40 वर्षांनंतरही उत्तर प्रदेशात पोलिसांना गुंड अशा पद्धतीने मारू शकत असतील तर योगी महाराजांच्या उत्तर प्रदेशात बदलले काय? असा सवाल शिवसेनेने सामना संपादकीयच्या माध्यमातून विचारला आहे. विकास दुबे नेपाळमध्ये फरार होऊ शकतो असा संशय असल्याने उत्तर प्रदेश पोलिसांनी तेथील सीमा सील वगैरे केल्याच्या बातम्या आहेत. या पार्श्वभूमीवर उद्या विकास दुबे आपल्यासाठी ‘नेपाळमधील दाऊद’ ठरू नये म्हणजे मिळवले अशी भीतीही शिवसेनेने व्यक्त केली आहे.
“आज जनता कोरोना लॉक डाऊनमध्ये बंदिस्त आहे. उद्या गुंडांपासून सुरक्षित राहण्यासाठी लॉक डाऊनमध्ये राहावे लागेल का, असा प्रश्न तेथील जनतेच्या मनात आहे.
प्रश्न अनेक आहेत, त्यांची उत्तरे योगी सरकारलाच द्यायची आहेत. कारण उत्तर प्रदेश म्हणजे उत्तम प्रदेश असे म्हटले जाते. उत्तम प्रदेश पोलिसांच्या रक्ताने भिजला. देशाला हा धक्का आहे,” अशी टीका शिवसेनेने केली आहे.
“गुंड टोळ्या आणि त्यांच्या गुन्हेगारीमुळे उत्तर प्रदेशसारखे राज्य दशकानुदशके बदनाम राहिले आहे. विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमधील गुंडागर्दी संपुष्टात आणली असे दावे अनेकदा केले गेले. मात्र कानपूरमधील पोलीस हत्याकांडाने या दाव्यांवर भलेमोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.
“या हत्याकांडामुळे संतापलेल्या योगी प्रशासनाने दुसऱया दिवशी विकास दुबेचे आलिशान घर जेसीबी लावून जमीनदोस्त केले. म्हणजे विकास दुबे नाही मिळाला तर त्याचे घर उद्ध्वस्त केले. हे घर ‘अनधिकृत’ होते असे सांगण्यात आले. अनधिकृत घर तोडले हे बरेच झाले, पण ‘शहीद’ पोलिसांच्या उद्ध्वस्त घरांचे काय? त्यामुळे त्यांच्या पत्नींना त्यांचे ‘सौभाग्य’, आई-वडिलांना मुलगा आणि मुलांना त्यांचे वडील परत मिळणार आहेत का? आज उत्तर प्रदेशच नव्हे, तर देशातील जनतेच्या मनात हा प्रश्न उसळी मारतो आहे.”
आता विकास दुबे नेपाळमध्ये फरार होऊ शकतो असा संशय असल्याने उत्तर प्रदेश पोलिसांनी तेथील सीमा सील वगैरे केल्याच्या बातम्या आहेत. ते सर्व ठीक असले तरी आपली नेपाळ सीमा अशा बाबतीत नेहमीच चिंतेचा विषय राहिली आहे. त्यात सध्या नेपाळशी आपले संबंधदेखील चांगले नाहीत. या पार्श्वभूमीवर उद्या विकास दुबे आपल्यासाठी ‘नेपाळमधील दाऊद’ ठरू नये म्हणजे मिळवले!,” संपादकीयच्या माध्यमातून अशी काळजी व्यक्त करण्यात आली आहे.