Coconut Muthiya Recipe in Marathi नारळाचे सेवन आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. बहुतेक घरांमध्ये नारळापासून अनेक प्रकारचे गोड आणि तिखट पदार्थ बनवले जातात. तुम्हालाही नारळाचा स्वाद आवडत असेल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे. नारळ मुठिया बनवणे खूप सोपे आहे. येथे आम्ही तुम्हाला नारळाचे मुठिये कसे तयार करायचे सांगत आहोत-
नारळ मुठिया तयार करण्यासाठी आवश्यक साहित्य-
1 ओलं नारळ, 1 मोठी वाटी बेसन किंवा नारळाच्या हिशोबाने अंदाजे, 2-3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 2 चमचे बडीशेप, 2 चमचे लाल तिखट, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा मोहरी-जिरे, 1/2 चमचा धणेपूड, चिमूटभर हींग, 1 चमचा तीळ, 1 चमचा खसखस, आवडीप्रमाणे मीठ, तेल आणि बारीक चिललेली कोथिंबीर.
कृती : कोकोनट मुठिये तयार करण्यासाठी सर्वात आधी ओलं नारळ फोडून पाणी वेगळे करुन घ्या. आता नारळ किसून घ्या. त्यात बेसन, लाल तिखट, हिरव्या मिरच्या, शोप, हिंग, हळद, मीठ आणि एक मोठा चमचा तेलाचे मोहन आणि कोथिंबीर घालून पाणी घालत-घालत मळून घ्या. मिश्रण खूप घट्ट किंवा पातळ नसावं.
आता एका पातेल्यात अर्ध पाणी भरुन उकळी येऊ द्या. मिश्रणाचे आवडीच्या आकारात मुठिया तयार करुन घ्या. पातेल्यात स्टीलच्या चाळणीला जरा तेलाचा हात लावून त्यावर जरा जरा अंतरावर मुठिये ठेवून घ्या.
आता त्यांना झाकून द्या. मंद आचेवर 20-25 मिनिटे वाफू द्या. प्रत्येक 5-7 मिनिटात चाळणीतील मुठिया आलटून-पालटून द्या. याने मुठिये चांगले वाफून जातील. वाफल्यानंतर ताटलीत काढून घ्या.
मुठिया शिजले की नाही तपासण्यासाठी चमचा किंवा चाकू मधोमध टाकून बघा. याने अंदाज येईल.
मुठिया फ्राय कसे करावे
आता एक कढईत 1 ते दीड चमचा तेल गरम करुन घ्या त्यात मोहरी-जिरेची फोडणी देत हिरवी मिरची, हिंग, खसखस आणि तीळ टाकून मुठिया टाकून द्या. वरुन लाल तिखट, हळद, धणेपूड आणि मीठ टाका. सर्व व्यवस्थित मिसळ्यानंतर त्यावर कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
नोट : नारळ मुठिया बनवताना बेसनाचे प्रमाण अधिक नसावे याची काळजी घ्या.