घरात लहान मुलं असतील तर लक्ष देणं गरजेचं असतं. मुलं खेळतानाही त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. उज्जैनमध्ये असाच एक प्रकार समोर आला आहे. इथे धाकट्या भावासाठी लावलेला साडीचा झोपाळा मोठ्या बहिणीसाठी गळफास ठरला. भावासाठी लावलेल्या झुल्यावर झुलताना 10 वर्षांच्या मुलीला गळफास लागून गुदमरून तिचा दुर्देवी मृत्यू झाला. रविवारी रात्री हा अपघात झाला.उर्वशी असे या मयत चिमुकलीचे नाव आहे.
रायपूर येथील रहिवासी नरेश देवांगन यांची मुलगी उर्वशी (10) उज्जैन येथे तिच्या मामाकडे आली होती. ती इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी होती. देवास गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बडी मायापुरी येथे तिचे मामा शैलेंद्र राहतात. 4ऑक्टोबर रोजी नरेश आपली मुलगी उर्वशी, पत्नी कोमल आणि मुलगा दीपक यांना नवरात्रीच्या काळात सोडून गेला आणि दिवाळीनंतर त्यांना रायपूरला परत नेण्यात येईल, असे सांगण्यात आले.
कोमलने मुलगा दीपकसाठी दुसऱ्या मजल्यावर साडीचा झोका बांधला होता. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्वशी रविवारी रात्री एकटीच झुल्यावर झोका घेत होती. त्यावेळी तिथे कोणीच नव्हते. यादरम्यान, गोल गोल फिरत असताना तिच्या गळ्याला फास लागला. बराच वेळ मुलगी खाली आली नाही म्हणून आई वर बघायला आली. तेव्हा तिला मुलीच्या गळ्यात झोका फसून ती बेशुद्ध असल्याचे पहिले. कुटुंबीयांनी तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलिसांनी मुलीचा मृतदेह शवागारात ठेवला असून तिचे वडील आल्यानंतर मुलीच्या मृतदेहाचे शव विच्छेदन केले जाईल.