Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राजस्थान : ...या कारणांमुळे भाजपने वसुंधराराजें ऐवजी भजनलाल शर्मा यांची निवड केली

Webdunia
बुधवार, 13 डिसेंबर 2023 (22:00 IST)
भजनलाल शर्मा, राजस्थान सरकारचे मुख्यमंत्री. भाजपच्या विधिमंडळ पक्षाचे नेते.
हे नाव कुणाच्या ध्यानी-मनीही नव्हतं किंवा कुठल्या अंदाजांमध्येही पुढं आलेलं नव्हतं.
भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव स्पष्टपणे झळकत होते. विशेषत: ज्यांना आपण यावेळी नक्की मुख्यमंत्री होणार अशा आशा होत्या, त्यांना तर मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेल्या भजनलाल या अज्ञात नावानं सर्वाधिक धक्का बसला.
 
सोमवारी मोहन यादव यांना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री जाहीर करण्यात आलं, तेव्हा राजस्थान भाजपच्या अंतर्गत वर्तुळातही एक चर्चा सुरू झाली होती. ती म्हणजे एका समीकरणानं भजनलाल शर्मादेखील मुख्यमंत्री होऊ शकतात.
 
ते समीकरण म्हणजे, उत्तर भारतात भाजपचा एकही मुख्यमंत्री ब्राह्मण समाजातील नाही.
 
पण या दाव्यावर मुख्यमंत्रिपदाचे जे अनेक दावेदार होते, त्यांचे जवळचे लोक हसू लागले होते.
 
सकाळपर्यंत भजनलाल शर्मा यांचं नाव सोशल मीडियावर येऊ लागलं, त्यावर कोणालाही सुरुवातीला विश्वास बसला नसणार, हे मात्र नक्की.
 
माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्याशिवाय केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत, दियाकुमारी, अर्जुन मेघवाल किंवा ओम बिर्ला या चर्चेत असलेल्या नावांपैकी कोणीही मुख्यमंत्री बनलं असतं तर एवढा धक्का बसला नसता.
 
पण मात्र भजनलाल शर्मा यांचं नाव पुढं येऊ लागलं, तेव्हा त्यांच्या राजकीय प्रवासाचा हा टप्पा एवढ्यात येईल हे कुणालाही खरं वाटत नव्हतं.
 
त्यात जी नावं भाजपच्या प्रत्येक नेत्याला आवडीची वाटत होती, ती आता जणू गायब झाली आहेत.
 
मोदी आणि शहा यांच्या भाजपनं जी परिस्थिती निर्माण केली आहे, त्यामुळं आयुष्यभर ज्यांना आशा लागलेली होती, तीच नावं मागं पडली आहेत.
 
सांगानेरच्या उमेदवारीतून पहिला धक्का
सांगानेरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती, तेव्हाच भजनलाल यांच्या नावामुळं आश्चर्याचा पहिला धक्का दिला होता.
 
सांगानेरचे तत्कालीन आमदार आणि भाजप नेते अशोक लाहोटी आणि त्यांच्या समर्थकांनी या नावाला कडाडून विरोध केला होता. त्यासाठी भाजप मुख्यालयात निदर्शनेही झाली, पण त्यांचं कोणीही ऐकलं नाही.
 
सांगानेरमधून भाजपच्या उमेदवारीचे दावेदार असलेले इतर लोक त्यावेळी शर्मा फक्त कागदावरचे नेते, असल्याची वक्तव्य करत होते.
 
विरोध करणाऱ्यांना याची पुसटशीही कल्पना नव्हती की, ते ज्या नावाला विरोध करत आहेत, ते केवळ सत्तेत सहभागीच असणार नाहीत, तर या राजकीय प्रवासाच्या शिखरावर ते जाऊन बसणार आहेत.
 
भजनलाल यांनी 2003 मध्ये राजस्थान सामाजिक न्याय मंचकडून उमेदवारी मिळवत भरतपूर जिल्ह्यातील नदबई मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.
 
देवीसिंह भाटी यांनी भाजपमधून बंड करून ही संघटना सुरू केली होती. त्यांची मुख्य मागणी सवर्णांसाठी आरक्षण ही होती. पण भजनलाल पराभूत झाले. त्यांना 5969 मतांसह पाचव्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं.
भजनलाल यांची राजकीय स्वप्नं आमदार बसून सरकारमध्ये चांगलं स्थान मिळवण्याची होती.
 
नीकटवर्तीयांच्या मते, "त्यांनी तर इतर सहजपणे मंत्री होतील असा विचारही केला नसेल. भाजपच्या कार्यालयात सर्वांबरोबर बसलेल्या एका कार्यकर्त्याला झोपडी हवी असेल आणि त्याला थेट ताजमहाल दिला तर त्याला काय वाटेल? तेच आज भजनलालला यांच्याबरोबर घडत आहे."
 
तीन डिसेंबरला राजस्थान विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. त्यावेळी असं वाटलं होते की, आमदारांपैकी एखादा चर्चित चेहरा किंवा दिल्लीतून पाठवलेला एखादा उमेदवार आठवडाभरात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेईल.
 
पण, आता हे सर्व अंदाज निव्वळ अंदाजच असल्याचं स्पष्ट झालं.
 
या नऊ दिवसांत शांतता किंवा स्वस्थपणा नव्हता. कारण नावाबाबतचा तणाव वाढत होता.
 
राज्यातील मुख्य व्यक्तिमत्त्व असलेल्या वसुंधराराजे यांच्या हाती अखेर निराशा येईल, असं मानलंच जात होतं. पण, ज्यांना या पदाची आशा होती त्यांनाही मुख्यमंत्रिपदापासून वंचित राहिल्याच्या दुःखाचा सामना करावा लागला.
 
आता सर्वजण एकसारख्या वेदना आणि सारख्याच राजकीय कोंडीचे बळी ठरले आहेत.
 
संदेश काय आहे?
अखेर भजनलाल यांना मुख्यमंत्री करण्याचं कारण काय असेल?
 
भाजपच्या अंतर्गत जाणकारांना हा प्रश्न विचारला. त्यावर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला मोठा संदेश द्यायचा असेल आणि तसंच झालं असं ते म्हणाले.
 
पूर्वी सत्तेचं वलय एवढं मोठं असायचं की, त्यातून लोक बाहेरच येत नव्हते. त्यांच्या आजुबाजुलाही पदांचा एवढा पसारा असायचा की, पक्ष संघटनेतील मोठ्या लोकांनाही बोलणं किंवा त्यांचं मत मांडणं कठिण व्हायचं, असंही ते म्हणाले.
 
पक्षांतर्गत घडलेल्या लहान-सहान घटनांच्या आठवणींना अनेकांनी उजाळा दिला. ते म्हणाले की, एक काळ असा होता जेव्हा राजनाथ सिंह राष्ट्रीय अध्यक्ष असताना जयपूरला आले तर, सत्तेतील वरिष्ठ नेत्या त्यांच्या स्वागतासाठी गेल्या नव्हत्या.
 
एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित पक्षाच्या एका नेत्यांना मुख्यमंत्र्यांना भेटायचं होतं, पण खूप प्रयत्न करूनही त्यांची भेट होऊ शकली नाही, अशी आठवणही त्यांनी सांगितली.
 
"मी त्यांच्याशी कधीच क्षणभरही बोलू शकलो नाही. आमच्याकडं भरपूर मोकळा वेळ असायचा, पण त्या सत्तेच्या रथावर अशाप्रकारे स्वार झालेल्या होत्या की, कुणीही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हतं," अशी आठवण एका जुन्या नेत्यांनं सांगितली.
 
अशा स्थितीत भाजपच्या अनेक संघनिष्ठ आमदारांशी त्यांचा वादही झाला.
 
2008 साली भाजपचा पराभव झाला तेव्हा या पराभवाची जबाबदारी स्वीकारत प्रदेश सरचिटणीस प्रकाशचंद्र यांनी तत्काळ तर प्रदेशाध्यक्ष ओम माथूर यांनीही काही दिवसांनी राजीनामा दिला.
 
पण वसुंधराराजे यांनी दीर्घकाळ विरोधी पक्षनेतेपद सोडलं नाही आणि केंद्रीय नेतृत्वाला त्या धमकावत राहिल्या.
 
2017 मध्ये जेव्हा हायकमांडला गजेंद्र सिंह शेखावत यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष बनवायचं होतं. तेव्हाही वसुंधराराजे यांनी केंद्रीय नेत्यांवर मात केली.
 
त्याचवेळी संघाच्या लोकांनी राजस्थानमध्ये भाजपचं सरकार बनवायचं हे ठरवलंच होतं. पण त्याचं नेतृत्व अशा लोकांच्या हाती असावं जे सामान्य कार्यकर्त्यांना सहज भेटू शकतील आणि कोणीही कधीही सत्तेच्या शिखरावर बसलेल्या व्यक्तीसमोर त्यांचं मत मांडू शकेल, असंही ठरवलं होतं.
 
तसंच या नेत्यांनी आणखी मोठं होऊन संघ आणि भाजपला धमकावण्याचा प्रयत्न करू नये, असंही त्यांचं मत होतं.
 
यावेळी अहंकारानं भरलेल्या आणि लोकांमध्ये न मिसळणाऱ्या आमदारांची तिकिटंही कापण्यात आली आहेत.
 
पक्षाला बहुमतापेक्षा फार जास्त जागा मिळू शकणार नाहीत, अशी माहिती मिळालेली असतानाही हे पाऊल उचलण्यात आलं.
 
या 'शक्तिशाली' नेत्यांचं आता काय होणार?
पक्षाच्या तिकिट वाटप समित्यांचं बारकाईने निरीक्षण करणारे एक नेते म्हणाले की, "सध्या पक्षाच्या हायकमांडमध्ये वेगळ्याच प्रकारचे लोक आहेत. ते जे करायचं ठरवतात ते केल्याशिवाय राहतच नाहीत."
 
एमएपर्यंत शिक्षण झालेले भजनलाल मुख्यमंत्री बनल्यानं या वेळी जीवनात काही तरी चांगलं होणार अशी वाट पाहणाऱ्यांची मात्र चांगलीच अडचण झाली आहे.
 
या सर्व प्रचंड शक्तीशाली लोकांचं आता काय होणार? हे कुणालाही कळेनासं झालंय.
 
भाजपच्या संघटनेशी संबंधित एक कार्यकर्ते म्हणाले की, "भजनलाल हे यावेळी निवडणूक व्यवस्थापनासाठी तयार करण्यात आलेल्या पाच जणांच्या छोट्याशा टीमचे प्रमुख होते."
 
ते सांगानेरची निवडणूकही लढवत होते आणि संघटनेचं कामही करत होते. ते या पदापर्यंत पोहोचल्यानं हे सिद्ध झालं आहे की, भाजपमध्ये काही वर्षं प्रामाणिकपणे चांगलं काम केलं तर पक्ष त्याला कोणतीही जबाबदारी देऊ शकतो.
 
दुसऱ्या एका नेत्यानं म्हटलं की, "जेव्हा कोणी पक्षासाठी काम करतं, तेव्हा पक्षाला ते कार्यकर्त्याचं कर्ज असल्याचं दिसत असतं. त्याची परतफेड करण्यासाठी ते फार वेळ घेत नाहीत."
 
"काँग्रेसमध्ये हे शक्य आहे का?" असंही त्यांनी विचारलं.
 
भजनलाल एकेकाळी भरतपूर जिल्ह्यातील नदबई तालुक्यातल्या अटारीचे सरपंच होते.
 
राजकीयदृष्ट्या ते खूप महत्त्वाकांक्षी होते. ते संघाचे जुने कार्यकर्ते आहेत. पण 2002 मध्ये वसुंधराराजे यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी पक्षानं प्रदेशाध्यक्ष बनवलं तेव्हा पक्षातील शक्तिशाली नेते देवीसिंह भाटी यांनी बंडखोरी करत, राजस्थान सामाजिक न्याय मंचाची स्थापना करत भाजपच्या उमेदवारांसमोर उमेदवार उभे केले होते.
 
2003 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं भरतपूर जिल्ह्यातील नदबाई मतदारसंघातून कृष्णेंद्र कौर दीपा यांना तिकिट दिलं होतं.
 
तेव्हा भजनलाल यांनी राजस्थान सामाजिक न्याय मंचच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. तेव्हा ते पाचव्या स्थानी होते.
 
त्यांना 5969 मतं मिळाली. भारतीय निवडणूक आयोगाच्या 2003 च्या निवडणूक आकडेवारीत याची नोंद आहे.
 
वसुंधराराजे यांनी काही वर्षांनी देवीसिंह भाटी यांना परत भाजपमध्ये आणलं. पण भजनलाल आधीच आले आणि पक्षात इतक्या निष्ठेनं सामील झाले की, आधी जिल्हामंत्री, नंतर सरचिटणीस आणि नंतर जिल्हाध्यक्षही बनले. भारतीय जनता युवा मोर्चाशीही ते संलग्न झाले आणि संघटनेचं काम करू लागले.
 
2009 मध्ये अरुण चतुर्वेदी राजस्थान भाजपचे अध्यक्ष बनले तेव्हा त्यांनी भजनलाल यांना जयपूरला आणलं.
 
यावेळी चतुर्वेदी यांचं तिकिट रद्द करून भजनलाल यांना सांगानेर मतदारसंघातून तिकीट देण्यात आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं गेलं. याठिकाणी विजय निश्चित होताच, पण त्याचबरोबर अनेक संघनिष्ठ चेहेरे याठिकाणी दावेदारही होते.
 
तत्कालीन आमदार आणि युवा नेते अशोक लाहोटी यांनी समर्थकांसह भजनलाल यांना तिकीट देण्याच्या निर्णयाला विरोध केला. पक्षकार्यालयावर निदर्शनंही केली, पण कोणीही काही ऐकलं नाही.
 
RSS चा वाढता हस्तक्षेप कारणीभूत आहे?
संघाच्या निकटवर्तीयांच्या मते, "यावेळी निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच संघाच्या लोकांनी अशा काही नव्या चेहऱ्यांवर नजर ठेवली होती, की त्यांच्यापैकी कुणाला मुख्यमंत्री केलं तर लोकांना आपलंच राज्य आहे असं वाटेल."
 
भजनलाल यांच्या उमेदवारीचे सर्वांत मोठे समर्थक होते, सरचिटणीस चंद्रशेखर. त्यात राज्य प्रभारी अरुण सिंह, निवडणूक प्रभारी प्रल्हाद जोशी यांच्यासह दिल्लीतील काही प्रमुख नेत्यांचाही समावेश होता.
 
भजनलाल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांचे नीकटवर्तीयही आहेत. 2023 मध्ये भाजपच्या त्सुनामी विजयाच्या शिल्पकारांमध्ये यादव यांचा समावेश असल्याचं म्हटलं जातं.
 
भजनलाल मुख्यमंत्री बनल्यानंतर त्यांचे वडील किशन स्वरूप शर्मा आणि आई गोमतीदेवी यांचे भावूक फोटो समोर आले. त्यावरून भाजपमध्ये एक सामान्य व्यक्तीदेखील मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचू शकतो हा संदेश देण्यात भाजप यशस्वी झाल्याचं स्पष्टपणे दिसून येतं.
 
भजनलाल यांच्या आई भावूक होत म्हणाल्या, "आम्ही मजूर आहोत. आमचा मुलगा इथपर्यंत पोहोचू शकतो यावर आमचा विश्वासच बसत नाही."
 
अभ्यासकांच्या मते, भाजपमध्ये आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हस्तक्षेप खूप वाढला आहे. त्यामुळं पक्षाच्या पारंपरिक राजकारणात पूर्णपणे बदल झाला आहे.
 
जुन्या राजकीय बंधनांचं स्वरुप आता बदललं आहे, तसंच आता अनेकांच्या स्वातंत्र्यावरही मर्यादा आणण्यात आल्याचं ते सांगतात.
 
भाजपचे केंद्रीय निरीक्षक असलेले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावाचा लिफाफा माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याकडं दिला. त्यांनी तो उघडून भजनलाल यांचं नाव वाचलं तेव्हा त्यांचे डोळे आणि चेहरा यावरून त्यांच्या मनात काय चाललंय हे अगदी स्पष्टपणे दिसत होतं.
 
एक जुने आमदार म्हणाले की, "त्यांचा चेहरा स्पष्टपणे वाचता येत होता. जणू काही हे नाव नरकातून येऊन किनाऱ्यावर तरंगू लागलं असावं."
 
संघ आणि भाजपनं स्पष्ट संदेश दिला आहे. तो म्हणजे, पक्षात आता डोक्यात हवा जाणाऱ्यांना लगाम घातली जात आहे. तसंच सामान्य कार्यकर्तेही मोठी स्वप्ने पाहू शकतात, हा तो संदेश होता.
 
राजस्थानात ब्राह्मण मुख्यमंत्री
समाजवादी नेते अर्जुन देथा यांनी या निर्णयानंतर एक प्रश्न उपस्थित केला. राज्यपाल कलराज मिश्र, मुख्यमंत्री भजनलाल, भाजप प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी, मुख्य सचिव उषा शर्मा आणि डीजीपी उमेश मिश्रा हे सगळे एकाच जातीचे असल्यानं राजस्थान ब्राह्मण राज्य झाले नाही का? असं ते म्हणाले.
 
पण, शपथविधीनंतर राज्यात सोशल इंजिनिअरिंग सुरू होईल, त्यामुळं असा कोणताही संदेश जाणार नसल्याचं भाजप नेत्यांचं म्हणणं आहे.
 
राज्यसभा सदस्य घनश्याम तिवारी, माजी मंत्री अरुण चतुर्वेदी किंवा प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी हे वरिष्ठ असून राज्यात त्यांनी वरिष्ठ नेते अशी प्रतिमाही आहे. त्यामुळं ते देखील भाजपमधील ब्राह्मण चेहरा म्हणून पुढं येऊ शकले असते, अशीही चर्चा आहे.
 
पण भाजप नेत्यांनी अंतर्गत स्थिती स्पष्ट करताना म्हटलं की, एक तर हे सगळे आमदार नव्हते आणि दुसरं सत्य हेही आहे की, खूप प्रिय असले तरी कधीकधी ते नकोसे असतात.
 
भजनलाल यांना मुख्यमंत्री बनवण्याबरोबरच दीयाकुमारी आणि प्रेमचंद बैरवा यांना उपमुख्यमंत्री बनवणं हाही एक संदेशच आहे.
 
या माध्यमातून एकिकडं महिला सबलीकरण झालं तर दुसरीकडं राजघराण्याला आणि क्षत्रिय यांना प्रतिनिधित्वही दिलं आहे. तसंच बैरवा यांच्या माध्यमातून दलितांना खूश करण्याचा प्रयत्न केला आहे.
 
राजस्थानच्या राजकारणात मंगळवारी जी पटकथा लिहिली गेली, त्यानुसार लोकसभा निवडणुकीच्या काळातही राजकारणातील काहीजण असेच नजरेआड होतील, हेही स्पष्ट होतं आहे.
 
Published By- Priya Dixit 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Navratri 2024 : महाराष्ट्रातील प्रसिद्ध जागृत देवी मंदिरे

Ekadashi Shradh 2024 पितरांच्या उद्धारासाठी एकादशी श्राद्ध नक्की करावे, सद्गती मिळेल

घरात कटकटी होत आहेत? तर हे 5 प्रभावी उपाय नक्की करून पहा

कोणी मनुका खाऊ नये? या लोकांनी रिकाम्या पोटी किशमिश खाल्ल्यास समस्या वाढू शकतात

केवळ फायदेच नाही, अंडी खाल्ल्याने होऊ शकतात आरोग्याला हे 6 नुकसान

पुढील लेख
Show comments