एमडीएच मसाल्याच्या जाहिरातीमध्ये दिसणारे पिळदार मिशीवाले आजोबा अर्थात धरमपाल गुलाटी देशातील 'सर्वात श्रीमंत सीईओ' बनले आहेत. विशेष म्हणजे ९४ वर्षांच्या या आजोबांनी या स्पर्धेत गोदरेज कन्झ्युमरचे आदी गोदरेज आणि विवेक गंभीर, हिंदुस्थान युनिलिव्हरचे संजीव मेहता तसेच आयटीसीचे वाय. सी. देवेश्वर यांना मागे टाकले आहे.
महाशियां दी हट्टी ही कंपनी एमडीएच नावाने प्रसिद्ध आहे. अवघे पाचवीपर्यंत शिक्षण घेतलेले धरमपाल गुलाटी हे महाशयजी या नावानेही ओळखले जातात. वयाच्या ९४व्या वर्षीही ते दररोज कारखान्यात जातात आणि डीलर्सनाही भेटतात. त्यांच्याकडे एमडीएच कंपनीच्या समभागांपैकी ८० टक्के समभाग असून कंपनीने गेल्या आर्थिक वर्षात २१३ कोटींचा नफा कमावला. ज्यापैकी २१ कोटी रुपये सीईओ गुलाटी यांच्या खात्यात जमा झाले.