rashifal-2026

परमबीर सिंग खंडणीप्रकरणात हवाला ऑपरेटरला गुजरातमधून अटक

Webdunia
गुरूवार, 21 ऑक्टोबर 2021 (21:51 IST)
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यांत गुजरात येथून एका हवाला ऑपरेटरला कांदिवली युनिटच्या गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. अल्पेश भगवानभाई पटेल असे या हवाला ऑपरेटरचे नाव असून अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने शनिवार २३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत अटक झालेला अल्पेश हा दुसरा आरोपी असून यापूर्वी सुमीत सिंग ऊर्फ चिंटू याला पोलिसांनी अटक केली होती तर या गुन्ह्यांत परमबीर सिंग, सचिन वाझे, विनय सिंग ऊर्फ बबलू आणि रियाज भाटीसह इतर आरोपींना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे.
 
गोरेगाव येथे राहणार्‍या विमल रामगोपाळ अग्रवाल या बांधकाम आणि हॉटेल व्यावसायिकाने ऑगस्ट महिन्यात परमबीर सिंग, सचिन वाझेसह इतर चौघांविरुद्ध खंडणी म्हणून सुमारे बारा लाख तर तीन लाख रुपयांचे दोन महागडे मोबाईल घेतल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर त्यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात संबंधित आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर परमबीर सिंग यांच्यासह इतर आरोपीविरुद्ध खंडणीसह अन्य भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. नंतर हा तपास कांदिवली युनिट गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच सुमीत सिंग ऊर्फ चिंटू याला पोलिसांनी अटक केली होती.
 
या संपूर्ण प्रकरणात अल्पेश पटेल याचा महत्त्वाचा सहभाग उघडकीस आला होता. त्यामुळे अल्पेशचा पोलीस शोध घेत होते. ही शोधमोहीम सुरु असतानाच त्याला बुधवारी गुजरात येथील मेहसाना शहरातून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. खंडणीच्या या गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अल्पेश हा हवाला ऑपरेटर असून त्याने परमबीर सिंग, सचिन वाझेसह इतरांचा काळा पैसा हवालामार्फत ट्रॉन्स्फर केल्याचा आरोप आहे. परमबीर सिंह यांच्याविरुद्ध मुंबईसह ठाण्यात आतापर्यंत पाचहून अधिक खंडणीचे गुन्हे दाखल झाले आहेत. गुन्हे दाखल होताच परमबीर सिंग हे पळून गेले असून त्यांच्याविरुद्ध मुंबई पोलिसांनी लुक आऊट नोटीस बजाविली आहे. मात्र अद्याप ते पोलिसांना सापडले नाहीत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दररोज किती अगरबत्ती लावाव्यात? धार्मिक आणि वैज्ञानिक कारणे जाणून घ्या

आपल्या मुलांना धार्मिक आणि नैतिक मूल्ये कशी शिकवाल?

तुळशीजवळ ही ५ झाडे लावणे अशुभ !

मेकअप किट शेअर करू नका, त्वचेच्या या समस्या उद्भवू शकतात

तुमचे बोलणे प्रभावी करा: संवाद कौशल्यातील (Communication Skills) गुप्त गोष्टी जाणून घ्या

पुढील लेख
Show comments