Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राहुल गांधी आज माध्यमांशी बोलणार, काँग्रेसची जनआंदोलनाची घोषणा

Webdunia
शनिवार, 25 मार्च 2023 (09:00 IST)
काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द केल्याच्या विरोधात काँग्रेसनं देशभरात 'जनआंदोलन' सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी (24 मार्च) संध्याकाळी नवी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात प्रमुख नेत्यांच्या बैठकीनंतर काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. देशभरात राबवण्यात येणारे हे आंदोलन सोमवारपासून (27 मार्च) सुरू होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
 
दुसरीकडे, राहुल गांधी आज (25 मार्च) दुपारी माध्यमांशी बोलणार आहेत. खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधींची ही पहिली पत्रकार परिषद आहे.
 
'हाथ से हाथ जोडो' या मोहिमेसोबतच राहुल गांधींच्या अपात्रतेबाबत जनजागृती कार्यक्रम, राज्यघटना वाचवण्याचा कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
 
काल (24 मार्च) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते, ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांची बैठक पक्षाच्या मुख्यालयात पार पडली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी सोनिया गांधीही बैठकीला उपस्थित होत्या.
जयराम रमेश पुढे म्हणाले, "मोदी सरकारविरोधात आवाज उठवल्यामुळे राहुल गांधींना जाणूनबुजून अपात्र ठरवण्यात आलं, हे आम्ही देशभरात जाऊन सांगू. 'भारत जोडो' यात्रा ही एक चळवळ बनल्यामुळे आणि अदानी प्रकरणावर काँग्रेसनं उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे भाजप घाबरला आहे."
 
सर्व विरोधी पक्षनेत्यांनी राहुल गांधींच्या समर्थनार्थ केलेल्या वक्तव्याचं स्वागत करत जयराम रमेश म्हणाले की, आता आपण विरोधी ऐक्याचा मुद्दा पद्धतशीरपणे पुढे नेला पाहिजे.
 
"काँग्रेस अध्यक्ष संसदेत दररोज विरोधी पक्षांशी समन्वय साधत आहेत. आता हे काम बाहेरही करावे लागेल," असंही ते म्हणाले.
 
मी देशासाठी कुठलीही किंमत चुकवायला तयार - राहुल गांधी
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतला आहे. या घटनेनंतर राहुल गांधी यांनी ट्वीट करून त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
 
"मैं भारत की आवाज़ के लिए लड़ रहा हूं। मैं हर कीमत चुकाने को तैयार हूं," असं राहुल गांधी यांनी लिहिलं आहे.
 
मी भारताच्या आवाजासाठी लढत आहे आणि त्यासाठी मी कुठलीही किंमत चुकवायला तयार आहे, असं त्याचा अर्थ आहे.
 
सुरत कोर्टाने एका अब्रूनुकसानीच्या प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांच्यावर ही कारवाई केली.
 
गुजरातमध्ये सुरतच्या न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मानहानीच्या एका खटल्यात दोषी ठरवलं आहे.
 
आदेशात काय म्हटलं?
लोकसभा सचिवालयाने यासंदर्भात काढलेल्या आदेशामध्ये राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याच्या निर्णयाबाबत माहिती देण्यात आली आहे.
 
सचिव उत्पल कुमार सिंह यांच्या नावाने हे पत्र राहुल गांधी, राष्ट्रपती भवन, पंतप्रधान कार्यालय, राज्यसभा, निवडणूक आयोग तसंच सर्व मंत्रालय/विभागांना पाठवण्यात आलं आहे.
 
या पत्रानुसार, भारतीय संविधानातील लोकप्रतिनिधी कायदा, 1951 मधील कलम 10 (1) (e) अन्वये राहुल गांधी यांची खासदारकी 23 मार्च 2023 पासून रद्द करण्यात येत असल्याचं सांगितलं आहे.
 
नेमकं प्रकरण काय?
2019 मध्ये त्यांनी मोदी आडनावावर टिप्पणी केली होती. सुनावणीच्या वेळी राहुल गांधी कोर्टात उपस्थित होते.'सगळ्याच चोरांचं आडनाव मोदी कसं असू शकतं?' असं कथित वक्तव्य त्यांनी केलं होतं.
 
त्यानंतर भाजपा आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.राहुल गांधी वायनाड येथून खासदार आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणूक प्रचाराच्यावेळी कर्नाटकातील कोलार येथे त्यांनी हे वक्तव्य केलं होतं.
 
भारतीय दंड संहितेच्या कलम 499 नुसार या गुन्ह्यासाठी दोन वर्षांची शिक्षा प्रस्तावित आहे.राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा झाली आणि लगेच जामीनही मिळाला आहे.या निर्णयानंतर राहुल गांधी यांनी ट्विट केलं होतं.
 
महात्मा गांधींचा एक सुविचार त्यांनी या ट्विट मध्ये मांडला, "माझा धर्म सत्य आणि अहिंसेवर आधारित आहेत. सत्य माझा देव आहे. अहिंसा ते मिळवण्याचं साधन" असं ते म्हणाले होते.
 
Published By- Priya Dixit 

संबंधित माहिती

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

Thane : एक केळी जास्त घेतल्याने फळ विक्रेताची ग्राहकाला लोखंडी रॉडने मारहाण

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणार!

पुढील लेख
Show comments