Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरण : हॉस्पिटलमधला हिंसाचार आणि काही अनुत्तरित प्रश्न

Webdunia
शनिवार, 17 ऑगस्ट 2024 (15:20 IST)
कोलकात्यामधल्या आरजी कर मेडिकल कॉलेज रुग्णालयात डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून हत्या करण्यात आली.त्यानंतर या घटनेचा निषेध करण्यासाठी देशभरात आंदोलनं सुरू आहेत. आरजी कर मेडिकल कॉलेजमध्येही बुधवारी (14 ऑगस्ट) आंदोलनं करण्यात आली. पण, यात घडलेल्या एका घटनेनं प्रकरण आणखीच चिघळलेलं आहे.
 
महिला संघटना आणि नागरी संघटनांच्या लोकांनी 14 आणि 15 ऑगस्टच्या मध्यरात्री 'रिक्लेम द नाईट'च्या घोषणा देत महिलांना रस्त्यावर उतरण्याचं आवाहन केलं होतं.
 
यावेळी आरजी कर हॉस्पिटलमध्ये सुरू असलेल्या डॉक्टरांच्या आंदोलनामध्ये डॉक्टर तरुणींकडे मंचावरची जबाबदारी सोपविण्यात आली. यावेळी डॉक्टर विशाखा देखील मंचावर उपस्थित होत्या.
 
"आम्हाला खूप भीती वाटत होती"
त्या दिवशीची घटना सांगतानाही विशाखा यांच्या चेहऱ्यावर भीती दिसत होती.
 
त्या सांगत होत्या, ‘’आम्ही हॉस्पिटलमधल्या सुरक्षित स्थानी असलेल्या हॉलमध्ये आसरा घेतला. हॉलचे दरवाजे आतमधून लावले आणि जे समोर दिसत होतं ते त्या दरवाजाला लावलं, जेणेकरून कोणीही दरवाजा तोडून आत येऊ नये. आम्ही सगळे खूप घाबरलो होतो. आमच्यासोबत काहीही होऊ शकत होतं. आमच्याच सहकारी मैत्रिणीसोबत किती वाईट घडना घडली माहिती आहे ना. त्यामुळे आम्ही रात्रभर झोपले नव्हतो. सकाळ झाली तेव्हा त्या हॉलमधून बाहेर पडलो.’’
 
या प्रकरणात कोलकाता पोलिसांनी आतापर्यंत 19 लोकांना अटक केली आहे. पण, हे लोक कोण आहेत? आंदोलन स्थळी येण्याचा त्यांचा उद्देश काय होता? या प्रश्नांची उत्तरं अजून मिळालेली नाहीत.
 
इतकी गर्दी कशी जमली?
ही गर्दी कुठून आली आणि यामध्ये कोणाचा सहभाग होता हे आतापर्यंत समजू शकलं नाही.
 
पण, लाठ्या-काठ्या घेऊन आलेल्या या गर्दीनं आंदोलन स्थळाची नासधूस केली, खुर्च्यांची तोडफोड केली.
 
मात्र, ते एवढंच नुकसान करून ते थांबले नाहीत. त्यांनी हॉस्पिटलच्या इमर्जन्सी वॉर्डचीसुद्धा नासधूस केली. हे सगळं एक तास सुरू असल्याचं हॉस्पिटलचे डॉक्टर सांगतात.
दरम्यान, पोलिस आणि या गर्दीतल्या लोकांची झटापट झाली. या मध्ये गर्दीनं बॅरिकेड्स तोडले, तर काही जखमी सुद्धा झाले.
गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुरांचा वापर केला. या हिंसाचारानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी माध्यमांसोबत संवाद साधला.
पोलिस आणि या जमलेल्या गर्दीमध्ये झालेल्या झटापटीत 15 पेक्षा जास्त पोलिस जखमी झाले, असं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं.
 
पोलिसांनी अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या
पोलिसांनी गर्दीला शमवण्यासाठी अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्याचा दावा हॉस्पिटलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बीबीसीसोबत बोलताना केला.
ते सांगतात, की हॉस्पिटलच्या मुख्य दरवाज्याजवळ काही सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. त्यांचीही तोडफोड करण्यात आली.
पण, काही कॅमेऱ्यांमध्ये या गर्दीतले लोक दिसतात. त्यावरून 12 लोकांना अटक करण्यात आली. पण, हे लोक कोण आहेत? त्यांचा कुठल्या राजकीय संघटनेशी संबंध आहे का? हे सांगायला त्यांनी नकार दिला. या प्रकरणात आणखी काही लोकांना अटक होणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
 
या प्रकारानंतर रेसिडंट डॉक्टर असोसिएशनचं म्हणणं काय?
ही गर्दी जेव्हा हॉस्पिटलमध्ये घुसली त्यावेळी कमी सुरक्षारक्षक कामावर होते. त्यामुळे या गर्दीला आतमध्ये प्रवेश मिळाला, असं रेसिडंट डॉक्टर असोसिएशनचं म्हणणं आहे.
पण, घटनेच्या दुसऱ्या दिवशी मात्र या हॉस्पिटलला छावणीचं स्वरुप आलं होतं. अनेक आयपीएस अधिकारीही बंदोबस्तासाठी तैनात होते.
 
रेसिडंट डॉक्टर्स असोसिएशनचे प्रवक्ते डॉक्टर हसन मुश्ताक सांगतात, ‘’मुख्य दरवाजासमोर जमा होत असलेली गर्दी डॉक्टरांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ जमा होत असल्याचं वाटलं. कारण, या गर्दीतून 'वुई वाँट जस्टिस' असे आवाज येत होते. जवळपास एक तास ही गर्दी गेटवरच थांबली होती. त्यावेळी पोलिसांनी काही हस्तक्षेप केला नाही. पण, काही वेळातच परिस्थिती चिघळली.’’
आधी बलात्कार आणि त्यानंतर हा हिंसाचार यामुळे या वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या डॉक्टर रोमा बोरा यांचे आई-वडील आणखी घाबरले.
'घरून थोड्या थोड्या वेळाने फोन येतो. घरचे लोक खूप घाबरलेले आणि मी सुद्धा,' असं त्या सांगतात.
 
'हे' प्रश्न अजूनही अनुत्तरितच
या घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. पण, त्याचं उत्तर अद्यापही मिळू शकलं नाही. ज्या लोकांना अटक करण्यात आली ते कोण आहेत? हे पोलिस सांगायला तयार नाहीत.
 
एका पोलिस अधिकाऱ्याचं म्हणण्यानुसार आतापर्यंत 12 लोकांना अटक केली असून ते टालाठाणे पोलिस स्टेशनच्या कोठडीत आहेत इतकीच माहिती मिळतेय.
यावर पोलिस काहीही बोलायला तयार नाहीत.
या प्रकरणी एएनआयने एक ट्वीट करून माहिती दिली की आतापर्यंत 19 जणांना अटक करण्यात आली. यामधल्या पाच जणांची सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख पटविण्यात आली
इतकी गर्दी कुठून आली होती? हे सांगायला पोलिसही तयार नाहीत. तसेच हॉस्पिटलच्याजवळ असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी वेगवेगळे दावे केले आहेत.
ट्रक भरून भरून या ठिकाणी गर्दी जमवण्यात आली असं स्थानिक दुकानदारांच म्हणणं आहे, तर हे लोक आजूबाजूला राहणारे आहेत, असं एका कर्मचाऱ्यानं सांगितलं.
पण, या दाव्यांची पुष्टी होऊ शकली नाही.
 
राजकारण तापलं
ही घटना घडली तेव्हापासून बंगालमधलं राजकीय वातावरण तापलं आहे.
ही गर्दी भाजप आणि डाव्या पक्षांची आहे, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला.
दुसरीकडे शुंभेंदू अधिकारी यांनी असा या हिंसाचारातील लोक तृणमुल काँग्रेसचे गुंड होते, असा दावा केला.
शुक्रवारी (16 ऑगस्ट) सोशलिस्ट युनिटी सेंटर फॉर इंडियाने 12 तासांच्या संपाची हाक दिली असून त्यांना भाजपनं पाठिंबा दिला.
दुसरीकडे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील या घटनेच्या विरोधात शुक्रवारी रॅली काढणार आहेत. एकूण पश्चिम बंगालमधलं राजकीय वातावरण तापलं असून येत्या काळात हा संघर्ष आणखी ताणला जाऊ शकतो.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचं प्रकाशन)
Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Tulsi Vivah 2024: भगवान विष्णूने तुळशीशी लग्न का केले? जाणून घ्या तुळशी विवाहाचे नियम आणि पद्धत

तुळशीच्या रोपाजवळ शिवलिंग किंवा गणेश मूर्ती ठेवावी की नाही?

हे सुपर फूड 35 पेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी खूप महत्वाचे असतात

हार्मोनल मुरुमांच्या समस्येने त्रस्त असाल तर हा उपाय अवलंबवा

ओठांवर जास्त लिपस्टिक लावल्याने होऊ शकतात या 3 समस्या, वेळीच सावध व्हा

पुढील लेख
Show comments