Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

केवळ भारतीय संस्कृतीतच असलेली गुरुकुल पद्धती

Webdunia
रविवार, 2 सप्टेंबर 2018 (12:53 IST)
गुरू म्हटलं की डोळ्यासमोर एक वृद्ध दाढीवाला गृहस्थ, बांबूंनी, पानांनी आच्छादलेल्या, झोपडीत, सहसा एकटा राहणारा, असे चित्र डोळ्यासमोर येते. हल्ली गुरू या शब्दा बरोबरच गुरुजी असेही आदर पूर्वक म्हटले जाते. व्यवहारात वस्ताद असलेल्या माणसाला तो तर काय महागुरू आहे. किंवा हिंदीत बोलतो क्या गुरू आदमी है, असेही हिणवून म्हणण्याचा प्रघात आहे. हे सर्व जरी खरं असलं तरीसुद्धा ज्याच्यामुळे आपले ज्ञान वाढते, आपण बुद्धिवंत होतो तो महाभाग म्हणजे गुरू याची आपल्याला आदरपूर्वक जाणीव असते.
 
हल्ली कान्वेंटमध्ये जाणारी मुलं टीचर असं आदरपूर्वक म्हणतात. गुरुकरता सामान्य माणसे शिक्षक हा मराठी आणि हिंदीत वापरला जाणारा शब्द सर्रास वापरतात. एखादं व्यक्तिमत्त्व कुठल्या नांवाने संबोधलं जातं ही बाब गौण आहे. पांढरी किंवा भगवा वस्त्र नेसून मांडी घालून, डोळे मिटून बसल्याने गुरुत्व येते किंवा चिंतनयुक्त मुद्रेत, डोळे बंद केल्याने जो व्यक्तिमत्त्व समोर दिसते ते म्हणजे गुरू, हाही एक भ्रम आहे. चमत्काराचा सहारा घेऊन लोकांना मूर्ख बनविणारे गुरू हल्ली बरेच निर्माण झाले आहेत. या असल्या ढोंगी गुरुंची बुवाबाजी फार दिवस चालू शकत नाही हे आपण जाणताच. मंत्र तंत्र करणारेही काही भोंदू गुरू म्हणवून घेतात. 
 
महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्याच्याकडून आपल्याला ज्ञान मिळवायचे तो खरोखरच ज्ञानी असायला हवा. त्याचे व्यक्तिमत्त्व पण साधं आणि गंभीर असायला हवं. ज्ञानाच्या आकर्षणाबरोबरच त्या व्यक्तीचेही आकर्षक स्वरूप असायला पाहिजे. म्हणजे शिष्यालाही या सर्वांचा आदर निर्माण होतो. भोंदूपण, चमत्कार दाखवणारे कधीच गुरू नसतात. ते पोटभरू असतात. काहीतरी पोटाला हवं म्हणून करतात. कालांतराने ही माणसे साधू किंवा गुरू नाहीत असे निश्चितच उघडकीला येते. 
 
आधी प्रपंच करावा नेटका, असे शिवाजीचे गुरू रामदास स्वामी म्हणतात. गुरुला दक्षिणा देणे हे शिष्याचे कर्तव्यच आहे. नेटका प्रपंच गुरूदक्षिणे शिवाय कसा चालणार? प्रत्येक गुरुला सिद्धी प्राप्त असतेच असे नाही. माझ्या मताने सिद्धी म्हणजे कठोर साधनेने मिळविलेले ज्ञान. ज्ञानप्राप्तीसाठी एकाग्रता आवश्यक आहे. मन शांत, प्रसन्न, निष्काम असेल तरच ही गोष्ट सहज शक्य होऊ शकते. जीवन जगण्यासाठी आलेला अनुभव हीच खरी सिद्धी. या अशा व्यक्तीला सिद्ध पुरुष किंवा गुरूत्व येते.
 
ज्याप्रमाणे संतांना समाजाची चिंता असते त्याच प्रमाणे गुरुला ज्ञानदानाची, शिष्याच्या प्रगतीची चिंता असते. आणि हाच खरा गुरू अंगात अनेक गुण येण्यासाठी अतोनात झिजावं लागतं, आघात सहन करावे लागतात. दगडही अनेक आघात सहन करून मग मूर्ती बनतो. अनेक अनुभव हाच सिद्धीचा एक भाग आहे. सिद्ध पुरुष बोलतो कमी पण त्याचे कृतित्व अधिक असते. कमी बोलण्यानं आणि गूढ चिंतनाने मनुष्याला गुरूपण येते. आपल्याला आलेले, प्राप्त झालेले अनुभव हा ज्ञानाचाच एक भाग आहे. पूर्वीच्या काळी ऋषी-मुनी जंगलात जाऊन एकाग्र होत असत. त्यांच्या तपश्चर्येला साजेशा अशा गवत फांद्यांच्या झोपड्या असत. म्हणून शिष्यवर्ग त्यांच्या चरणी लीन होऊन ज्ञान प्राप्त करीत असे. आणि म्हणून ही गुरुकुल पद्धती.
 
गुरुची सेवा किंवा त्यांच्या घराची साफ सफाईही यासाठी शिष्य कर्तव्य मानत की ज्यामुळे गुरुचे जीवन सुकर, सुलभ होऊन त्यांना अधिक ज्ञान द्यावेसे वाटे, त्यामुळे ज्ञानदीप संतत तेवत ठेवणे सुलभ होई. अशा मुळे जेवढे ज्ञान मिळेल तेवढे गुरू संपर्कात येऊनच वृद्धिंगत होईल ही परंपरा होती. गुरूगृही राहूनच सतत ज्ञान प्राप्ती होते. ज्ञानीपुरूषाचा सदैव संपर्क हाच एक बहुमूल्य मार्ग आहे. 
 
कालमानाप्रमाणे आणि बदलती जीवन शैली यामुळे आता जंगलं, झोपड्या आणि ऋषी-मुनी नसले तरी टीचरच्या संपर्कात अधिक वेळ राहून पण शिष्य गुरुकुल पद्धती आचरणात आणू शकतो. गुरुदक्षिणेची पूर्वीची पद्धत आणि आधुनिक पद्धत जरी वेगळी असली तरी ती एक जगाला मान्य अशी एक पद्धत आहे. केवळ भारतीय संस्कृतीच ही गुरुकुल पद्धती आहे, इतर कुठल्याही देशात नाही. आम्हीच साऱ्या जगाला सांगू शकतो की ज्ञान ग्रहण किंवा ज्ञानदान करण्याची ही आमचीच संस्कृती आहे, आमचीच पद्धती आहे. भारतीय संस्कृतीची परिभाषा म्हणजेच गुरुकुल पद्धती होय.

संबंधित माहिती

SRH vs KKR : कोलकाताने हैदराबादचा आठ गडी राखून पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला

महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल कधी लागणार शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी सांगितले

लंडनहून सिंगापूरला जाणाऱ्या विमानात एअर टर्ब्युलन्समुळे एका प्रवाशाचा मृत्यू,अनेक जखमी

मनीष सिसोदिया यांना उच्च न्यायालयाचा धक्का, जामीन अर्ज फेटाळला

Covid 19: सिंगापूरमध्ये कहर केल्यावर आता KP1 आणि KP2 प्रकारांच्या संसर्गाचा भारतात शिरकाव

पुणे प्रकरणातील तिन्ही आरोपींना 24 मेपर्यंत पोलिस कोठडी

Pune Porche Accident :अल्पवयीन आरोपीला दारू देणारा बारला सील केले

आयसीएमआरने कोवॅक्सिन वरील बीएचयूच्या अहवालावर प्रश्न उपस्थित केले

KKR vs SRH सामन्यात पाऊस पडला तर IPL फायनलचे तिकीट कोणत्या संघाला मिळेल? तपशीलवार जाणून घ्या

T20 World Cup 2024:भारत पहिल्यांदाच या संघांशी भिडणार, जाणून घ्या सामना कधी होणार

पुढील लेख
Show comments