Mumbai News: महाराष्ट्रातील दक्षिण मुंबईतील गिरगाव येथील एका दुकानदाराने कथितपणे महिलेला मराठीऐवजी मारवाडीत बोलण्यास सांगितल्यानंतर, मनसे कार्यकर्त्यांनी दुकानदाराला चोप दिला. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार भाजप सत्तेत आल्याचे कारण देत दुकानदाराने महिलेला मारवाडी भाषेत बोलण्यास सांगितले असल्याचे पोलिसांनी सांगितले. सोमवारी संध्याकाळी ही महिला गिरगावातील खेतवाडी येथील दुकानात गेल्याचे त्यांनी सांगितले, पण दुकानदाराने महिलेला मराठीत नव्हे तर मारवाडी भाषेत बोलण्यास सांगितले. सोशल मीडियावर समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी थप्पड मारल्यानंतर दुकानदार महिलेची माफी मागताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये ती महिला मराठीत म्हणताना दिसत आहे की, महाराष्ट्रात भाजपची सत्ता आल्याने दुकानदाराने तिला मारवाडीत बोलण्यास सांगितले होते.
तसेच महिलेने सांगितले की तिने नंतर तिच्या मतदारसंघातील एका प्रमुख भाजप नेत्याला या घटनेची माहिती दिली, परंतु त्याने तिला गटांमधील शत्रुत्व वाढवू नका असे सांगितले. त्यानंतर या महिलेने मलबार हिल परिसरातील मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांना याबाबत माहिती दिली. यानंतर दुकानदाराला पक्ष कार्यालयात बोलावण्यात आले, तेथे कार्यकर्त्यांनी त्याला थप्पड मारली आणि महिलेची माफी मागण्यास सांगितले. दुकानदाराने महिलेची माफी मागितली. त्यांनी महिला आणि मराठी भाषिक समुदायाची माफी मागितल्यानंतर हे प्रकरण मिटल्याचे पोलिसांनी सांगितले.