गुजरात दंगलीनंतर सरकाविरोधात कट रचल्याच्या आरोपांखाली सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांना मुंबईत अटक करण्यात आली होती. त्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून त्या तुरुंगात आहे. त्यात आता सर्वोच्च न्यायालयाने तिस्ता सेटलवाड यांना मोठा दिलासा दिला आहे. तिस्ता सेटलवाड यांचा अंतरित जामीन न्यायालयाने मंजुर केला आहे. तीन न्यायाधीशांच्या बेंचने हा निर्णय दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यू यू ललित, न्यायामूर्ती एस. रवींद्र भट आणि न्यायमूर्ती सुधांशू भट यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी संपन्न झाली. गुजरात दंगलप्रकरणी खोटी कागदपत्रे तयार करुन अनेकांना त्यामध्ये गोवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप सेटलवाड यांच्यावर करण्यात आला होता.
तिस्ता सेटलवाड यांना २५ जून रोजी अहमदाबाद क्राइम ब्रँचने त्यांच्या एनजीओशी संबंधित एका प्रकरणात अटक केली होती. त्यांनी जामीनासाठी उच्च न्यायालयामध्ये अर्ज केला होता. मात्र, उच्च न्यायालयाने ३ ऑगस्टला असलेलली सुनावणी सहा आठवड्यांसाठी पुढे ढकलली होती. त्याविरोधात सेटलवाड यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलेली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर करत दिलासा दिला आहे.