Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अँटिलिया स्फोटकं प्रकरण: सचिन वाझे, प्रदीप शर्मांसह 10 जणांची NIA च्या आरोपपत्रात नावं

Webdunia
शुक्रवार, 3 सप्टेंबर 2021 (22:18 IST)
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (NIA) आरोपपत्र दाखल केलं आहे.
 
या आरोपपत्रात सचिन वाझे, प्रदीप शर्मा या माजी पोलीस अधिकाऱ्यांसह एकूण 10 जणांची नावं आहेत. NIA च्या विशेष कोर्टात हे आरोपपत्र दाखल करण्यात आलंय.
 
तीन घटनांचा या आरोपपत्रात उल्लेख आहे. अँटिलियाबाहेर सापडलेल्या स्फोटकांची घटना, विक्रोळीतून चोरीला गेलेल्या महिंद्रा स्कॉर्पिओ गाडीची घटना आणि मनसुख हिरेन यांच्या मृत्यूची घटना अशा तीन घटनांचा यात समावेश आहे.
अँटिलिया बंगल्याबाहेर स्कॉर्पिओ गाडीत स्फोटकं ठेवण्यासह मनसुख हिरेन यांच्या हत्येतील घटनेत आरोपपत्रातील दहा जणांना वेगवेगळ्या ठिकाणी संबंध आल्याचं या आरोपपत्रात म्हटलंय.
आरोपपत्रात कुणा-कुणाची नावं?
सचिन वाझे
प्रदीप शर्मा
नरेश गोर
विनायक शिंदे
रियाझुद्दीन काझी
सुनील माने
संतोष शेलार
आनंद जाधव
सतीश मोथकुरी
मनीष सोनी
कोण आहेत प्रदीप शर्मा?
निवृत्ती घेतल्यानंतर प्रदीप शर्मा यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली होती. पालघरमध्ये नालासोपाऱ्यात शिवसेनेकडून प्रदीप शर्मा यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती.
 
शर्मा कुटुंबीय मूळचे उत्तर प्रदेशातील आग्र्याचे. मात्र, प्रदीप शर्माचे वडील महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात स्थलांतरित झाले. तिथेच ते स्थायिकही झाले. ते पेशानं शिक्षक होते.
 
प्रदीप शर्मा यांचा जन्म जरी उत्तर प्रदेशातील असला, तरी ते लहानपणापासूनच महाराष्ट्रात राहिले आहेत. लहानपणीच वडिलांसोबत ते धुळ्यात राहिले आणि प्राथमिक शिक्षणापासून ते एमएस्सीपर्यंत ते धुळ्यातच वाढले. शिक्षण घेतल्यानंतर एमपीएससी करून ते पोलीस सेवेत दाखल झाले.
पोलीस सेवेच्या आकर्षणाबद्दल सांगताना ते म्हणतात, "धुळ्यात असताना आमच्या शेजारी पगार नावाचे इन्स्पेक्टर राहायचे. लहान असताना त्यांना पाहायचो. ते युनिफॉर्मवर बाईकवर जात असत. पोलीस सेवेच्या आकर्षणासाठी ते एक कारणीभूत ठरलं म्हणता येईल."
 
महाराष्ट्रातली 1983 ची पोलिसांची बॅच सर्वांत प्रसिद्ध ठरली. या बॅचमध्ये प्रफुल्ल भोसले, विजय साळसकर, रविंद्र आंग्रे, अस्लम मोमीन असे 'एनकाउंटर स्पेशालिस्ट' म्हणून सर्वत्र परिचित असलेले पोलीस अधिकारी होते. याच बॅचमध्येच प्रदीप शर्मा हे सुद्धा आहेत.
 
नाशिक पोलीस ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर ही बॅच 1984 साली पोलीस सेवेत कार्यरत झाली. प्रदीप शर्मा यांची पहिली नियुक्ती मुंबईतल्या माहिम पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षकपदावर झाली. त्यानंतर ते स्पेशल ब्रँचमध्ये गेले. नंतर मुंबई उपनगरातील पोलीस ठाण्यांचे प्रमुख, क्राईम इंटेलिजियन्समध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशा विविध पदांवर त्यांनी काम केले.
 
सचिन वाझे कोण आहेत?
सचिन वाझे यांचं पूर्ण नाव, सचिन हिंदूराव वाझे. सचिन वाझे मुळचे कोल्हापूरचे. सचिन वाझे यांची 1990 मध्ये महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर निवड झाली. तेव्हापासून वाझे यांचा पोलीस दलातील प्रवास सुरू झाला.
 
वाझे यांना ओळखणारे वरिष्ठ क्राइम रिपोर्टर सांगतात, "पोलीस दलात वाझे यांना पहिली पोस्टिंग मिळाली नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात. त्यानंतर 1992 च्या आसपास त्यांची बदली ठाण्यात झाली."
मुंबईत अंडरवर्ल्डने 1990 च्या दशकात डोकं वर काढण्यास सुरूवात केली. दाऊद, छोटा राजन आणि अरूण गवळी सारखे डॉन मुंबईच्या रस्त्यांवर रक्तपात करत होते. मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडली.
 
मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्डच्या शार्प शूटर्सचं एक-एक करून एन्काउंटर करण्यास सुरूवात केली होती. सचिन वाझे त्याचसुमारास मुंबईत बदलीवर रुजू झाले होते.
 
नेमकं काय घडलं होतं?
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानाजवळ स्कॉर्पिओ गाडीत 25 फेब्रुवारी 2021 रोजी स्फोटकं सापडली होती. जिलेटीन स्फोटकाच्या 20 कांड्या या गाडीत सापडल्याची माहिती महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती.
हा परिसर गावदेवी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो. या घटनेची माहिती मिळताच संबंधित पथकं घटनास्थळी दाखल झाली. तिथे तपास केल्यानंतर जिलेटीनच्या 20 कांड्या स्कॉर्पिओ गाडीत सापडल्या होत्या.
 
मुंबईतील पेडर रोडवर अँटिलिया हे मुकेश अंबानी यांचे निवासस्थान आहे. हा मुंबईतील उच्चभ्रू परिसर मानला जातो.
 
स्फोटकांनी भरलेली गाडी ज्यांच्या ताब्यात होती त्या मनसुख हिरेन यांचा मृतदेह विधिमंडळ अधिवेशन सुरू असतानाच आढळला आणि प्रकरण आणखीनच चिघळलं.
 
पोलिसांच्या माहितीनुसार, मनसुख हिरेन यांचा मृतदेह खाडीत 50-60 फूट आत मातीत रूतला होता. क्रेनच्या मदतीने मृतदेह काढण्यात आला.
मृतदेहावर खूप माती लागली होती. शरीरात पाणी आणि माती गेल्याचा संशय आहे. मृतदेहाच्या चेहऱ्यावर कानटोपीसारखं मास्क होतं. त्यात 3-4 रुमाल होते. हे रुमाल पोलिसांनी जप्त केले होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments