Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भाजप आणि काँग्रेसला वेगवेगळ्या जाती-धर्मातील लोकांनी किती मतदान केलं?

Webdunia
मंगळवार, 11 जून 2024 (08:44 IST)
नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आता राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)चं सरकार स्थापन झालं आहे.
 
लोकसभा निवडणुकांच्या निकालात भाजपला पूर्ण बहुमत मिळालेलं नसलं तरी 2019 च्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपचा सामाजिक आधार फारसा बदललेला नाही. वेगवेगळ्या सामाजिक घटकांमध्ये असणारा भाजपचा चाहतावर्ग अजूनही तसाच असल्याचं लोकनीती-सीएसडीएसच्या सर्वेक्षणातून समोर आलं आहे.
 
2019 मध्ये भाजपने देशभरात 303 जागा जिंकल्या होत्या, 2024च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भाजपच्या खासदारांचा आकडा 240 वर येऊन थांबला आहे.
 
2019 च्या निवडणुकीत हिंदू धर्मातील कथित उच्चवर्णीय जातींच्या 53 टक्के मतदारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, 2024 मध्ये या आकड्यात काहीही बदल झालेला नाही.
 
हिंदू धर्मातील कथित उच्चवर्णीय जातींमध्ये काँग्रेसचं समर्थन किंचित वाढलं असून, काँग्रेसच्या मित्रपक्षांना मात्र उच्चवर्णीय जातींमध्ये चांगलाच फायदा झालेला दिसून येतो.
इतर मागासवर्गातल्या पुढारलेल्या जातींमध्ये काँग्रेस आणि मित्रपक्षांचा पाठिंबा 5 ते 6 टक्क्यांनी वाढला आहे.
 
या जातींमधील 20 टक्के मतदारांनी काँग्रेसला पसंती दिली तर 15 टक्के मतदारांनी काँग्रेसच्या सहकारी पक्षांची निवड केल्याचं दिसून येतं.
 
पुढारलेल्या ओबीसीवर्गात भाजपला काहीसा फटका बसलेलं दिसून येतं, या वर्गातल्या भाजपच्या मतदारांमध्ये 2 टक्क्यांची घट झाली आहे.
 
ओबीसी प्रवर्गातील तुलनेने मागास असलेल्या जातींमध्ये भाजपच्या समर्थकांमध्ये थोडा बदल झालेला आहे, पण काँग्रेसला मात्र या प्रवर्गात मोठा फायदा झालेला दिसून येतो.
 
2019 च्या तुलनेत मागास ओबीसींमध्ये काँग्रेसला मतदान करणाऱ्या मतदारांचं प्रमाण 3 टक्क्यांनी वाढलं असून, काँग्रेसच्या सहकारी पक्षांना मतदान केलेल्या मागास ओबीसींचं मतदान 7 टक्क्यांनी वाढलेलं दिसून येतं.
2019लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजपला मिळणाऱ्या दलित मतांमध्ये 3 टक्क्यांची घट झाली आहे. भाजपच्या सहकारी पक्षांनाही 2 टक्के दलित मतांचं नुकसान झालं आहे, एवढंच नाही तर दलित मतांच्या बाबतीत काँग्रेसला देखील 1 टक्क्यांचा फटका बसला आहे.
 
काँग्रेससोबत आघाडी केलेल्या पक्षांच्या दलित मतांमध्ये मोठी वाढ झाली असून यामध्ये उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाकडे मोठ्या प्रमाणात दलित मतदार वळल्याचं दिसून आलं.
 
राज्यपातळीवरच्या एकूण आकडेवारीचा विचार केला तर उत्तर प्रदेशात दलित मतांच्या बाबतीत भाजपला मोठा फटका बसला असून इतर राज्यांमधली दलित मतेही काही प्रमाणात कमी झाली आहेत.
 
काँग्रेसला आदिवासी मतांच्या बाबतीत बसलेल्या फटक्याची काँग्रेसच्या मित्रपक्षांना मिळालेली आदिवासी मतांमुळे काही प्रमाणात भरपाई झाल्याचं दिसून येतं. कारण, काँग्रेसच्या मित्रपक्षांना आदिवासी मतांमध्ये 2 टक्क्यांचा फायदा झाला आहे.
 
2024 च्या निवडणुकीत भाजपसाठी एक आनंदाची बातमी आहे आणि ती म्हणजे 2019 च्या तुलनेत भाजपला 5 टक्के अधिक आदिवासी मतं मिळाली आहेत.
 
भाजपला मिळालेल्या मुस्लिम समाजाच्या मतांमध्ये एक टक्क्याची घसरण झाली असली तरी भाजपच्या मित्रपक्षांनी ही कसर भरून काढल्याचं दिसतंय.
 
काँग्रेसला मिळालेल्या मुस्लिम मतांमध्ये मात्र मोठी वाढ झाली आहे. 2019 च्या तुलनेत काँग्रेसला मिळालेल्या मुस्लिम मतांमध्ये 5 टक्के वाढ झाली आहे. पण काँग्रेसच्या मित्रपक्षांनी मात्र मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतांना त्यांच्याकडे आकर्षित केल्याचं दिसत आहे.
 
सीएसडीएसच्या आकडेवारीनुसार, 2019च्या तुलनेत काँग्रेसच्या मित्रपक्षांना मिळालेल्या मुस्लिम मतांमध्ये 15 टक्क्याची घसघशीत वाढ झालेली दिसून येते. यामध्ये उत्तर प्रदेशातला समाजवादी पक्ष आणि बिहारचा राष्ट्रीय जनता दल यांचा मोठा वाटा आहे.
 
राजधानी दिल्लीत आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांच्या आघाडीमागे मुस्लिम मतदार एकवटलेला दिसून आला. एकंदरच देशात इंडिया आघाडीला वाढलेल्या मुस्लिम मतांचा मोठा फायदा झाल्याचं दिसून आलं.
 
लोकसभेतील जागांच्या बाबतीत भाजपच्या जागा मोठ्या प्रमाणावर कमी झालेल्या असल्या तरी त्यांच्या समर्थकांमध्ये फारशी मोठी घट झालेली नाही. याचं कारण अगदी साधं सरळ आहे आणि ते म्हणजे राष्ट्रीय पातळीवर भाजपला मिळालेल्या एकूण मतांमध्ये फारसा फरक पडलेला नाही.
 
2019 मध्ये भाजपला 37.6% मतं मिळाली होती, 2024 मध्ये यात फक्त एका टक्क्याची घट झाली आहे, 2024 मध्ये भाजपला देशभरात 36.6% मतं मिळाली.
 
अर्थात सरकार बनवण्यासाठी खासदारांची संख्या हे अत्यंत महत्त्वाचं परिमाण असलं तरी खासदारांच्या आकड्यापलीकडे जाऊनही या निकालाकडे पाहिलं पाहिजे.
वेगवेगळ्या आर्थिक स्तरातल्या मतदारांचा कल
2024 च्या निवडणुकीत गरीब आणि कमी उत्पन्न गटातील मतदारांचा कौल सगळ्यात महत्त्वाचा आहे कारण मागच्या दोन निवडणुकांमध्ये (2014 आणि 2019) भाजपला मिळालेल्या गरीब आणि श्रीमंत प्रवर्गातील मतांमध्ये एक मोठा फरक दिसून येत होता.
 
2014 आणि 2019 च्या निवडणुकीत गरीब आणि कमी उत्पन्न गटातील मतदारांपेक्षा श्रीमंत आणि मध्यमवर्गातली मतं भाजपकडे मोठ्या प्रमाणात वळल्याचं दिसून आलं.
 
2024च्या निवडणुकीत भाजपच्या गरीब आणि श्रीमंत मतदारांमध्ये असणारा फरक अगदीच कमी झाला आहे.
 
लोकनीती-सीएसडीएसने मतदानानंतर केलेल्या सर्वेक्षणात असं आढळून आलं की, भाजपला 2024च्या निवडणुकीत स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आला नसला तरी कमी उत्पन्न गटातील एक मोठा मतदारवर्ग भाजपकडे वळला आहे.
 
आकडेवारीचा विचार केला तर 37टक्के गरीब मतदारांनी भाजपला मतदान केलं तर 21 टक्के मतदारांनी काँग्रेसवर विश्वास दाखवला.
 
भाजपचे मित्रपक्ष मात्र गरिबांची 6 टक्के मतंच त्यांच्याकडे वळवू शकले. त्या तुलनेत काँग्रेसच्या मित्रपक्षांनी गरिबांची 14 टक्के मतं मिळवली आहेत.
 
त्याचप्रमाणे, भाजपला कमी उत्पन्न गटातील मतदारांची 35 टक्के मतं मिळाली आहेत. काँग्रेसला मिळालेल्या मतांपेक्षा ही मतं 13 टक्के जास्त आहेत. मध्यमवर्गीयांकडून मिळालेल्या मतांच्या बाबतीत भाजपने काँग्रेसवर असणारी आघाडी कायम ठेवली आहे.
 
उच्च वर्गाच्या बाबतीत मात्र भाजपने मोठी आघाडी घेतली असून, उच्च वर्गातली 41% मतं भाजपला मिळाली आहेत.
 
विशेष म्हणजे 2019 च्या तुलनेत भाजपला मतदान करणाऱ्या उच्च वर्गाच्या (41%) प्रमाणात घट झाली आहे.
 
या निवडणुकीत भाजपला मध्यमवर्गीयांकडून मिळालेल्या पाठिंब्यामध्ये 3 टक्क्यांची किरकोळ घट झालेली दिसून येते.
कनिष्ठ मध्यमवर्गातील 35 टक्के मतं भाजपला मिळाली असून मागच्या निवडणुकीत हा आकडा 36 टक्क्यांच्या घरात होता. असं असलं तरी लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे 2014 पासून भाजपला गरीब मतदारांकडून मिळालेल्या मतांमध्ये सातत्याने वाढ होत आहे आणि या निवडणुकीत हे प्रमाण वाढून 37 टक्के झाले आहे.
 
सत्ताधारी भाजप सरकारच्या विविध कल्याणकारी योजना विशेषत: मोठ्या प्रमाणात गरीब जनतेसाठी मोफत रेशनच्या योजनेचा भाजपला फायदा झाल्याचं दिसून येतं.
 
Published By- Priya Dixit 
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

फायनान्शिअल मॅनेजमेंट कोर्स मध्ये एमबीए करा

Vaginal Itching योनीला दररोज खाज येते? या 3 प्रभावी घरगुती उपायांनी आराम मिळवा

Beauty Advice : घरीच बनवा केमिकल फ्री ब्लश

शिंक येणे नेहमीच अशुभ नसते, जाणून घ्या कधी शुभ असते

Margashirsha Guruvar 2024 मार्गशीर्ष गुरुवार कधी पासून? किती गुरुवार, संपूर्ण माहिती जाणून घ्या

पुढील लेख
Show comments