Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Mulayam Singh Yadav : कुस्तीच्या आखाड्यातून राजकारणाच्या आखाड्यात आलेले 'नेताजी'

Webdunia
सोमवार, 10 ऑक्टोबर 2022 (10:40 IST)
रेहान फजल
( समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव यांचे आज सकाळी (10 ऑक्टोबर) निधन झाले आहे. त्यांचे पुत्र अखिलेश यादव यांनी याबाबत माहिती दिली.)
 
मुलायम सिंह यादव यांच्या बाबतीतला एक किस्सा उत्तर प्रदेशाच्या राजकारणात खूप प्रसिद्ध आहे. आपल्या ऐन तारुण्यात असताना मुलायम सिंह यादव कुस्ती खेळायचे. असं म्हटलं जायचं की, मैदानात शड्डू ठोकणाऱ्या यादवांचा हात जर त्यांच्या प्रतिस्पर्ध्याच्या कमरेपर्यंत पोहोचला तर त्यांच्या पकडीतून सुटणं अशक्यप्राय होतं. मग तो प्रतिस्पर्धी कितीही उंच, तगडा का असेना.
 
आजही त्यांच्या गावातले लोक त्यांच्या हा कुस्तीतला 'चर्खा डाव' विसरलेले नाहीयेत.
 
आपल्या हातांचा वापर न करता समोरच्या पैलवानाला गारद करणारा हा डाव यादवांसाठी मात्र सोपा होता.
 
मुलायम सिंह यादव यांचे चुलत बंधू प्रोफेसर राम गोपाल यांनी बीबीसीशी बोलताना एकदा सांगितलं होतं की, "आखाड्यात कुस्ती शेवटच्या टप्प्यात आली की आम्ही डोळे बंद करायचो. त्यानंतर गर्दीतून 'हो गई, हो गई' असा आवाज आला की आम्ही डोळे उघडायचो. आणि आम्हाला माहीत असायचं की आमच्या भावाने समोरच्या पैलवनाला चितपट केलंय."
 
शिक्षकी पेशात आल्यानंतर मुलायम सिंह यांनी कुस्ती पूर्णपणे सोडून दिली. पण आयुष्याच्या शेवटपर्यंत ते त्यांच्या सैफई गावात कुस्तीचं आयोजन करायचे.
 
उत्तरप्रदेश मधील काही राजकीय विश्लेषक सांगतात त्याप्रमाणे, कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना देखील मुलायम सिंह यादवांना राजकीय आखाड्यात यश मिळालं. त्याच्यामागेही कुस्ती हे एकमेव कारण होतं.
 
मुलायम सिंह यादवांमध्ये असणारी प्रतिभा ओळखली ती, प्रजा सोशालिस्ट पार्टीचे नेते नाथू सिंग यांनी. त्यांनी 1967 च्या निवडणुकीत जसवंतनगर विधानसभा मतदारसंघासाठी मुलायम सिंग यांची निवड केली आणि त्यांना तिकीट दिलं.
 
त्यावेळी मुलायम सिंह अवघ्या 28 वर्षांचे होते. ते आमदार म्हणून निवडूनही आले.
 
त्यामुळे उत्तरप्रदेश मधील सर्वात तरुण आमदार अशी त्यांची ख्याती पसरली. आमदार झाल्यानंतर त्यांनी एमएचे शिक्षण पूर्ण केलं.
 
1977 मध्ये उत्तर प्रदेशात राम नरेश यादव यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाच सरकार स्थापन झालं.
 
राम नरेश यादव यांच्या मंत्रिमंडळात मुलायम सिंह सहकार मंत्री झाले. आणि त्यावेळी त्यांचं वय होतं 38 वर्ष.
 
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत अजित सिंह यांना धोबीपछाड
चौधरी चरण सिंह हे मुलायम सिंहांना आपला राजकीय वारस तर पुत्र अजितसिंह यांना कायदेशीर वारस म्हणायचे.
 
दरम्यान, चौधरी चरण सिंह गंभीर आजारी पडले तेव्हा अजित सिंह अमेरिकेतून भारतात परत आले.
 
त्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तसेच त्यांच्या समर्थकांनी त्यांना पक्षाध्यक्ष बनण्याची विनंती केली.
 
याचा परिणाम मुलायम सिंह आणि अजित सिंह यांच्यातील वैर वाढलं. पण मुलायमसिंह यांना उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची संधी मिळाली.
 
5 डिसेंबर 1989 मध्ये लखनौच्या के. डी. सिंह बाबू स्टेडियममध्ये त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी त्यांचे अश्रू अनावर झाले होते.
 
ते आपल्या भाषणात म्हणाले की, "एखाद्या गरीबाच्या मुलाला मुख्यमंत्री बनवण्याचं लोहियांचं स्वप्न आज पूर्ण झालं."
 
'परिंदा भी पर नहीं मार सकेगा'
या काळात उत्तरप्रदेश मध्ये भारतीय जनता पक्षाचं प्रस्थ वाढत चाललं होतं. मुख्यमंत्री झाल्याबरोबर मुलायम सिंह यांनी भाजपचा बंदोबस्त करायचं ठरवलं.
 
"बाबरी मस्जिद पर एक परिंदा भी पर नहीं मार सकेगा" या त्यांच्या एका वाक्याने त्यांना मुस्लिमांच्या अगदी जवळ आणलं होतं.
 
एवढंच नव्हे तर 2 नोव्हेंबर 1990 रोजी जेव्हा कारसेवकांनी बाबरी मशिदीच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या कारसेवकांवर लाठीमार करण्यात आला.
 
जमाव ऐकत नसल्यामुळे गोळीबारही करण्यात आला. या गोळीबारात डझनाहून अधिक कारसेवक मारले गेले.
 
या घटनेनंतर भाजपच्या समर्थकांनी मुलायमसिंह यादवांना 'मौलाना मुलायम' असं नाव पाडलं.
 
4 ऑक्टोबर 1992 रोजी मुलायमसिंह यादवांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली. पण भारतीय जनता पक्षाचा चढता आलेख रोखण्यासाठी त्यांना कांशीराम यांच्या बहुजन समाज पार्टीसोबत युती करावी लागली.
 
कांशीराम यांच्यासोबतची भेट उद्योगपती जयंत मल्होत्रा यांच्या मध्यस्थीने दिल्लीतील अशोक हॉटेलमध्ये पार पडली.
 
1993 मध्ये उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुका पार पडल्या. यावेळी मुलायमसिंह यांच्या समाजवादी पक्षाला 260 पैकी 109 जागा मिळाल्या. बहुजन समाज पार्टीला 163 पैकी 67 जागा मिळाल्या.
 
तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाला 177 जागा मिळाल्या होत्या. यावेळी मुलायम सिंह यांनी काँग्रेस आणि बसपाच्या पाठिंब्यावर दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
 
मुलायम सिंह यादव यांची राजकीय कारकीर्द
1967 मध्ये पहिल्यांदा उत्तरप्रदेशच्या जसवंतनगर मतदारसंघातून आमदार झाले.
1996 पर्यंत जसवंतनगर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व
1989 मध्ये पहिल्यांदा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री
1993 मध्ये दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून निवड
1996 मध्ये मैनपुरीतून मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली
1996 ते 1998 पर्यंत युनायटेड फ्रंट सरकारमध्ये संरक्षण मंत्री
त्यानंतर संभल आणि कन्नौजमधून लोकसभेवर प्रतिनिधित्व
2003 मध्ये पुन्हा तिसऱ्यांदा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री
2007 पर्यंत यूपीचे मुख्यमंत्री राहिले.
दरम्यान 2004 साली लोकसभा निवडणुकीतही विजय मिळवला. मात्र नंतर राजीनामा दिला.
2009 मध्ये मैनपुरीमधून मतदारसंघातून लोकसभेत खासदार
2014 मध्ये आझमगढ आणि मैनपुरी या दोन्ही मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली आणि विजयी झाले.
नंतर त्यांनी मैनपुरी सीटचा राजीनामा दिला.
2019 मध्ये पुन्हा एकदा मैनपुरीतून लोकसभेवर निवडून गेले.
कांशीराम यांनी चार तास वेटिंग करायला लावलं
बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी यांची युती फार काळ टिकली नाही. याचं कारण म्हणजे, बसपाने मुलायम सिंह यादव यांच्यासमोर मोठ्या मागण्या मांडल्या.
 
किंबहुना मायावती मुलायम सिंह यांच्या कामकाजावर बारीक लक्ष ठेऊन असायच्या. जेव्हा संधी मिळायची तेव्हा सार्वजनिक ठिकाणी त्यांचा पाणउतारा करायची संधी सोडायच्या नाहीत.
 
पुढं काही दिवसांनी कांशीराम यांनीही मुलायमसिंग यादवांना डावलायला सुरुवात केली.
 
एकेकाळी उत्तरप्रदेशचे मुख्य सचिव म्हणून काम केलेले टीएस आर सुब्रमण्यम यांनी त्यांच्या 'जर्नीज थ्रू बाबुडम अँड नेतालँड' या पुस्तकात एक किस्सा लिहिलाय.
 
त्यानुसार, "कांशीराम एकदा लखनौला आले होते. ते लखनौच्या सर्किट हाऊसमध्ये थांबले होते. मुलायम सिंह यांनी भेटीसाठी वेळ मागितली आणि त्यांना भेटायला म्हणून सर्किट हाऊसवर गेले. तिथं कांशीराम इतर सहकाऱ्यांशी सल्लामसलत करत बसले होते. त्यांनी त्यांच्या स्टाफला मुलायम सिंहांना बाजूच्या खोलीत बसवायला सांगितलं."
 
"कांशीराम यांची ती बैठक सुमारे दोन तास चालली. आता बैठक संपली म्हटल्यावर मुलायम सिंहांना वाटलं आता आपल्याला बोलावतील. पण तसं काही घडलंच नाही. तासभर गेल्यावर मुलायम सिंहांनी विचारलं की आत काय सुरू आहे? तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की, कांशीराम आतमध्ये दाढी करत आहेत. त्यानंतर ते अंघोळ करतील. मुलायम सिंह बाहेर वाट पाहत बसले. याच दरम्यान कांशीराम यांनी एक झोप काढली आणि जवळपास चार तासानंतर मुलायम सिंहांना भेटायला आत बोलवण्यात आलं."
 
"त्या दोघांच्या बैठकीत नेमकं काय घडलं माहीत नाही. पण मुलायम सिंह खोलीतून बाहेर आले तेव्हा त्यांचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. ते उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री होते, पण कांशीराम त्यांना त्यांच्या गाडीपर्यंत सोडायला ही आले नाहीत."
 
त्याच दिवशी संध्याकाळी कांशीराम यांनी भाजप नेते लालजी टंडन यांच्याशी संपर्क साधला. आणि काही दिवसांनी बसपाने सरकारला दिलेलं समर्थन काढून घेतलं.
 
याआधी 2 जूनला मायावती लखनौमध्ये आल्या होत्या. त्यावेळी मुलायम सिंहांच्या समर्थकांनी मायावती ज्या गेस्ट हाऊस मध्ये थांबल्या होत्या तिथं जाऊन हल्ला केला. तसेच या गदारोळात मायावतींचा अपमान करण्याचा प्रयत्न झाला.
 
यानंतर या दोघांमध्ये जी दरी निर्माण झाली ती तब्बल दोन दशकांहून अधिक काळ टिकली.
 
मुलायमसिंह आणि अमरसिंह यांची मैत्री
29 ऑगस्ट 2003 रोजी मुलायम सिंहांनी तिसऱ्यांदा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यादरम्यान त्यांची अमर सिंह यांच्याशी गट्टी जमली.
 
मुलायम सिंहांनी अमरसिंह यांना राज्यसभेचं तिकीट दिलं. नंतर ते समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस बनले.
 
पण नंतर झालं असं की, अमरसिंहांच्या वाढत्या जवळीकतेमुळे पक्षातील बडे बडे नेते मुलायम सिंह यादवांपासून दुरावले. यात बेनीप्रसाद वर्मा यांच्यासारखी मोठी मोठी नाव होती.
 
बेनी प्रसाद वर्मा यांनी जेव्हा बीबीसीशी संवाद साधला होता तेव्हा त्यांनी ही आठवण सांगितली होती.
 
ते म्हणाले होते की, "मला मुलायम सिंह यांचा स्वभाव आवडायचा. रामनरेश यादव यांची जेव्हा मुख्यमंत्री पदावरून गच्छंती झाली तेव्हा मी यादवांच्या नावाची शिफारस केली होती. पण चरणसिंह माझ्या या शिफारशीवर हसले आणि म्हटले एवढ्या लहान उंचीच्या माणसाला कोण आपला नेता मानणार? यावर त्यांना मी लालबहादूर शास्त्री आणि नेपोलियन बोनपार्टचं उदाहरण दिलं. पण चरण सिंहांना माझा युक्तिवाद काही रुचला नाही."
 
आणि पंतप्रधानपद हुकलं...
 
1996 मध्ये युनायटेड फ्रंटच्या सरकारमध्ये मुलायमसिंह यादव संरक्षण मंत्री बनले. देवेगौडा यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला तेव्हा खरी संधी यादवांकडे होती. पण ते देशाचे पंतप्रधान होता होता राहिले.
 
यासंबंधीचा शेखर गुप्तांचा 'मुलायम इज द मोस्ट पॉलिटिकल' हा लेख इंडियन एक्स्प्रेसच्या 22 सप्टेंबर 2012 च्या अंकात छापून आला होता. यात गुप्ता लिहितात की, "नेतृत्वासाठी जे मतदान झालं त्यात मुलायम सिंह यादवांनी जीके मूपनार यांना 120-20 अशा फरकाने पराभूत केलं."
 
"पण त्यांचेच प्रतिस्पर्धी असलेल्या लालूप्रसाद यादव आणि शरद यांनी त्यांच्या या मार्गात अडथळे आणायचं ठरवलं. त्यांनी चंद्राबाबू नायडू यांनीही त्या दोघांना साथ दिली. याचा परिणाम मुलायमसिंह यांना पंतप्रधानपद मिळालं नाही. जर त्यांना पंतप्रधान पदी बसण्याची संधी मिळाली असती तर त्यांनी युती टिकवली असती."
 
विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह..
भारताच्या राजकारणात मुलायम सिंह यांच्या विश्वासार्हतेवर नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले.
 
आपलं आयुष्य त्यांनी चंद्रशेखर यांच्या मागे घालवलं. पण जेव्हा पंतप्रधान म्हणून पाठिंबा द्यायची वेळ आली तेव्हा मात्र त्यांनी विश्वनाथ प्रताप सिंग यांना पाठिंबा दिला.
 
पुढं जेव्हा व्ही. पी. सिंह यांच्यासोबत राहून त्यांचा भ्रमनिरास झाला तेव्हा मात्र ते पुन्हा चंद्रशेखर यांच्यासोबत गेले.
 
2002 मध्ये एनडीएने राष्ट्रपती पदासाठी एपीजे अब्दुल कलामांचं नाव पुढं केलं तेव्हा डाव्यांनी त्यांच्या नावाला विरोध केला. आणि कॅप्टन लक्ष्मी सहगल यांना विरोधातला उमेदवार म्हणून पुढं केलं.
 
त्यावेळी मुलायम सिंहानी डाव्यांची साथ सोडत कलाम यांना पाठिंबा देऊ केला.
 
2008 साली अणुकराराच्या मुद्द्यावरून डाव्यांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला. आणि अगदी त्याहीवेळी मुलायम सिंहांनी विरोधात जाऊन सरकारला आपला पाठिंबा देऊ केला. त्यामुळे मनमोहन सिंह सरकार तरलं.
 
2019 च्या निवडणुकीत तर त्यांनी नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत असं विधान केलं आणि लोकांच्या आश्चर्याला पारावर उरला नाही.
 
सोनिया गांधींना नकार देण्यामागचं कारण
1998 मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांचं सरकार पडलं. यावेळी त्यांनी काँग्रेसला पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलं.
 
त्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर सोनिया गांधींना 272 खासदारांचा पाठिंबा असल्याचं संगितलं. मात्र ऐनवेळी मुलायम सिंह आपण हे बोललोच नाही असं म्हटले आणि सोनिया गांधींची मोठी फजिती झाली.
 
लालकृष्ण आडवणींनी त्यांच्या 'माय कंट्री, माय लाइफ' या आत्मचरित्रात या प्रसंगाचा संदर्भ देत लिहितात की, "22 एप्रिलच्या रात्री मला जॉर्ज फर्नांडिस यांचा फोन आला. ते म्हटले की, लालजी माझ्याकडे एक चांगली बातमी आहे. सोनिया गांधींचं सरकार बनण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे विरोधात असणाऱ्यांपैकी एका महत्वाच्या व्यक्तीला भेटायचं आहे. पण ना ही बैठक तुमच्या घरी होईल ना माझ्या घरी. ही बैठक जया जेटली यांच्या सुजानसिंह पार्क येथील घरात होईल. जया तिच्या गाडीतून तुम्हाला न्यायला येईल."
 
अडवाणी पुढे लिहितात, "मी जया जेटलींच्या घरी पोहोचताच मला समोर जॉर्ज फर्नांडिस आणि मुलायमसिंह यादव बसलेले दिसले. फर्नांडिस म्हणाले की, "आमचे हे मित्र सोनिया गांधींच्या पंतप्रधान होण्याला आडमार्ग आणतील. त्यांच्या पक्षाचे 20 सदस्य गांधींच्या पंतप्रधान होण्याला विरोध करतील.' पुढं मुलायम सिंह म्हणाले की, 'पण तुम्हाला वचन द्यावं लागेल,ते म्हणजे तुम्ही सरकार स्थापनेचा दावा करणार नाही. माझी इच्छा आहे निवडणूका पुन्हा व्हाव्यात.' आणि या गोष्टीला मी ही लगेच होकार दिला."
 
मुलायमसिंह यादव यांनी दोन विवाह केले होते
मुलायम सिंह यादव यांनी 1957 मध्ये मालती देवी यांच्याशी विवाह केला होता.
 
2003 मध्ये मालती देवींच्या निधनानंतर त्यांनी साधना गुप्ता यांच्याशी दुसरा विवाह केला.
 
त्यांचं हे नातं समाजापासून बऱ्याच काळापर्यंत लपविण्यात आलं होतं. त्यांच्या या दुसऱ्या लग्नाला फक्त जवळचेच लोक उपस्थित होते.
 
या लग्नाची गोष्ट बाहेर आली ते बेहिशोबी संपत्ती प्रकरणामुळे. त्याचं झालं असं होतं की, बेहिशोबी संपत्ती प्रकरणात यादवांनी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केलं होतं. या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या दुसऱ्या पत्नीचा उल्लेख होता.
 
मुलायमसिंह यादव यांनी 2003 मध्ये साधना गुप्ता यांच्याशी लग्न केलं त्यावेळी त्यांच्या मुलाचं म्हणजे अखिलेश यादव यांचं लग्नही झालं होतं आणि त्यांना एक मूलही होतं.
 
घराणेशाहीचा आरोप
मुलायमसिंह यादव यांनी घराणेशाही रुजवल्याचा आरोप करण्यात आला. 2014 मध्ये जेव्हा लोकसभा निवडणुका पार पडल्या तेव्हा उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाला एकूण पाच जागांवर विजय मिळवता आला. हे पाचही खासदार यादव कुटुंबातील होते.
 
2012 च्या विधानसभा निवडणुकीत यश मिळवल्यानंतर मुलायम सिंहांनी त्यांचा मुलगा अखिलेश यादवला आपला उत्तराधिकारी म्हणून निवडले. पण सरकारचा रिमोट मात्र मुलायम सिंह यांच्याच हातात असल्याचे आरोप झाले.
 
याचा परिणाम 2017 च्या विधानसभा निवडणुकीत झाला. समाजवादी पक्षाने या निवडणुकीत बहुमत गमावलं आणि त्यांना सत्तेवरून पायउतार व्हावं लागलं.
 
2017 च्या विधानसभा निवडणुकांना काहीच दिवस शिल्लक असताना अखिलेश यादव यांनी मुलायम सिंह यादवांना पक्षाध्यक्षपदावरून हटवलं.
 
त्यांनी निवडणूकीच्या प्रचारात सहभाग घेतला नाही आणि पराभवाचं खापर मुलावर फोडताना म्हटले की, "अखिलेशने माझा अपमान केलाय. जो मुलगा वडिलांशी एकनिष्ठ राहू शकत नाही तो इतर कोणाशीही एकनिष्ठ राहणार नाही."
 
मुलायम सिंह यांची इच्छा नसतानासुद्धा 2019 मध्ये अखिलेश यांनी मायावतींच्या बसपसोबत युती केली. वर्षभरापूर्वी तर कोणाला या युतीचा अंदाजही नव्हता. पण मग 2019 च्या निवडणुकीत या युतीने सपाटून मार खाल्ला.

Published By -Smita Joshi

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments