Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भूपेंद्र पटेल यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची दुसऱ्यांना घेतली शपथ

Webdunia
सोमवार, 12 डिसेंबर 2022 (19:10 IST)
भूपेंद्र पटेल आता सलग दुसऱ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री होत आहेत. त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
तसेच ते दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांना आमदारकीच्या सुरुवातीच्या या दोन्ही कार्यकाळांमध्ये मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची संधी मिळाली आहे.त्यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे देखील उपस्थित आहेत.
 
याआधी 10 डिसेंबर रोजी भाजपाच्या आमदारांची बैठक झाली, पक्षाच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीत पटेल यांची नेता म्हणून निवड करण्यात आली.
या बैठकीला राजनाथ सिंह, बी.एस. येडीयुरप्पा, अर्जुन मुंडा यांच्यासारखे वरिष्ठ नेते पर्यवेक्षक म्हणून उपस्थित होते.
 
पटेल यांनी 9 डिसेंबरला आपल्या आधीच्या मुख्यमंत्रिपदाचा औपचारिक राजीनामा दिला होता.
 
2021 साली भूपेंद्र पटेल पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा...
 
विजय रुपाणी यांनी 11 सप्टेंबर 2021 रोजी राजीनामा दिल्यानंतर रविवारी (12 सप्टेंबर) पहिल्यांदाच आमदार बनलेल्या भूपेंद्र पटेल यांची मुख्यमंत्रिपदी वर्णी लागली होती.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं.
 
त्यांनी म्हटलं, "भूपेंद्रभाईंचं गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन. मी त्यांना अनेक वर्षांपासून केवळ त्यांच्या कामामुळे ओळखत आहे. ते गुजरातच्या विकासाला पुढे घेऊन जातील. भूपेंद्र पटेल यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या शपथविधी कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते तसंच भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते.
भूपेंद्र पटेल हे गुजरात विधिमंडळाचे नेते म्हणून निवडले गेल्याची माहिती केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी पत्रकार परिषदेत दिली होती.
नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितलं होतं की, "भूपेंद्र पटेल लवकरच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. गांधीनगरमध्ये भाजपच्या विधिमंडळ सदस्यांची बैठक झाली. त्यात पटेल यांचं नाव जाहीर करण्यात आलं."
 
'भूपेंद्र पटेल यांचे ना कुणी मित्र, ना शत्रू'
बीबीसी गुजरातीचे संपादक अंकुर जैन यांनी भूपेंद्र पटेल यांच्या निवडीचं विश्लेषण करताना सांगितलं की, "विजय रूपाणींना राजीनामा द्यायला सांगितलं गेलं, याचं प्रमुख कारण म्हणजे भाजपला गुजरातमध्ये 'पटेल' चेहरा हवा होता."
 
"आगामी विधानसभा निवडणुकीत इतर कुठल्याही समाजापेक्षा पटेल समाज आपल्या बाजूने हवा, हे भाजपला चांगलं ठाऊक आहे. कारण पटेल समाजाच भाजपला गेल्या दोन-अडीच दशकांपासून चांगला पाठिंबा मिळत आलाय. पटेल समाजातला मोठा गट पाटीदार आरक्षणासाठी संघर्ष करताना दिसतोय," असं अंकुर जैन म्हणतात.
तसंच, "नितीन पटेल किंवा तत्सम नेत्यांना पक्षातूनही विरोध होण्याची शक्यता होती. मात्र, भूपेंद्र पटेल हे पूर्णपणे नवीन नेते, पहिल्यांदाच आमदार झालेले आहेत. त्यांना पक्षातही विरोध नाहीय. अहमदाबाद महानगरपालिकेत त्यांनी मोठं पद भूषवलंय. जमिनीसंदर्भातल्या व्यवसायात ते आहेत. भूपेंद्र पटेल यांचे पक्षात कुणी फार मित्रही नाहीत आणि कुणी शत्रूही नाहीत. भूपेंद्र पटेल यांना लोकनेते म्हणता येणार नाही. मात्र, पटेल समाजासाठी ते भाजपला सावरून नेऊ शकतात, असं त्यांच्याकडे पाहिलं जातंय," असंही अंकुर जैन सांगतात.
 
कोण आहेत भूपेंद्र पटेल?
भूपेंद्र पटेल हे 2017 साली गुजरात विधानसभेत पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले आहेत.
 
ते गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांचे विश्वासू समजले जातात.
 
भूपेंद्र पटेल हे घाटलोदिया विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून विधानसभेत निवडून आले आहेत. या मतदारसंघातून पूर्वी आनंदीबेन पटेल (उत्तर प्रदेशच्या विद्यमान राज्यपाल) निवडून येत असत.
तब्बल एक लाख 17 हजार मतांच्या फरकाने ते आमदार म्हणून विजयी झाले होते. काँग्रेसच्या शशिकांत पटेल यांचा त्यांनी पराभव केला होता.
 
भूपेंद्र पटेल हे यापूर्वी अहमदाबाद महानगरपालिकेत स्थायी समितीचे अध्यक्ष होते.
 
'अचानक झाली नावाची घोषणा'
बीबीसी गुजरातीचे प्रतिनिधी रॉक्सी गागरेकर छारा यांनी भूपेंद्र पटेल यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर काही आमदारांशी संवाद साधला.
 
एका आमदाराने सांगितलं, की आमदारांच्या बैठकीत भूपेंद्र पटेल तिसऱ्या की चौथ्या रांगेत बसले होते. अचानकच त्यांच्या नावाची घोषणा झाली, असं वाटलं.
 
त्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर त्यांचं अभिनंदन करण्यासाठी गर्दी जमली. आमदारांनी त्यांचं अभिनंदन केलं.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही ट्वीट करून पटेल यांचं अभिनंदन केलं.
 
शाह यांनी म्हटलं आहे, "भूपेंद्र पटेल यांचं हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. नरेंद्र मोदी यांचं मार्गदर्शन आणि तुमच्या नेतृत्वाखाली राज्याच्या विकासचक्राला नवी ऊर्जा आणि गती मिळेल, असा विश्वास मला वाटतो. गुजरात सुशासन आणि लोककल्याणात नेहमीच अग्रेसर राहील."
 
विजय रूपाणी यांचा राजीनामा
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा काल (11 सप्टेंबर) राजीनामा दिला. गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे रुपाणी यांनी आपलं राजीनाम्याचं पत्र सोपवलं.
 
राजीनामा दिल्यानंतर विजय रुपाणी यांनी माध्यमांशी संवादही साधला. त्यात ते म्हणाले, "राजीनाम्यासाठी कुणाचाही दबाव नव्हता. मी माझ्या मर्जीने राजीनामा दिला आहे, आता संघटनेसाठी काम करण्याची इच्छा आहे. मला संधी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धन्यवाद."
 
"संघटनेतील कुणासोबतच माझी तक्रार नाही. आम्ही संघटनेत एकत्र मिळूनच काम केलेलं आहे. नवं नेतृत्व तयार करण्याची भारतीय जनता पक्षात परंपरा आहे," असं रुपाणी यांनी सांगितलं.
ते पुढे म्हणाले, "गुजरातमध्ये स्थानिक निवडणुकीत भाजपला जनतेचा चांगला पाठिंबा मिळाला. यामुळे मला काम करत राहण्यासाठी मोठी ऊर्जा मिळाली. पक्षासह जनतेचं आतापर्यंत मला मोठं सहकार्य मिळालं."
 
"लसीकरणाच्या कार्यक्रमातही गुजरात पुढे राहिला आहे. भाजपचे माजी अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रशासनाला जाणून घेण्यासाठी सहकार्य आणि मार्गदर्शन लाभलं. जे पी नड्डा यांचंही सहकार्य आणि मार्गदर्शन लाभलं. गुजरातच्या नव्या नेतृत्त्वाला माझं कायम सहकार्य लाभेल," असं रुपाणी म्हणाले.
 
अमित शहांचे पूर्वीचे सेक्रेटरी विजय रुपाणींकडे का काम करायचे?
विजय रुपाणी यांच्या राजीनाम्याबद्दल बीबीसी गुजरातीचे संपादक अंकुर जैन यांनी सांगितले, "विजय रुपाणी यांची कारकीर्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या छायेखालीच राहिली. पक्षातील नेते आणि सनदी अधिकाऱ्यांना कोण निर्णय घेतंय याची चांगलीच कल्पना होती. रुपानी यांचे स्वीय सचिव शैलेश मांडवीय हे पूर्वी अमित शाह यांचे सचिव होते. सचिव अशाप्रकारे शेअर करण्याची प्रथा राजकारण्यांमध्ये नसते."
निवडणुकीआधी एक वर्ष रुपाणी यांना बदललं जाईल अशी अफवा याआधीच पसरली होती असंही जैन यांनी सांगितलं.
 
विजय रुपाणी यांना राजीनामा द्यावा लागण्यामागे त्यांचा कमी असलेला लोकसंपर्क असल्याचंही जैन यांनी सांगितलं. "ते कधीच मासलिडर म्हणून ओळखले गेले नाहीत. रुपाणी मुख्यमंत्री असताना झालेल्या निवडणुकीत भाजपाची संख्या 115 वरुन 99 वर आल्याकडेही त्यांनी लक्ष वेधलं," असंही अंकुर जैन यांनी सांगितलं.

Published By- Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments