ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व हमीद दलवाई यांच्या पत्नी मेहरुन्निसा हमीद दलवाई ( ८७) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे मागे रुबिना व ईला या दोन मुली आहेत. मेहरुन्निसा यांनी देहदानाचा निर्णय घेतलेला असल्याने त्यांचे पार्थिव हडपसर येथील साने गुरुजी रुग्णालयाला सुपूर्त करण्यात आले. मेहरुन्निसा यांचा जन्म १९३० मध्ये झाला. एका सामान्य मुस्लिम कुटुंबातील मेहरुन्निसा यांनी हमीद यांच्याशी विवाहबध्द झाल्यानंतर त्यांच्या विचारांप्रमाणेच आपली वाटचाल केली. हमीद यांचे सर्व सुधारणावादी विचार त्यांनी सामाजिक रोष पत्करुन दैनंदिन जीवनात रुजवले. कस पाहणा-या प्रत्येक संकटसमयी त्या हमीद दलवाई यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. मुस्लिम सत्यशोधक चळवळीमध्ये हमीद दलवाई यांच्या खांद्याला खांदा लावून मेहरुन्निसा यांनी काम केले.