बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांना आज पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाकडून मोठा झटका बसला आहे. सुप्रीम कोर्टाने पुन्हा बाबांची माफी नाकारली. त्यांना 23 एप्रिल रोजी पुन्हा न्यायालयात हजर राहावे लागणार असून, जाहीर माफी मागण्याच्या सूचनाही त्यांना देण्यात आल्या आहेत. यासाठी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना एका आठवड्याची मुदत दिली आहे.
आज बाबा रामदेव सर्वोच्च न्यायालयात हजर झाले. दिशाभूल करणाऱ्या जाहिरात प्रकरणी पतंजली आयुर्वेदाविरुद्ध दाखल अवमान याचिकेवर सुनावणी झाली. 10 एप्रिल रोजी शेवटची सुनावणी झाली होती, मात्र सर्वोच्च न्यायालयाने बाबा रामदेव यांचा माफीनामा फेटाळला होता. या माफीनाम्यावर आज दोन्ही बाजूंनी युक्तिवाद मांडला.
10 एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीत खंडपीठाने बाबा रामदेव यांना फटकारले होते. बाबा रामदेव आणि पतंजली यांनी जाणूनबुजून आदेशाचे उल्लंघन केल्याचे खंडपीठाने म्हटले होते. त्यामुळे माफी स्वीकारली जात नाही, कडक कारवाईसाठी तयार राहा. सर्वोच्च न्यायालयाने उत्तराखंड राज्य परवाना प्राधिकरणालाही फटकारले होते.
बाबा रामदेव आणि पतंजली यांच्यावर इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) दिशाभूल करणाऱ्या जाहिराती दाखवल्याचा आणि जारी केल्याचा आरोप केला आहे. 17 ऑगस्ट 2022 रोजी याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका गांभीर्याने घेत सर्वोच्च न्यायालयाने 21 नोव्हेंबर 2023 रोजी पतंजलीला कोणत्याही उत्पादनाच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिराती देऊ नयेत असे निर्देश दिले. आदेश असूनही जाहिराती दाखविण्यात आल्यावर सर्वोच्च न्यायालयाने 27 फेब्रुवारी 2024 रोजी पतंजलीला फटकारले.