ''आत्ता वं... मामीनं गोड लिंब आणाया सांगला व्हता. इसरलीच म्या. थांब. मी देतो अत्ता. आपली शिदोरी ठेवून तिनं टोपलीत आंथरलेला कपडा बाजूला केला अन् कढीलिंबाच्या दोन छोट्या डहाळ्या बाहेर काढल्या. तिच्या हातातून 'डायरेक्ट' वस्तू घेणारं आमचंच घर होतं बहुधा. बाकी सगळीकडे तिला त्या खाली ठेवाव्या लागत. त्यावर पाणी टाकून मग मालकीणबाई उचलत. त्यामुळे ती नाराज असायची कोणासाठी काही आणायला. आईसाठी मात्र आपणहून काय काय आणून द्यायची. ''ह्यो बेलबी घ्या, आघाडा केनाबी आनला. उद्याच्याला देवीला व्हील.'' असं म्हणत तिनं बराचसा पालापाचोळा माझ्या हाती दिला. माझी आई-सगळे सणवार, व्रतवैकल्यं निगुतीनं करी. तिला हे सगळं साहित्य हवंच असे. शेवंताबाई गेल्यावर दार लावून घेत मी हातातला हिरवा भारा टेबलावर ठेवला. सगळे माझी वाट बघत जेवायला खोळंबले होते. स्टोव्हवर वरण उकळत होतं, त्याचा फटफट आवाज येत होता.

' अगं आई, शेवंताबाईनं कढीलिंब तर आत्ता आणला. तू वरणात कुठला घातलास? पाटावर बसत मी विचारले.

'' वरणात कुठंय्? नुसतीच फोडणी दिली मी वरणाला.
'' पण मग कढईत ती काडी कसली?'' मी शंका घेतली अन् आईनं डावनं वरण ढवळलं.
हे भगवान! वरणात गोडलिंब नव्हता. मला दिसली ती-ती काडी नव्हती... ती.... ती पालीची शेपटी होती. दुपारी केव्हातरी कढईवर झाकण ठेवण्यापूर्वी वरणात पाल पडली होती. उकळून, शिजून तिचा रंगही बदलला होता. आमच्या हातापायातलं त्राणच गेलं. कितीतरी वेळ आम्ही दोघी सुन्न होऊन एकमेकीकडे बघत बसलो. शेवटी आईच भानावर आली. तिने भराभरा सगळ्या ताटातल्या वाट्या आणि वरणाची कढई वरणासकट बाहेर अंगणात नेऊन ठेवली आणि ती दोन्ही धाकट्या भावंडांना पोटाशी घेऊन बाहेरच्या खोलीत येऊन थरथरत बसली. एखादी घाबरलेली पक्षीण आपल्या पिलांना पंखाखाली घेऊन बसते तशी. माझा धाकटा भाऊ तीन वर्षांचा होता, त्याच्यावरची बहीण चार वर्षांची आणि त्याच्यापेक्षा मोटी सात वर्षाची. मी तर काहीतरी आक्रित घडल्यासारखी थिजून उभी असावे- काही आठवत नाही. लहान भावंडांना काय झालं, ते न उमजल्यानं आणि आईच्या घट्ट धरून ठेवण्यानं ती दोघंही मोठमोठ्याने रडू लागली. त्यांना भूकही लागली असावी.

बराच वेळ ही दोघं रडत असावी. जोरजोरात दार वाजवण्याचा आवाज आला अन् भानावर येऊन मी दार उघडल. घरमालकीण काकू दारात उभ्या होत्या. त्यांना बघितलं अन् मी बांध फुटावा तशी रडायला लागले. रडत-अडखळत त्यांना काय झालं ते सांगू लागले. बाहेर कढईत पडलेली पाल त्यांनी बघितली.

'' आत्तार रं देवा'' मोठा आ वासून तोंडावर हात ठेवीत विस्फारलेल्या नजरेनं काकू उद्‍गारल्या, ''कोन्त अरिष्ट आनलं होतं व माय माझ्याघरी... उठा उठा बेगीनं, येथिसा नोका बसू. माही सून रांधल भाकर. कोरभर खाऊन घ्या. ये आन्न पुरून टाका. कोना जनावरच्या तोंडी नको.'' त्या पुढे झाल्या. सुधारसापासून सगळं अन्न उचलून बाहेर टाकलं. आम्हाला त्यांच्या घरी नेलं, भात-भाकरी नि तोंडल्याची भाजी जेवायला वाढलं. मी अन् आई तर बधिरच झालो होतो. घशाखाली घास उतरत नव्हता. धाकटी भावंडं थोडंतरी जेवली. आम्ही तर काहीच खाऊ शकलो नाही.

किती थोडक्यात वाचलो होतो आम्ही. जर शेवंताबाई उशिरा आली असती किंवा आलीच नसती तर? जर उपवास नसता आणि माझी वाट न पाहताच धाकट्या भावंडांनी जेवायला सुरुवात केली असती तर? विचारच करवत नव्हता. त्यांनतर कितीतरी दिवस आई मुकीच झाली होती.

आज या घटनेला तब्बल एक्केचाळीस वर्षे उलटलीत. शेवंताबाई आणि ही घटना दोन्हीही स्मृतीच्या खोल घळीत विसावल्या. पण अजूनही एखाद्या श्रावण सोमवारी उपवास सोडताना हातातला घास हातातच राहतो अन् मनात विचारयेतो-
' श्रावण सोमवारचं हे व्रत कोणाचं कशासाठीही असो, माझं मात्र शेवंताबाईबद्दली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आहे.

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

Christmas 2024: विशेष रेसिपी ट्री ब्राउनी

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होईल, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या

केस निरोगी ठेवण्यासाठी ताकासोबत चिया सीड्स चे सेवन करा हे फायदे मिळतील

हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्तीसाठी तुपात मिसळून हे खा, आजार दूर राहतील

Show comments