भारतीय इतिहास संशोधन परिषदेने (ICHR) 'स्वांतत्र्यदिनाचा अमृत महोत्सव' यासंदर्भातील एक पोस्टर जारी केले आहे. यात जवाहरलाल नेहरु यांचा फोटो नसल्याने नवीन वादला सुरुवात झालीय. काँग्रेस नेत्यांनी यावर आक्षेप नोंदवला आहे.
काँग्रेस नेते शशी थरुर यांनी या पोस्टरचा फोटो ट्वीट केला आहे. यात महात्मा गांधी,सुभाष चंद्र बोस,भगत सिंह, डॉ.बाबासाहेब आंबेडकर,सरदार वल्लभभाई पटेल,राजेंद्र प्रसाद,मदन मोहन मालवीय आणि वीर सावरकर यांचे फोटो आहेत.मात्र नेहरुंचा फोटो नसल्याने त्यावर टीका केली जात आहे.
शशी थरुर म्हणाले, "हे केवळ निंदनीय नाही तर इतिहासाच्या विरोधात आहे. स्वातंत्र्याचा महोत्सव भारतीय स्वातंत्र्याचा आवाज राहिलेले जवाहरलाल नेहरु यांना हटवून साजरा केला जात आहे. पुन्हा एकदा आयसीएचआरने आपलं नाव खराब केलं आहे. ही एक सवय बनत चालली आहे!"
काँग्रेसच्या इतर नेत्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. जयराम रमेश यांनी शशी थरुर यांचे ट्वीट रिट्वीट करत टीका केली आहे.
तर काँग्रेसच्या प्रवक्त्या शमा मोहम्मद म्हणाल्या,"देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांचे नाव स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात नसल्याने त्यांचे व्यक्तिमत्त्व कमकुवत होत नाही.तर यावरुन हेच दिसते की भाजप आणि पंतप्रधान हे नेहरुंच्या कर्तृत्त्वाला किती घाबरतात. अशाप्रकरची असुरक्षेची भावना पंतप्रधानांना शोभा देत नाही."