Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नेपाळ दुर्घटना : तो लाईव्ह करत होता, तेवढ्यात ज्वाळा पेटल्या आणि उरला फक्त आक्रोश

Webdunia
बुधवार, 18 जानेवारी 2023 (15:36 IST)
नेपाळमधल्या भीषण अशा विमान दुर्घटनेत सत्तरहून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला. या अपघातात मृत्यूमुखी पडलेले सोनू जैस्वाल यांच्या लाईव्हस्ट्रीममध्ये शेवटचे क्षण चित्रित झाले आहेत. उत्तर प्रदेशातल्या गाझीपूर इथले चार मित्र नेपाळला पॅराग्लायडिंगसाठी जात होते. या मोहिमेकरता ते नेपाळची राजधानी काठमांडूहून पोखरा इथे जात होते. पोखरा विमानतळावर विमान उतरण्याच्या काही क्षण आधी विमान कोसळलं.
 
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हीडिओमध्ये विमानतळावर काही मिनिटात उतरणार असलेलं विमान हवेत हेलकावे खाताना दिसतं. काही सेकंदात मोठ्ठा आवाज होतो आणि वातावरणात धुराचे लोळ दिसतात. विमानात बसलेल्या प्रवाशांना पुढच्या काही सेकंदात असं काही होणार आहे याची जराशीदेखील कल्पना नव्हती.
 
या विमानात 68 प्रवाशी आणि 4 क्रू मेंबर्स होते. अपघात एवढा भीषण होता की, विमानात असलेल्यांपैकी कोणी वाचलेलं असण्याची शक्यता नाही.
 
सोनू पोखरा विमानतळावर उतरण्याचा क्षण कॅमेऱ्यात टिपत होते. त्यांनी मित्रांचे चेहरे दाखवले. मग कॅमेरा स्वत:कडे नेला. हसतमुख सोनू विमानप्रवासाचा आनंद घेताना दिसत आहेत.
 
हे लाईव्हस्ट्रीमिंग सुरु असतानाच विमान कोसळतं. क्षणार्धात आगीच्या ज्वाळा पेटलेल्या दिसतात. सगळीकडे धूर पसरलेला दिसतो. लाईव्ह सुरुच असतं. इंजिनाची बंद होत जाणारी घरघर येऊ येते. काचा दुभंगल्याचा आवाज येतो. प्रवाशांच्या किंकाळ्या आपला थरकाप उडवतात.
 
सोनू जैस्वाल यांच्या मित्रांनी तसंच घरच्यांनी हे लाईव्ह पाहिल्याचं प्रसारमाध्यमांना सांगितलं. हे सोनूच असल्याचं त्यांनी सांगितलं.
 
विमान पोखरा विमानतळाजवळच्या सेती नदीजवळ कोसळलं, त्याचवेळी सोनू यांचं लाईव्ह सुरू होतं असं त्यांचे मित्र मुकेश कश्यप यांनी सांगितलं.
 
स्थानिक पत्रकार शशिकांत तिवारी यांनी बीबीसीला सांगितलं की, "कश्यप यांनी जैस्वाल यांच्या फेसबुक प्रोफाईलवरचा व्हीडिओ दाखवला".
 
विमान उतरण्याच्या तयारीत असताना जैस्वाल यांनी लाईव्हस्ट्रीम करण्यासाठी कोणतं इंटरनेट वापरलं हे समजू शकलेलं नाही
अपघातस्थळी जैस्वाल यांचा फोन सापडल्याचं अभिषेक प्रताप शाह यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितलं. याच फोनवर लाईव्हस्ट्रीमिंग सुरु होतं आणि अपघात चित्रित झाला.
 
माझ्या एका मित्राने मला हा व्हीडिओ पाठवला. त्याला पोलीस अधिकाऱ्यांनी हा व्हीडिओ पाठवला होता. तो खरा आहे असं शाह यांनी सांगितलं.
 
दरम्यान नेपाळ प्रशासनाने या व्हीडिओच्या सत्यासत्येबाबत काहीही सांगितलेलं नाही. हा व्हीडिओ अपघात नेमका कसा झाला यासंदर्भात चौकशीसाठी यंत्रणांना उपयोगी ठरु शकतो.
 
पण या व्हीडिओचं सोनू जैस्वाल, अभिषेक कुशवाहा, अनिल राजभर आणि विशाल शर्मा यांच्या कुटुंबीयांच्या लेखी काहीच महत्त्व उरलेलं नाही, कारण त्यांनी घरातलं माणूस गमावलं आहे. आम्ही कोलमडून गेलो आहोत असं घरच्यांनी सांगितलं.
 
हे दु:ख कल्पनेपलीकडचं आहे असं अभिषेक कुशवाहा यांचे बंधू चंद्रकांत मौर्या यांनी सांगितलं. सरकारने जेवढी मदत करावी तेवढी करावी. आमच्या घरच्या माणसाचं पार्थिव लवकरात लवकरात मिळावं एवढीच आमची प्रार्थना आहे.
 
गाझीपूर इथल्या प्रशासनाने नेपाळ सरकारच्या संपकार्त असल्याचं सांगितलं. नेपाळमधल्या भारतीय दूतावासाशीही समन्वय असल्याचं त्यांनी सांगितलं. जर या चौघांच्या कुटुंबीयांपैकी कोणाला काठमांडूला जायचं असेल तरी आम्ही व्यवस्था करु असं जिल्हा दंडाधिकारी अर्याका अखुरी यांनी स्पष्ट केलं.
 
ही तरुण मुलं आनंदी आणि चांगली होती असं गावकऱ्यांनी सांगितलं. या अपघाताने आम्ही एकदमच हतबल झालो आहोत. आमचं आयुष्य नेहमीप्रमाणे शांत सुरु होतं. या अपघाताच्या बातमीने आम्ही सुन्न झालो.
 
मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई मिळावी यासाठी काही गावकऱ्यांनी आंदोलनही केलं.
 
मृत्यूमुखी पडलेले चौघही विशी-तिशीत असल्याचं समजतं, चौघेही एकमेकांचे अतिशय चांगले मित्र होते. ते चौघे 13 तारखेला नेपाळला गेले. त्यांनी पशुपतिनाथ मंदिराला भेट दिली. काठमांडू शहराच्या जवळच हे ठिकाण आहे. नेपाळला जाण्याची मूळ कल्पना सोनू जैस्वाल याचीच होती. जैस्वाल यांना तीन मुलं आहेत. आणखी एका मुलासाठी त्यांना पशुपतिनाथ मंदिरात प्रार्थना करायची होती.
 
मंदिराला भेट दिल्यानंतर रविवारी हे चौघे पोखरा इथे जायला निघाले. अन्नपूर्णा पर्वतरांगांमध्ये असलेल्या पोखराजवळ पॅराग्लायडिंग करण्याची त्यांची मनीषा होती. त्यानंतर ते काठमांडूला परतणार होते.
 
पण नियतीच्या मनात वेगळंच काहीतरी होतं असं जैस्वाल यांच्या एका नातेवाईकाने सांगितलं. या विमानात असलेल्या 68 प्रवाशांमध्ये 5 भारतीय नागरिक होते. 53 नागरिक नेपाळचेच होते. रशियाचे चार तर कोरियाचे दोनजण होते. विमानात प्रवास करत असलेल्यांमध्ये युके, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना आणि फ्रान्य या देशांचे प्रत्येकी एक नागरिक होता.
 
जैस्वाल यांचं लाईव्ह करणारा व्हीडिओ आणि विमान कोसळल्यानंतर घटनास्थळ दर्शवणारे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
 
जैस्वाल यांचे वडील राजेंद्र प्रसाद जैस्वाल यांनी हा व्हीडिओ पाहू शकणार नसल्याचं सांगितलं. सोनूच्या मित्रांकडून त्या लाईव्हबद्दल सांगितलं. आमचं आयुष्य उद्धवस्त झालं आहे. अनिल राजभर यांच्या घराजवळ सांत्वनासाठी असंख्य गावकरी जमलेले पाहायला मिळाले. पण त्यांचे वडील या सगळ्यापासून दूरच दिसले.
 
अनिल घरच्यांना कल्पना न देताच नेपाळला रवाना झाल्याचं कळलं. त्याचे वडील शेतात व्यग्र होते. अनिलने गुपचूप बॅग भरली आणि मित्रांबरोबर नेपाळला गेला असं शेजाऱ्यांनी सांगितलं. त्याच्या वडिलांना अद्यापही जे घडलं त्यावर विश्वास बसत नाहीये.
 
Published - By- Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments