Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आज घरी " ती " आहे म्हणून.....

आज घरी
, मंगळवार, 8 मार्च 2022 (10:27 IST)
घरी निघालो भरभर, डोक्यात चक्र चालू होत म्हणून कदाचित मंडईत शिरायचं राहीलच... मग कडेच्याच भाजीवल्याकडून वांगी अन पडवळ घेतलं.
 
तरी आज उशीर झाला म्हणून खिचडी की मॅगी वर भागवू याचा गोंधळ सुरुच होता, तेवढ्यात आठवल कपडे हि धुवायचे राहिलेत कारण... आठवडा भर एकच जीन्स रगडवत होतो.
 
खांद्यावरची बॅग सावरली, अन दुधाची पिशवी दुसऱ्या हातात घेतली... डबडबलेल्या चेहऱ्यांनी घरी पोहचलो, कुलूप काढायच्या आतच दार उघडलेलं बघून थोडासा बावरलो.
 
हळूच पाऊल टाकलं तर स्वर्गात आल्या सारखं वाटलं. चुकून दुसऱ्याच घरी शिरलो काय म्हणूनहि गडबडलो... दबकत जरा आत गेलो, फ्रीज उघडला तर थंड हवा चेहऱ्यावर पसरली. कोपऱ्यात बसलेलं लोणच खुद्कन दिसलं. निवडलेली मेथी अन कोथिंबीर पण कोवळी हसली. सकाळी जागा नसलेला फ्रीज आता सुटसुटीत कसा? मग हळूच आणलेली वांगी अन पडवळ यांना जागेवर बसवलं.
 
रूमकडे पावलं टाकीत गेलो, तर काहीतरी सुगधं दरवळला. आठवडा भर पाणी न भेटलेले देव चमकताना हसले.... अगरबत्तीचा सुगंध माझ्या पाठी-पाठी येताना भासला.
 
बॅग अलगद खुर्ची वर ठेवली. जाताना बेड वर स्थापलेला टॉवेल खिडकीत हवा खाताना दिसला... कपाट उघडलं, तर धस्स झालं अन सगळे घडी वाले कपडे बघून डोळेच दाटून आले.
 
रुमालावर रुमाल कसा बसला होता, सकाळी सापडत नव्हता तो म्हणून वेगवेगळा घातलेला सॉक्स आता कोपऱ्यात बसून माझ्याकडेच बघत होता... लाल पिवळा निळा असे शर्ट हँगरला अडकलेले दिसले.
 
हळूच येऊन बसलो टीव्ही समोर तर, धुळीन काबीज केलेला टीव्ही पण चमकत होता, कारण माझी बावरलेली नजर त्यात स्पष्ट होत होती... दोन मिनिटं गरगरलंच, म्हणून पाणी प्यायला गेलो, तर एरवी नुसत्या लसणाच्या फोडणीवर चाललेलं किचन आज खमंग भजी अन कटाची आमटी यांच्या वासान मंत्र मुग्ध झालेलं.
 
भावना आवरून मग बाहेर आलो डोळे मिटून क्षणभर विचार करत बसलो. मग डोळे उघडून चिमटा काढत स्वप्न तर नाही म्हणून स्वतःलाच प्रश्न केला, तेवढ्यात गरम गरम भजी अन वाफाळता चहा कुणीतरी समोर धरला... गिळला गेला आवंढा, आपसुक अहंकार गळून पडला. एरवी थकून आलो म्हणून दही भातावर भागवणारा मी, आज आयाता आल्याचा कडक चहाचा स्वाद घेत होतो... न कळत अश्रू पडले दोन गालावर, जरासं सावरलं तेव्हा लक्षात आलं....
 
आज घरी "ती" आहे म्हणून...
जीच्यामुळं जगात समृद्धी अन सौख्य आलं..
कुणासाठी तरी ती...
आई आहे... कुणाची बायको तर... कुणाची बहीण अन... कुणासाठी मुलगी आहे.
 
तेव्हा पटलं मनाला, पठ्ठ्या किती हि मोठा हो पण लक्षात ठेव टायबुटातल्या शहाण्या... जगातल्या प्रत्येक "तुला" सावरायला एकतरी "ती" लागतेच 
कारण....
 
प्रत्येक घराला घरपण येण्यासाठी घरात एक 'ती' 
असावीच लागते...
कधी आईच्या तर कधी बायकोच्या, कधी बहिणीच्या तर कधी मुलीच्या रूपात पण ती असावीच लागते आयुष्यात. 
 
।।म्हणून आयुष्य खूप सुंदर आहे।।
- सोशल मीडिया

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

होळी स्पेशल : मूग डाळ बर्फी, आरोग्यदायी गोड रेसिपी