Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गुरपतवंत सिंग पन्नू प्रकरण : आरोपी निखिल गुप्ताला अमेरिकेत नेण्यात आलं, भारताच्या अडचणी वाढतील?

Gurpatwant singh Pannu
, मंगळवार, 18 जून 2024 (00:18 IST)
अमेरिकेच्या भूमीवर शीख फुटीरतावादी नेते गुरपतवंत सिंग पन्नू यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप असणाऱ्या निखिल गुप्ता यांना चेक प्रजासत्ताकमधून अमेरिकेत आणण्यात आलं आहे.
52 वर्षांच्या निखिल गुप्ता यांना लोअर मॅनहॅटनच्या न्यायालयात सादर केलं जाऊ शकतं. निखिल गुप्ता यांच्यावर लावण्यात आलेले आरोप सिद्ध झाल्यास त्यांना 20 वर्षांची शिक्षा होऊ शकते.
 
‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीनुसार, गुप्ता यांना मागच्या आठवड्याच्या शेवटी अमेरिकेत आणण्यात आलं. निखिल गुप्ता यांना 30 जून 2023 रोजी चेक प्रजासत्ताकमध्ये अटक करण्यात आली होती.
 
अमेरिकन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, निखिल गुप्ता यांच्यावर शीख फुटीरतावादी गुरपतवंत सिंग पन्नू यांच्या हत्येची सुपारी दिल्याचा आरोप आहे.
 
अमेरिकेच्या वकिलांनी असा आरोप केला आहे की, एका अज्ञात भारतीय अधिकाऱ्याकडून गुरपतवंत सिंग पन्नू यांची हत्या करण्यासाठी गुप्ता यांना सूचना मिळाल्या होत्या.
 
निखिल गुप्ता यांना सुपारी देणारा अधिकारी भारताच्या सीआरपीएफमध्ये कार्यरत असल्याचं आरोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे. आरोपपत्रानुसार, निखिल गुप्ताने ज्या मारेकऱ्याशी संपर्क साधला तो अमेरिकन गुप्तचर विभागाचा एजंट होता.
 
या एजंटने निखिल गुप्ताच्या सर्व हालचाली आणि संभाषण रेकॉर्ड केलं आहे. त्याआधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
भारताकडून हे आरोप फेटाळून लावण्यात आले होते. या कथित कटाशी आमचा काहीही संबंध नसल्याचं भारताने स्पष्ट केलं होतं.
 
मागच्या महिन्यात, चेक प्रजासत्ताकच्या घटनात्मक न्यायालयात निखिल गुप्ता यांच्या प्रत्यार्पणाविरोधात दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली होती. निखिल गुप्ता यांनी त्यांचं अमेरिकेत प्रत्यार्पण होऊ नये यासाठी ही याचिका तिथे दाखल केली होती.
 
तुरुंगातील नोंदीनुसार, निखिल गुप्ता यांना सध्या ब्रुकलिनमधील फेडरल मेट्रोपॉलिटन डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आहे.
 
बीबीसीने त्याच्या वकिलांशी संपर्क साधला आहे, परंतु अद्याप उत्तर मिळालेलं नाही.
 
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अमेरिकन वकिलांनी आरोप केला होता की, निखिल गुप्ता याने पन्नू यांच्यासह चार शीख फुटीरतावादी नेत्यांच्या हत्येचा कट रचला होता.
 
या फिर्यादींचा आरोप आहे की निखिल गुप्ता यांनी पन्नू यांची हत्या करण्यासाठी, एका भाडोत्री मारेकऱ्याला एक लाख डॉलर्स म्हणजेच 83.50 लाख रुपये दिले होते.
 
कोण आहे निखिल गुप्ता?
आरोपानुसार, मे 2023 मध्ये या अधिकाऱ्याने निखिल गुप्ताला अमेरिकेत हत्या घडवून आणण्याचं काम सोपवलं.
 
दस्तावेजानुसार, निखिल गुप्ता भारतीय नागरिक असून तो भारतात राहतो.
 
गुप्ताने मारेकऱ्याशी संपर्क साधण्यासाठी गुन्हेगारीतील एका जवळच्या व्यक्तीशी संपर्क साधला. खरं तर, ही व्यक्ती अमेरिकन गुप्तचर संस्थेचा विश्वसनीय स्रोत होती.
 
अमेरिकन गुप्तचर संस्थेच्या विश्वसनीय सूत्राने गुप्ताची ओळख अमेरिकन एजन्सीच्या दुसऱ्या एका गुप्तहेर एजंटशी करून दिली.
 
गुप्ता आणि त्या गुप्तहेर एजंटमध्ये एक लाख अमेरिकन डॉलर्सचा व्यवहार झाला. त्याबदल्यात हत्या केली जाईल असा करार करण्यात आला.
निखिल गुप्ताने न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन येथील त्याच्या संपर्कातील एका दुसऱ्या अमेरिकन एजंटद्वारे पंधरा हजार अमेरिकन डॉलर्स दिले.
हत्येसाठी दिलेली ही आगाऊ रक्कम होती. त्याचा व्हीडिओही एजंटने रेकॉर्ड केला असून तो खटल्यात सादर करण्यात आला आहे.
 
आरोपानुसार, हे काम देणाऱ्या भारतीय अधिकाऱ्याने जून 2023 मध्ये गुप्ताला ज्या व्यक्तीची हत्या करायची आहे त्याची माहिती दिली. गुप्ताने ही माहिती अमेरिकन एजंटला पुरवली.
 
यामध्ये त्या व्यक्तीचे फोटो आणि घराचा पत्ताही होता.
 
आरोपानुसार, अमेरिकेच्या विनंतीनंतर निखिल गुप्ताला अटक करण्यात आली होती.
 
प्रकरण नेमकं कुठे फसलं?
आरोपपत्रात दावा करण्यात आला आहे की, भारतीय अधिकाऱ्याने मे महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात एनक्रिप्टेड अॅप्लिकेशनद्वारे निखिल गुप्ता याच्याशी संपर्क साधला होता.
 
भारतीय अधिकाऱ्याने एका फौजदारी खटल्यात गुप्ताला मदत करण्याचं आश्वासन देत हत्या घडवून आणण्याची जबाबदारी दिली.
 
इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनद्वारे निखिल गुप्ता आणि भारतीय अधिकारी यांच्यात सतत चर्चा होत होती. याशिवाय दोघेही दिल्लीत भेटले होते.
 
आरोपपत्रात अमेरिकन एजन्सीच्या तपासाचा हवाला देत गुप्ता आणि भारतीय अधिकारी यांच्यात एनक्रिप्टेड अॅपद्वारे सतत बोलणं व्हायचं. या संभाषणादरम्यान गुप्ता दिल्ली किंवा आसपासच्या परिसरात असल्याचं म्हटलं आहे.
 
आरोपपत्रात असा दावा करण्यात आलाय की, 12 मे रोजी गुप्ताला त्याच्याविरुद्धचा फौजदारी खटला मागे घेतल्याचं सांगण्यात आलंय.
त्याला असंही सांगण्यात आलं की, इथून पुढे गुजरात पोलिसांकडून कोणीही कॉल करणार नाही.
23 मे रोजी, भारतीय अधिकाऱ्याने गुप्ताला पुन्हा आश्वासन दिलं की, त्याचं त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी बोलणं झालं असून गुजरातमधील प्रकरण संपलेलं आहे. इथून पुढे तुला तिथून कॉल येणार नाही.
 
आरोपपत्रात असा दावा करण्यात आला आहे की भारतीय अधिकाऱ्याने गुप्ताची डीसीपीसोबत भेटीची व्यवस्था केली.
 
अधिकाऱ्याकडून विश्वास मिळाल्यानंतर गुप्ता न्यूयॉर्कमध्ये हत्या करण्याच्या योजनेसह पुढे आला.
 
यासाठी गुप्ताने अमेरिकेतील गुप्तचर संस्थेच्या एका विश्वसनीय सूत्राशी संपर्क साधला आणि सांगितलं की, "ज्या व्यक्तीची हत्या करायची आहे तो न्यूयॉर्क मध्ये राहतो."
 
भारताची प्रतिक्रिया
न्यूयॉर्कमधील हत्येनंतर गुप्ताने एजंटला अमेरिका आणि कॅनडामधील आणखी काम मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते, असा दावा आरोपपत्रात करण्यात आला आहे.
 
18 जून रोजी कॅनडातील हरदीप सिंह निज्जरच्या हत्येनंतर 19 जून रोजी गुप्ताने अमेरिकन गुप्तचर संस्थेच्या एका विश्वसनीय सूत्राला ऑडिओ कॉलवर सांगितलं होतं की, "आपल्याला ग्रीन सिग्नल मिळाला आहे, तू हे काम आज किंवा उद्या कधीही पूर्ण करू शकतोस. फक्त हे काम लवकरात लवकर पूर्ण कर."
 
त्यानंतर निखिल गुप्ता 30 जून रोजी भारतातून चेक प्रजासत्ताक या देशात गेला. त्याच दिवशी अमेरिकेच्या विनंतीवरून चेक पोलिसांनी त्याला अटक केली.
 
या घडामोडीची माहिती अमेरिकेने भारताला दिली होती. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी एक निवेदन प्रसिद्ध करून म्हटलं आहे की भारताने हे आरोप गांभीर्याने घेतले आहेत.
अरिंदम बागची यांनी गुरुवारी (30 नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत सांगितलं की, या आरोपपत्रात कोणत्याही भारतीय अधिकाऱ्याचं नाव घेतलेलं नाही.
 
बागची म्हणाले, "आम्ही आधीच सांगितलं आहे की, अमेरिकेसोबतच्या द्विपक्षीय सुरक्षा सहकार्यावर झालेल्या चर्चेदरम्यान अमेरिकेच्या बाजूने संघटित गुन्हेगारी, दहशतवाद, शस्त्रास्त्र व्यापार आणि इतरांच्या संबंधाबाबत माहिती देण्यात आली होती. यावर तपास करण्यासाठी भारताने एक विशेष तपास समिती स्थापन केली आहे."
 
ते म्हणाले, "भारताच्या आंतरराष्ट्रीय संबंधांवर आणि अंतर्गत सुरक्षेवर निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी भारत सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी एक विशेष तपास समिती स्थापन केली आहे."
 
कोण आहे गुरपतवंत सिंग पन्नू?
पेशाने वकील असलेल्या पन्नूंचं कुटुंब पूर्व पंजाब मधल्या नाथू चक गावात राहायचं. नंतर ते अमृतसरजवळील खानकोट येथे स्थायिक झालं. पन्नूंचे वडील महिंदर सिंग पंजाब मार्केटिंग बोर्डाचे सचिव होते.
 
पन्नू यांना एक भाऊ आणि एक बहीण आहे. त्यांचं सुरुवातीचं शिक्षण लुधियानात झालं. पन्नू यांनी 1990 च्या दशकात पंजाब विद्यापीठातून कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं. महाविद्यालयीन जीवनापासूनच ते राजकारणात सक्रिय झाले.
 
1991-92 मध्ये पन्नू यांनी अमेरिका गाठली आणि तिथे त्यांनी कनेक्टिकट विद्यापीठात प्रवेश घेतला. इथूनच फायनान्समध्ये एमबीए केलं आणि न्यूयॉर्क विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली.
 
अमेरिकेत शिक्षण पूर्ण केल्यानंतर, पन्नू यांनी 2014 पर्यंत न्यूयॉर्कमधील वॉल स्ट्रीटवर सिस्टम विश्लेषक म्हणून काम केलं. या काळात ते राजकीयदृष्ट्याही सक्रिय होते.

Published By- Priya Dixit
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्य सरकार ने उपोषणाला बसलेल्या ओबीसी नेत्यांनी मांडलेल्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे -पंकजा मुंडे