सर्व सरकारी योजना आणि मोबाईलशी आधार क्रमांकाची जोडणी अनिवार्य करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. यावर येत्या सोमवारी सुनावणी होणार आहे.
मोबाईलला आधार क्रमांक जोडणे हे कोणत्याही व्यक्तीच्या खासगी अधिकारांचे उल्लंघन करणारी बाब असल्याचे सांगत बॅनर्जी यांनी आधारसक्तीला विरोध दर्शवला. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी आपण मोबाईलशी आधार क्रमांक जोडणार नाही, त्यामुळे आपला मोबाईल क्रमांक बंद झाला तरी चालेल, अशी भूमिका व्यक्त केली होती. त्याचबरोबर आपल्याप्रमाणे इतरांनीही या आधारसक्तीला विरोध करावा असे आवाहन त्यांनी केले होते. त्यानुसार, ममता बॅनर्जी यांनी आधारसक्तीविरोधात थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.