Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हेन्री किसिंजर यांनी केलेल्या अपमानाचा इंदिरा गांधींनी 'असा' बदला घेतला होता

Webdunia
शनिवार, 2 डिसेंबर 2023 (15:04 IST)
काही लोकं हेन्री किसिंजर यांना मुत्सद्देगिरी आणि राजकीय कौशल्याचा महारथी मानत होते, परंतु इतर अनेकांसाठी ते एक कुटील राजकारणी होते, ज्यांनी अमेरिकेच्या ताकदीचा धाक दाखवून आपली कामं करून घेतली.
 
1971 च्या युद्धात भारतासोबत त्यांचा छत्तीसचा आकडा होता. 2005 मध्ये, जेव्हा व्हाईट हाऊसच्या गुप्त टेप्स सार्वजनिक केल्या गेल्या, तेव्हा त्यांनी भारत आणि इंदिरा गांधींबद्दल अपशब्द वापरत असल्याचं ऐकण्यात आलेलं. नंतर त्यांनी याबद्दल माफीही मागितली.
 
1971 च्या युद्धात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन आणि त्यांचे सुरक्षा सल्लागार हेन्री किसिंजर पूर्णपणे पाकिस्तानच्या पाठीशी उभे राहिले होते.
 
पाकिस्तानी लष्कराने लष्करी बळावर स्वातंत्र्य चळवळ चिरडायला सुरुवात केली, तेव्हा अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याची पहिली प्रतिक्रिया पाकिस्तानी लष्कराच्या अत्याचाराचा निषेध करणारी होती.
 
पूर्व आणि दक्षिण आशियाई प्रकरणांचे तत्कालीन सहाय्यक राज्य सचिव क्रिस्टोफर वॉन हॉलेन यांनी 'एशियन सर्व्हे' मासिकाच्या एप्रिल 1980 च्या अंकात 'द टिल्ट पॉलिसी रिव्हिजिटेड' शीर्षकाच्या लेखात लिहिलेलं, 'राज्य, संरक्षण आणि सीआयए अधिकाऱ्यांची आंतरविभागीय बैठक ज्यामध्ये हेन्री किसिंजर यांचे स्वतःचे काही सहयोगीही सामील होते, ज्यांनी हा निष्कर्ष काढला की पाकिस्तानी सैन्याच्या क्रूरतेचे निमित्त करून भारताशी जवळीक साधणं हे अमेरिकेच्या हिताचं ठरेल.
 
पण किसिंजर या मूल्यमापनाशी सहमत नव्हते. पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणावाकडे स्थानिक दृष्टिकोनातून पाहण्याऐवजी अमेरिका आणि सोव्हिएत युनियनमधील तणावाच्या दृष्टीकोनातून ते पाहू लागले.
 
वॉल्टर आयझॅकसन हेन्री किसिंजर यांच्या चरित्रात लिहितात, "भारत आणि पाकिस्तानच्या संदर्भात किसिंजरने नैतिकता बाजूला ठेवली आणि वास्तववादाला प्राधान्य दिलं. दुसरं म्हणजे, त्यांनी हा संघर्ष पूर्णपणे सोव्हिएत-अमेरिकन स्पर्धेच्या दृष्टिकोनातून पाहिला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्या पंतप्रधान इंदिरा गांधींबद्दलच्या भारतविरोधी भूमिकेमुळे पाकिस्तानला पाठिंबा देण्याच्या किसिंजर यांच्या धोरणालाही प्रोत्साहन मिळालं.
 
निक्सन आणि किसिंजर यांच्याकडून इंदिरा गांधींसाठी अपशब्दांचा वापर
ही कटुता इतकी वाढली की नोव्हेंबर 1971 मध्ये जेव्हा इंदिरा गांधी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेल्या तेव्हा रिचर्ड निक्सन यांनी त्यांना त्यांच्या कार्यालयाबाहेर 45 मिनिटं वाट पाहायला लावली.
 
कॅथरीन फ्रँक इंदिरा गांधींच्या चरित्रात लिहितात, "इंदिरा गांधींनी मोठ्या संयमाने या अपमानाचा बदला घेतला. त्यानंतर झालेल्या बैठकीत त्यांनी पाकिस्तानचा उल्लेखही केला नाही आणि अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाबाबत निक्सन यांना तिखट प्रश्न विचारले. अभ्यासात कमकुवत असलेल्या विद्यार्थ्याचे मनोबल वाढवण्यासाठी प्राध्यापक ज्या पद्धतीने बोलतात त्या पद्धतीने इंदिराजी निक्सन यांच्याशी बोलल्या."
निक्सन यांनी भावनाशून्य विनयशीलतेने कसा तरी आपला राग गिळून टाकला. बैठकीनंतर किसिंजर यांनी आपल्या राष्ट्राध्यक्षांची भरपूर प्रशंसा केली आणि इंदिरा गांधींबद्दल असंसदीय भाषा वापरली.
 
गॅरी बास, त्यांच्या 'द ब्लड टेलिग्राम इंडियाज सिक्रेट वॉर इन ईस्ट पाकिस्तान' या पुस्तकात लिहितात, “स्वतःची पाठ थोपटवत निक्सन यांनी किसिंजर यांना सांगितलं, 'आम्ही त्या ‘महिले’ला किरकोळ मुद्द्यांवर थोडी मोकळीक दिली. पण खऱ्या प्रश्नांवर आम्ही एक इंचही मागे हटलो नाही.
 
यावर किसिंजरही त्याच्याकडे पाहून हसले आणि मस्का लावत म्हणाले, "तुम्हाला दिसत नाही का आम्ही त्यांना चारही बाजूंनी कसं घेरलंय. अध्यक्ष महोदय, जरी ती एक * आहे, तरी इथून बाहेर पडून ती हे नाही सांगू शकत की अमेरिकेने तिची दातखीळ बसवली आहे. तुम्ही तिच्याशी कठोरपणे वागला नाहीत हे चांगलं केलं नाहीतर ती रडतच भारतात परतली असती.”
 
भारत-पाकिस्तानबाबत किसिंजर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयात मतभेद
चीनच्या गुप्त दौऱ्यावरून परतल्यानंतर त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन आणि त्यांच्या सल्लागारांसमोर या प्रवासाचं विश्लेषण सादर केलं.
 
सेमर हर्श त्यांच्या 'द प्राइस ऑफ पॉवर' या पुस्तकात लिहितात, "किसिंजर म्हणाले की, जर भारताने पाकिस्तानवर हल्ला केला तर चीन पाकिस्तानला मदत करण्यासाठी पुढे येईल. असे झाल्यास सोव्हिएत संघ भारताच्या बाजूने मैदानात उतरेल. अमेरिकेने पाकिस्तानच्या पाठिशी उभं राहिले पाहिजे जेणेकरून भारत पाकिस्तानवर हल्ला करण्याचा विचार करू शकणार नाही किंवा सोव्हिएत युनियनला या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची संधीही मिळता कामा नये.
 
किसिंजर यांच्या या मूल्यमापनाशी अमेरिकेचं परराष्ट्र मंत्रालय सहमत नव्हतं. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झालं तर चीनला हस्तक्षेप करण्याची संधी मिळू नये यासाठी अमेरिकेने भारताला पाठिंबा दिला पाहिजे, असं त्यांचं मत होतं.
 
जेव्हा हे वरिष्ठ समीक्षा गटासमोर ठेवण्यात आलं तेव्हा किसिंजर संतापले. ते म्हणाले, “राष्ट्राध्यक्ष नेहमीच सांगत आले आहेत की आपण पाकिस्तानला पाठिंबा दिला पाहिजे. पण मला अगदी उलट ऑफर दिली जातेय. कधी कधी वेड्यांच्या घरात बसल्यासारखं वाटतं.”
 
निक्सन यांच्याशी झालेल्या चर्चेत किसिंजर यांनी सक्रिय भूमिका बजावलेली
ऑगस्टमध्ये भारताने सोव्हिएत युनियनशी मैत्रीचा करार केला तेव्हा किसिंजर यांचा राग आणखी वाढला.
 
पण हा करार म्हणजे एक प्रकारे किसिंजर यांच्या चीनच्या गुप्त भेटीला भारताने दिलेलं उत्तर आहे, याचा अंदाज अमेरिका लावू शकली नाही.
 
किसिंजर यांचे चरित्रकार वॉल्टर आयझॅकसन लिहितात, "पाकिस्तानचा मित्र असलेल्या चीनशी संबंध प्रस्थापित करून अमेरिकेने भारताला सोव्हिएत युनियनच्या जवळ ढकलले." परिणाम असा झाला की इंदिरा गांधी अमेरिकेत आल्या तेव्हा दोन्ही बाजूंनी उदासीनता दाखवली गेली.
 
पुढे किसिंजर यांनी या भेटीचा उल्लेख करताना त्यांच्या 'द व्हाईट थाउजंड इयर्स' या पुस्तकात लिहिलं की, "कोणत्याही परदेशी नेत्याशी निक्सन यांची ही सर्वात वाईट आणि दुर्दैवी बैठक होती."
या संभाषणात रिचर्ड निक्सन यांच्यापेक्षा हेन्री किसिंजर अधिक सक्रिय भूमिका बजावत असल्याचं इंदिरा गांधींना आश्चर्य वाटलं.
 
निक्सन काही मिनिटे बोलायचे आणि मग किसिंजर यांच्याकडे वळायचे आणि विचारायचे, "हे बरोबर आहे का, हेन्री?"
 
मग किसिंजर बोलायला सुरू करायचे.
 
मग निक्सन काही शब्द बोलायचे आणि किसिंजर यांना विचारायचे, 'तुम्हीही यावर काही बोलाल का?' नंतर इंदिरा म्हणाल्या, "निक्सनऐवजी किसिंजर यांच्याशी बोलले असते तर बरं झालं असतं.”
 
अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याला पाकिस्तानकडे झुकण्यास प्रवृत्त केले
22 नोव्हेंबर 1971 रोजी बंगाली फुटीरतावाद्यांच्या समर्थनार्थ भारतीय सैन्याने सीमा ओलांडून पूर्व पाकिस्तानमध्ये प्रवेश केला, तेव्हा किसिंजर हे जगातील अशा काही लोकांपैकी एक होते ज्यांना विश्वास होता की या घटनेमुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध होईल.
तर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्रालय या घडामोडींकडे फारसं लक्ष देत नव्हतं. पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष याहिया खानही म्हणत होते की त्यांना अजूनही आशा आहे की युद्ध टाळता येईल.
 
3 डिसेंबर रोजी यूएस क्रायसिस कमिटीच्या बैठकीत किसिंजरने परराष्ट्र खात्याने निक्सन यांचा पाकिस्तानकडे असलेला कल मान्य करावा अशी मागणी केली.
 
किसिंजर म्हणाले, "प्रत्येक अर्ध्या तासाने मला राष्ट्राध्यक्षांकडून फटकारलं जात होतं की आपण भारताबाबत कठोर भूमिका का घेत नाही आहोत? मला आश्चर्य वाटतंय की आपण त्याच्या इच्छेचं पालन का करत नाही आहोत?”
 
वॉल्टर आयझॅकसन लिहितात, "किसिंजर निक्सनच्या वतीने केवळ सूचना देत नव्हते तर त्यांना भारताबाबत अधिक कठोर भूमिका घेण्यास प्रवृत्त करत होते."
 
5 डिसेंबरला त्यांनी निक्सनला सांगितलं की, "जर पाकिस्तान हरला तर सोव्हिएत युनियनच्या नजरेत आमची प्रतिष्ठा कमी होईल. चिनी लोकांनाही ते आवडणार नाही. पण भारत जिंकला तर इतर ठिकाणी फुटीरतावादी चळवळी सुरू होतील आणि सोव्हिएत युनियनलाही इतर ठिकाणी हस्तक्षेप करण्यास प्रोत्साहन मिळेल."
 
दुसर्‍या बैठकीत ते अधिक स्पष्टपणे निक्सन यांना म्हणाले, “आम्हाला हे कोणत्याही परिस्थितीत मान्य नाही की रशियाच्या मित्राशी झालेल्या लढाईत आपला आणि चीनचा मित्र पराभूत व्हावा."
 
अमेरिकन आणि सोव्हिएत दबावामुळे भारताने युद्धविराम घोषित केला
16 डिसेंबर 1971 रोजी भारताने पाकिस्तानसोबत युद्धविरामाचा प्रस्ताव ठेवला तेव्हा पाकिस्तानने तो लगेच स्वीकारला.
 
इंदिरा गांधींनी काश्मीरचा मोठा प्रदेश ताब्यात न घेता युद्धविराम जाहीर केला.
 
पण किसिंजर म्हणाले, "माझा विश्वास आहे की भारताने हा निर्णय सोव्हिएतच्या दबावाखाली बेफिकीरपणे घेतलाय. अमेरिकन दबावामुळे सोव्हिएतचा निर्णय देखील घेतला गेला, ज्यामध्ये अमेरिकेचा सातवा ताफा बंगालच्या उपसागरात पाठवणे आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची प्रस्तावित सोव्हिएत भेट रद्द करण्याचा देखील समावेश होता.”
पण 1971 च्या युद्धात पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा देऊनही पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांनी हेन्री किसिंजर यांच्यापासून अंतर राखून ठेवलं. झुल्फिकार अली भुट्टो यांनी त्यांची हकालपट्टी आणि फाशी होईपर्यंत हेन्री किसिंजर यांना जबाबदार धरलं.
 
त्यांची मुलगी बेनझीर भुट्टो यांनी त्यांच्या 'डॉटर ऑफ द ईस्ट' या आत्मचरित्रात लिहिलंय की, "माझ्या वडिलांनी किसिंजर यांना त्यांच्या पतनासाठी वैयक्तिकरित्या जबाबदार धरलं. जेव्हा बेनझीर भुट्टो पाकिस्तानच्या पंतप्रधान झाल्या तेव्हा त्यांनी अमेरिकेला पाठिंबा दिला पण हेन्री किसिंजर यांच्याशी वडिलांचं वैर कायम ठेवलं.
 
चीनची गुप्त सहल
हेन्री किसिंजर यांच्या मुत्सद्दी जीवनातील सर्वात मोठा क्षण तेव्हा आला जेव्हा ते संपूर्ण जगाला मूर्ख बनवून पाकिस्तान दौऱ्यादरम्यान चीनला पोहोचले.
 
10 जुलै 1971 रोजी न्यूयॉर्क टाईम्सच्या आतील पानांवर तीन ओळींची एक छोटी बातमी छापून आली: रावळपिंडीच्या उष्ण आणि दमट वाऱ्यापासून बचाव करण्यासाठी निक्सन यांचे सुरक्षा सल्लागार हेन्री किसिंजर यांनी पाकिस्तानच्या उत्तरेकडील थंड डोंगराळ प्रदेशातील नाथियागली येथे संपूर्ण दिवस घालवला.
 
किसिंजर यांची प्रकृती थोडीशी अस्वस्थ असल्याचं वृत्त आहे. खरी गोष्ट अशी होती की किसिंजर कधीच नथियागढीला गेले नाहीत. सायरन वाजवत आणि अमेरिकेचे झेंडे फडकवत किसिंजर यांच्या गाड्यांचा एक बनावट ताफा नाथियागलीकडे निघाला, पण किसिंजर त्यात उपस्थित नव्हते. त्यांच्या जागी त्यांचा 'डबल' गाडी चालवत होता
हेन्री किसिंजर त्यांच्या "द व्हाईट हाऊस इयर्स" या आत्मचरित्रात लिहितात, "पाकिस्तानात उतरताच पोटदुखीचं नाटक करायची माझी योजना होती. दूतावासाचे डॉक्टर मला काही औषधं देतील. माझी तब्येत अजूनही बरी नाही आणि पाकिस्तानचे अध्यक्ष याहिया खान मला एक-दोन दिवस त्यांच्या नथियागली येथील अतिथीगृहात आराम करण्याचा सल्ला देतील आणि त्यादरम्यान मी चीनशी गुप्त चर्चेसाठी बीजिंगला जाईन. पण देवाने मला या फसवणुकीची शिक्षा देण्याचं ठरवलं आणि मी माझा दिल्लीचा प्रवास पूर्ण करेपर्यंत खरोखरंच माझ्या पोटात दुखू लागलं आणि कोणालाही न सांगता आणि कोणत्याही वैद्यकीय मदतीशिवाय मला ती वेदना सहन करावी लागली."
 
पाकिस्तानी परराष्ट्र सचिवांनी किसिंजर यांना त्यांच्या वैयक्तिक कारमधून विमानतळावर सोडलं
 
9 जुलै 1971 रोजी पहाटे साडेतीन वाजता किसिंजर यांना जाग आली. त्यांनी लवकर नाश्ता केला.
 
याआधी पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव सुलतान मोहम्मद खान निरोप देण्यासाठी त्यांच्या वैयक्तिक कारमधून किसिंजर यांच्या गेस्ट हाऊसवर पोहोचले.
सुलतान खान त्यांच्या 'मेमोयर्स अँड रिफ्लेक्शन्स' या आत्मचरित्रात लिहितात, "मी सरकारी गाडी वापरत नव्हतो, कारण सकाळी एवढ्या लवकर ड्रायव्हरला फोन करणं म्हणजे लोकांचं लक्ष वेधून घेणं. माझा मुलगा रियाझने ती गाडी रात्री वापरली होती. मला त्याची चावी सापडली नाही म्हणून मी त्याच्याकडे गेलो.”
 
''जेव्हा मी त्याला उठवलं तेव्हा त्याचा पहिला प्रश्न होता, आई बरी आहे ना? एवढ्या पहाटे डॉक्टरकडे जाताय का? त्याचं समाधान करण्यासाठी मी उत्तर दिले, आपण नथियागलीला जात आहोत. डोळे मिटून तो बडबडला, पहाटे तीन वाजता नथियागली? तुमची पिढी माझ्या समजण्याच्या पलीकडे आहे.”
 
ठीक चार वाजता पाकिस्तानी लष्कराच्या वाहनांनी किसिंजर यांना इस्लामाबादच्या चकलाता विमानतळावर नेलं. त्यांच्यासोबत पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव सुलतान खानही होते.
 
पाकिस्तानातील अमेरिकेचे राजदूत फारलँड यांच्या सल्ल्यानुसार, इस्लामाबाद विमानतळावर किसिंजर यांनी पहाटे चार वाजता डोक्यावर टोपी आणि डोळ्यांवर सनग्लासेस लावले होते.
 
याहिया खान यांचा वैयक्तिक वैमानिक हे विमान उडवत होता. किसिंजर याचे विमान चकलाता विमानतळावर उघडपणे पार्क करण्यात आलेलं जेणेकरुन ते पाहणाऱ्या पत्रकारांना किसिंजर अजूनही पाकिस्तानातच असल्याचा आभास होईल.
 
चाऊ एन-लाई आणि किसिंजर यांची भेट
बीजिंगच्या लष्करी विमानतळावर दुपारी 12:15 वाजता किसिंजर यांचे विमान उतरले तेव्हा पॉलिटब्युरोच्या सर्वात ज्येष्ठ सदस्यांपैकी एक असलेल्या मार्शल ये चिएन यिंग यांनी त्यांचं स्वागत केलं.
 
बरोबर 4.30 वाजता चीनचे पंतप्रधान चाऊ एन-लाई किसिंजर यांना भेटण्यासाठी गेस्ट हाऊसवर पोहोचले. त्याच्या दुबळ्या, भावपूर्ण चेह-यावरून आत्मविश्वास ओसंडून वाहत होता. त्यांनी शिवलेला सुंदर माओ अंगरखा घातला होता.
 
किसिंजर लिहितात, "त्यांनी आपल्या मोहक हास्याने आम्हाला मोहित केलं. ते चिनी भाषेत बोलत असले तरी त्यांना इंग्रजी चांगलं कळतं असा माझाही समज झाला. मी गेस्ट हाऊसच्या दारात पोहोचलो आणि त्यांच्या स्वागतासाठी हात पुढे केला. 27 वर्षांपूर्वी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री ऍलन फॉस्टर ड्युलेस यांनी त्यांचा पुढे केलेला हातासोबत हस्तांदोलन करण्यास नकार दिला होता हे त्यांना आणि मला दोघांनाही आठवलं.”
 
"थोड्याच वेळात मला कळून चुकलं की चाऊ एन-लाई यांच्यासोबत तत्त्वज्ञान, ऐतिहासिक विश्लेषण आणि विनोदी वक्तृत्वात कुणीही बरोबरी करू शकत नाही. अमेरिकन घडामोडी आणि माझ्याबद्दलचे त्यांचं ज्ञान आश्चर्यकारक होतं.”
 
किसिंजर आणि चाऊ एन-लाई यांच्यातील भेट अनेक तास चालली.
 
किसिंजर आपला शर्ट इस्लामाबादमध्ये विसरले
संपूर्ण संभाषणादरम्यान चाऊ एन-लाय यांच्यासमोर फक्त एक छोटासा कागद ठेवण्यात आलेला ज्यावर त्यांनी टेलिग्राफिक भाषेत काही शब्द लिहिले होते.
 
किसिंजर यांनी नंतर टिप्पणी केली, "आम्ही राजकीय तत्त्वज्ञानाचे दोन प्राध्यापक एकमेकांशी बोलत असल्यासारखे बोलत होतो. किसिंजर यांनी त्यांचे सहाय्यक डेव्ह हॅल्पेरिन यांना या लांबच्या प्रवासादरम्यान, विशेषत: त्यांच्या चीन भेटीसाठी दोन स्वच्छ शर्ट्स बाजूला ठेवण्याची सूचना केली होती."
 
“पण जेव्हा ते किसिंजर यांना सोडून नथियावालीला जात होते तेव्हा त्यांना कळलं की किसिंजर यांनी ते शर्ट इस्लामाबादमध्ये सोडले होते. विमानातच किसिंजर यांना याची माहिती मिळाली. बीजिंगमध्ये उतरण्यापूर्वी त्यांनी शर्ट बदलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना कळलं की तो त्यांच्या सूटकेसमध्ये नव्हता."
किसिंजर लिहितात, "मला सहा फूट दोन इंच उंच असलेल्या जॉन हॅल्ड्रिजकडून एक शर्ट उधार घ्यायला लावला होता. त्या काळात काढलेली छायाचित्रे तुम्ही नीट पाहिलीत, तर तुमच्या लक्षात येईल की त्यामध्ये माझी मान दिसत नाही, कारण जॉनच्या गळ्याची लांबी माझ्यापेक्षा कमीतकमी एक इंच लहान होती.”
 
किसिंजर यांनी भारतीय राजदूत लक्ष्मीकांत झा यांना फोन केला
किसिंजर 11 जुलै रोजी निक्सन यांच्या चीन भेटीची तयारी करत इस्लामाबादला परतले. विमानतळापूर्वी ते नथियागढीहून परतत असल्याचे भासवण्यासाठी त्यांना नथियागढी येथे नेण्यात आले.
 
संध्याकाळी सहा वाजता किसिंजर अमेरिकेला परतण्यासाठी त्यांच्या विमानात चढले. निक्सन अमेरिकेत त्यांची आतुरतेने वाट पाहत होते. किसिंजर यांनी त्यांना विमानात चढताच 'युरेका' हा पूर्वनिश्चित कोड पाठवला असल्याने ही सहल यशस्वी झाल्याचं त्यांना माहीत होतं.
 
ज्या दिवशी हेन्री किसिंजर गुपचूप चीनला भेट दिल्याचे अमेरिका जाहीर करणार होती, त्याच दिवशी अमेरिकेतील भारताचे राजदूत लक्ष्मीकांत झा यांना एक फोन आलेला. त्यावेळी ते घराबाहेर होते. त्यांच्या भारतीय सुरक्षा रक्षकाने, ज्याला एकही इंग्रजी शब्द यायचा नाही, त्याने त्यांना सांगितलं, ‘साहेब बहादुरसाठी किशन चंदरजींचा फोन आला होता.’
 
पुपुल जयकर इंदिरा गांधींच्या चरित्रात लिहितात, “झा यांना समजलं नाही की हा किशन चंदर कोण होता? त्याने त्यांच्या सेक्रेटरीला त्यांनी सोडलेला नंबर डायल करण्यास सांगितलं. हा फोन किसिंजर यांचा होता, ज्याला त्यांचे सुरक्षा रक्षक किशन चंदर समजत होते. त्यावेळी किसिंजर लॉस एंजेलिसमध्ये होते.
 
त्यांनी भारतीय राजदूताला विचारलं, आज रात्री साडेआठ वाजता तुम्ही कुठे असणार आहात? झा म्हणाले की ते रात्रीचं जेवण करत असतील. किसिंजर यांनी त्यांचा नंबर घेतला आणि सांगितलं की ते त्यांना ठीक 8:30 वाजता कॉल करतील. हा कॉल कशासाठी असेल हे त्यांनी त्यांना सांगितले नाही. 8.30 वाजता किसिंजर यांचा फोन आला तेव्हा झा यांनी स्वतः तो उचलला.
 
किसिंजर म्हणाले, "अर्ध्या तासानंतर राष्ट्राध्यक्ष निक्सन हे जाहीर करणार आहेत की, माझ्या भारत आणि पाकिस्तान दौऱ्यादरम्यान मीही गुपचूप चीनला गेलो होतो. राष्ट्राध्यक्ष निक्सन यांची इच्छा आहे की त्यांनी त्यांचा एक संदेश पंतप्रधान इंदिरा गांधींपर्यंत पोहोचवावा. तुम्ही ते लिहून ठेवा. अमेरिका चीनसोबत राजकीय संबंध प्रस्थापित करणार आहे, असं संदेशात म्हटलं होतं. भारताने याला विरोध केला तर ती मैत्री विरोधी कृती मानली जाईल. भारत याला विरोध करेल असं राष्ट्राध्यक्ष निक्सन गृहीत धरत होते.
 
अमेरिकेच्या या पावलावर इंदिरा गांधींनी भाष्य केलं नाही. त्यांनी शांतपणे मॉस्कोला संदेश पाठवला. या घटनेनंतर बरोबर एक महिन्यानंतर 9 ऑगस्ट 1971 रोजी भारताने सोव्हिएत युनियनसोबत मैत्री करार केला.
 
Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

पुढील लेख
Show comments