कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या टोळीचा सदस्य आणि एकदम जवळचा हस्तक असलेल्या रियाझ भाटीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. भाटीविरोधात खंडणी आणि जीवे मारण्याच्या धमक्यांचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला आज न्यायालयात हजर केले जाणार होते. त्यानुसार मुंबई पोलिसांनी 14 दिवसांची कोठडी मागितली आहे.
रियाझ भाटी हा कुख्यात गँगस्टर आहे, ज्याचा दाऊद इब्राहिम टोळीशी थेट संबंध असल्याचे मानले जाते. भाटी यांच्यावर खंडणी, जमीन हडप, फसवणूक, बनावट कागदपत्रे, गोळीबार असे अनेक गुन्हे दाखल आहेत. 2015 आणि 2020 मध्ये बनावट पासपोर्टद्वारे न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करून देश सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करताना त्याला अटक करण्यात आली आहे.
रियाझ भाटी हा गेल्या वर्षी जुलैमध्ये गोरेगावमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांचा सहआरोपी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रियाझ भाटी हा वाझेच्या सांगण्यावरून बार आणि रेस्टॉरंटमधून पैसे उकळायचा. या प्रकरणात त्यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात रद्द केला होता, तेव्हापासून तो फरार होता.
मुंबईतील वर्सोवा पोलीस ठाण्यात सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रूट आणि रियाझ भाटी यांनी अंधेरीतील एका व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी देत महागडी वाहनं आणि 7 लाखांहून अधिकची खंडणी उकळली होती. या संदर्भात व्यावसायिकाने वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. भाटी हा अंधेरी परिसरात एका ठिकाणी येत असल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी कक्षाला मिळाली होती. त्यानंतर सापळा रचून त्याला अटक करण्यात आली.