वीजबिलाचा भरणा केलेल्या धनादेशाचा कोणत्याही कारणामुळे चेक बाऊंस झाल्यास ३५० रुपयांऐवजी आता १५०० रुपये दंड किंवा बँक चार्जेस यापैकी जी रक्कम जास्त असेल त्या रकमेचा दंड लावण्यात येणार आहे.
वीजबिल भरण्याच्या अंतिम मुदतीपूर्वी दिलेला धनादेश वटणे आवश्यक असते. त्यानंतरच बिलाची रक्कम प्राप्त झाल्याची नोंद होते. परंतु अनेक वीजग्राहक अंतिम मुदतीच्या एक - दोन दिवसांपूर्वी धनादेशाद्वारे वीजबिलाची रक्कम भरतात. धनादेश वटण्यास साधारणतः तीन ते चार दिवसांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे ग्राहकाने देय तारखेपूर्वी कार्यालयीन कामकाजाच्या तीन दिवस अगोदर धनादेश देणे आवश्यक आहे. मुदतीनंतर वीजबिलाचा भरणा झाल्यास संबंधीत ग्राहकांना धनादेशद्वारे भरलेली रक्कम थकबाकी म्हणून पुढील बिलात लागून येते किंवा कोणत्याही कारणाने धनादेश अनादर (बाऊंस) झाला तर आर्थिक दंडासह वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाते.