गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रकृतीवर उलट-सुलट चर्चा सुरू होती. या पार्श्वभूमीवर अखेर अमित शहांनी या अफवाकारांना प्रत्युत्तर दिलं असून आपल्या ट्वीटरवरून त्यांनी एक जाहीर पत्रकच प्रसिद्ध केलं आहे.
अफवा पसरवणाऱ्यांविषयी अमित शहांनी या जाहीर पत्रामध्ये उल्लेख केला आहे. ‘गेल्या काही दिवसांपासून काही मित्रांनी सोशल मीडियावर माझ्या प्रकृतीविषयी अफवा पसरवल्या आहेत. काहींनी तर थेट माझ्या मृत्यूविषयी देखील चर्चा केली. देशात सध्या कोरोनाचं संकट असून मला गृहमंत्री म्हणून मला रात्री उशिरापर्यंत काम करावं लागत असल्यामुळे या अफवांकडे लक्ष देता आलं नाही. पण माझ्या पक्षाच्या लाखो कार्यकर्त्यांना या अफवांमुळे चिंता होऊ लागली असून त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. त्यामुळे मी आज स्पष्ट करतोय की मी पूर्णपणे निरोगी आहे आणि मला कोणताही आजार झालेला नाही. असं म्हणतात की अशा प्रकारच्या अफवा तुमची प्रकृती अजून चांगली करतात. त्यामुळे मला आशा आहे की हे अफवा पसरवणारे लोकं मला माझं काम करू देतील आणि तेही त्यांची कामं करतील. ज्यांनी या अफवा पसरवल्या, त्यांच्याबद्दल माझ्य मनात अजिबात दुर्भावना नाही’, असं अमित शाह म्हणाले आहेत.