माणुसकीला लाजवणारी घटना केरळ मध्ये घटने आहे. केरळमधील कन्नूरमध्ये कारला टेकून उभ्या असलेल्या एका 6 वर्षाच्या मुलाला लाथेने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत मुलाच्या पाठीला दुखापत झाली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी कार चालकाला शुक्रवारी सकाळी अटक केली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे.
व्हिडीओ मध्ये रस्त्याच्या कडेला उभी असलेली पांढरी कार दिसत आहे. त्या कारला टेकून एक चिमुकला उभा आहे. कार चालक रागाने गाडीतून उतरतो आणि मुलाला काहीतरी म्हणतो आणि त्याला लाथेने मारहाण करतो. मूल कसाबसा उभा राहतो नंतर तेथून काहीही न म्हणता निघून जातो. काही स्थानिक लोक गाडीभोवती जमतात आणि कार चालकाला जाब विचारतात, तो तेथून पळ काढतो.
सदर घटना गुरुवारी रात्री 8.30 च्या सुमारास केरळच्या थलासेरी भागातील आहे. घटनेनंतर एका प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना माहिती दिली. तक्रारीनंतर आरोपीला पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले, मात्र कोणतीही कारवाई न करता सोडून देण्यात आले. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि या प्रकरणावर कारवाई न केल्याने लोकांमध्ये रोष निर्माण झाला. यानंतर पोलिसांनी आरोपीला पकडले. शहशाद असे आरोपीचे नाव असून तो पोन्नयमपालमचा रहिवासी आहे.पोलिसांनी शुक्रवारी मुलाचा जबाब घेतला. सहा वर्षांचा हा राजस्थानी स्थलांतरित मजुराचा मुलगा आहे. त्याच्या पाठीला दुखापत झाली आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.