Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रदीप शर्मा कोण आहेत? अँटिलिया स्फोटकं प्रकरणी प्रदीप शर्मा यांना अटक

प्रदीप शर्मा कोण आहेत? अँटिलिया स्फोटकं प्रकरणी प्रदीप शर्मा यांना अटक
, गुरूवार, 17 जून 2021 (14:44 IST)
अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात एनकाउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या मुंबईतील घरावर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) छापे टाकले आहेत. त्यांच्या अंधेरी येथील घरावर सकाळी साधारण सहा वाजता एनआयएने छापा टाकला. त्यांना अटक केल्याची माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे.
प्रदीप शर्मा यांच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. सीआरपीएफच्या 8-9 तुकड्या याठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत. यापूर्वी एप्रिल महिन्यात सलग दोन दिवस प्रदीप शर्मा यांची एनआयएकडून चौकशी करण्यात आली होती.
भाजपने सुरुवातीपासून याप्रकरणात शिवसेनेवर निशाणा साधला आहे. भाजपचे नते किरिट सोमय्या यांनी प्रदीप शर्मा यांच्या घरावरील छाप्यानंतर पुन्हा एकदा शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत.
ते म्हणाले, "शिवसेनेचे उपनेते आणि उमेदवार प्रदीप शर्मा यांच्या घरी एनआयएच्या घरी पोहचली आहे. यापूर्वी शिवसेनेचे प्रवक्ते सचिन वाझे तुरुंगात आहेत. शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांचे पार्टनर सदानंद कदम यांच्या पार्टनरने मनसुख यांची हत्या करण्यासाठी गाडी दिली होती. उद्धव ठाकरेंच्या माफिया सेनेची ही कमाल आहे."
 
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मात्र याप्रकरणी प्रतिक्रिया देण्याचे टाळले. माध्यमांनी प्रश्न विचारला असता संजय राऊत यांनी छाप्यांविषयी आपल्याला काही माहिती नसल्याचं म्हटलं आहे.
 
कोण आहेत प्रदीप शर्मा?
निवृत्ती घेतल्यानंतर प्रदीप शर्मा यांनी आपली राजकीय कारकिर्द सुरू केली होती. पालघरमध्ये नालासोपाऱ्यात शिवसेनेकडून प्रदीप शर्मा यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती.
 
शर्मा कुटुंबीय मूळचे उत्तर प्रदेशातील आग्र्याचे. मात्र, प्रदीप शर्माचे वडील महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात स्थलांतरित झाले. तिथेच ते स्थायिकही झाले. ते पेशानं शिक्षक होते.
प्रदीप शर्मा यांचा जन्म जरी उत्तर प्रदेशातील असला, तरी ते लहानपणापासूनच महाराष्ट्रात राहिले आहेत. लहानपणीच वडिलांसोबत ते धुळ्यात राहिले आणि प्राथमिक शिक्षणापासून ते एमएस्सीपर्यंत ते धुळ्यातच वाढले. शिक्षण घेतल्यानंतर एमपीएससी करून ते पोलीस सेवेत दाखल झाले.
 
पोलीस सेवेच्या आकर्षणाबद्दल सांगताना ते म्हणतात, "धुळ्यात असताना आमच्या शेजारी पगार नावाचे इन्स्पेक्टर राहायचे. लहान असताना त्यांना पाहायचो. ते युनिफॉर्मवर बाईकवर जात असत. पोलीस सेवेच्या आकर्षणासाठी ते एक कारणीभूत ठरलं म्हणता येईल."
 
महाराष्ट्रातली 1983 ची पोलिसांची बॅच सर्वांत प्रसिद्ध ठरली. या बॅचमध्ये प्रफुल्ल भोसले, विजय साळसकर, रविंद्र आंग्रे, अस्लम मोमीन असे 'एनकाउंटर स्पेशालिस्ट' म्हणून सर्वत्र परिचित असलेले पोलीस अधिकारी होते. याच बॅचमध्येच प्रदीप शर्मा हे सुद्धा आहेत.
 
नाशिक पोलीस ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर ही बॅच 1984 साली पोलीस सेवेत कार्यरत झाली. प्रदीप शर्मा यांची पहिली नियुक्ती मुंबईतल्या माहिम पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षकपदावर झाली. त्यानंतर ते स्पेशल ब्रँचमध्ये गेले. नंतर मुंबई उपनगरातील पोलीस ठाण्यांचे प्रमुख, क्राईम इंटेलिजियन्समध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशा विविध पदांवर त्यांनी काम केले.
'विजय साळकरांशी खबऱ्यांवरून वाद?'
26/11 च्या मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या विजय साळसकरांशी प्रदीप शर्मा यांचा वाद होता, अशी बरीच चर्चा माध्यमांमधून झाली.
शर्मा यांनी म्हटलं, "शहीद विजय साळसकर हे माझे जिवलग मित्र होते. 1983 मध्ये पोलीस प्रशिक्षणासाठी आम्ही एकाच स्कॉडला होतो. प्रशिक्षणात आडनावाच्या पहिल्या अक्षरापासून स्कॉड तयार केले जातात. त्यांचं साळसकर आणि माझं शर्मा आडनाव, त्यामुळं आम्ही एकाच स्कॉडला होतो. वर्षभर आम्ही एकत्र राहिलो. मुंबईत आल्यानंतरही बरीच वर्षे एकत्र होत. क्राईम ब्रांचलाही आम्ही एकत्र काम केलंय. काही मोठमोठे ऑपरेशनही आम्ही एकत्र केलेत."
 
"विजय साळसकरांसोबत केलेली कामं आजही आठवतात. सगळ्यांत जास्त इन्फर्मेशन नेटवर्क असणारा अधिकारी म्हणून आजही विजय साळसकरांना मी मानतो. माझ्यापेक्षा शंभर पटीनं जास्त नेटवर्क त्यांचं होतं," असं शर्मा सांगतात.
"साळसकर आणि माझ्यात जमत नाही, हे माध्यमांनी जे पसरवलं होतं, तसं खरंतर काहीच नव्हतं. आमची भांडणं फक्त खबऱ्यांवरून व्हायची. त्याचा खबरी असेल, तर मी त्याला ट्रॅप करायचो, माझ्या बाजूला वळवायचा प्रयत्न करायचो. माझे खबरी तो वळवायचा. अबोला असं काही नव्हतं," असंही प्रदीप शर्मा म्हणाले.
 
2009 साली रामनारायण गुप्ता उर्फ लखन भैय्या यांच्या हत्येप्रकरणी प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यासह एकूण 13 पोलीस अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. मात्र, चार वर्षे ठाणे मध्यवर्ती कारागृहात काढल्यानंतर 2013 साली प्रदीप शर्मांची सुटका झाली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भारतवंशी सत्या नडेला यांची Microsoftचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती