आई कामानिमित्त बाहेरगावी गेली होती तेव्हा चार महिन्यांच्या मुलीला बापाने पाच लाख रुपयांसाठी विकून दिलं. व्ही पी रोड पोलिसांनी आरोपी बापासह 11 जणांना अटक केली आहे.
चार महिन्याच्या या मुलीला तामिळनाडू येथे नेऊन 4 लाख 80 हजार रुपयांना विकण्यात आल्याची घटना घडली आहे. या मुलीला पोलिसांनी ताब्यात घेऊन मुंबईत आणलं आहे. या प्रकरणात आतापर्यंत 11 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेले आरोपी हे सरोगसी आणि IVF व्यवसायात सक्रिय असल्याचं कळून येत आहे. फिर्यादी महिला आयवरी शेख यांना आपल्या घरात आरोपी इब्राहिम शेख आणि त्याची लिव्ह इन पार्टनर यांना भाड्याने ठेवलं होतं. इब्राहिमच्या पत्नीला एक चार महिन्याची मुलगी आहे. इब्राहिम याची पत्नी गेल्या काही दिवसांपासून कामानिमित्त बाहेर गावी गेली असताना तिने मुलीचा सांभाळ करण्याची जबाबदारी घर मालकीन आयवरी शेख हिच्यावर सोपवली होती. मुलीचा सावत्र बाप इब्राहिम हा देखील घरीच होता.
27 डिसेंबर रोजी इब्राहिम याने आयवरीकडून लस देण्याच्या बहाण्याने मुलीला घेतलं आणि गायब झाला. तो परत न आल्याने आयवरीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. तपासात चार महिन्यांच्या मुलीला तामिळनाडू येथे विकण्यात आल्याचं उघडकीस आलं तेव्हा पोलिसांनी दोन पथकं बनवून तामिळनाडू येथे पाठवली आणि मग मुलीला तामिळनाडू, कोईम्बतूर येथून ताब्यात घेतलं.
पोलिसांनी या घटनेतील मुख्य आरोपी इब्राहिम शेखला प्रथम ताब्यात घेतलं. नंतर मुंबईतील तपासासाठी पोलिसांनी अनेक पथक बनवली आणि सायन, धारावी, मालाड, जोगेश्वरी, नागपाडा, कल्याण आणि ठाणे या भागात आरोपीचा शोध घेतला. या ठिकाणी छापे टाकून 2 महिला आणि 4 पुरुषांना अटक केली. तामिळनाडू येथे पाठवल्या टीमने अनेक तासांचा तपास करून तिथे पाच जणांना अटक करून मुंबईत आणलं.
या गुन्ह्यात आतापर्यंत 11 जणांना अटक करण्यात आली आहे. इब्राहिम शेख, शेर पीर खान, लक्ष्मी मुरगेश, सद्दाम शाह, अमजद मुन्ना शेख, रेश्मा गुलाब नबी शेख, कार्तिक राजेंद्रन, चित्रा कार्तिक, तमिळ सेलवन थंगराज, मूर्ती पालानि सामी, आनंद कुमार नागराज अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यात अजून काही आरोपींचा समावेश आहे.