Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बिल्किस बानो सामूहिक बलात्कारातील दोषींच्या सुटकेचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून रद्द

Bilkis Bano
, सोमवार, 8 जानेवारी 2024 (12:00 IST)
गुजरात दंगलीतील पीडित बिल्किस बानो सामूहित बलात्कार प्रकरणातील दोषींच्या सुटकेचा निर्णय सुप्रीम कोर्टाने रद्द ठरवला आहे.
गुजरात दंगलीतील पीडित बिल्किस बानो यांच्यावरील सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींच्या सुटकेला आव्हान देणा-या याचिकेवर सोमवार (8 जानेवारी) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.
 
2002 च्या गुजरात दंगलीत बिल्किस बानोवर झालेला सामूहिक बलात्कार आणि त्यांच्या कुटुंबातील सात सदस्यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्यांच्या निर्दोष सुटकेच्या गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं.
 
याचिकेवर सुनावणी केल्यानंतर न्यायमूर्ती बीव्ही नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुइयां यांच्या खंडपीठाने गेल्या वर्षी 12 ऑक्टोबर रोजी आपला निर्णय राखून ठेवला होता.
 
बिल्किस बानो यांच्यावर सामूहिक बलात्कार आणि अनेक हत्यांसाठी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या 11 दोषींच्या शिक्षेमध्ये सूट देण्याचा गुजरात सरकारचा निर्णय रद्द ठरवण्यात आला आहे.
 
ज्या राज्यामध्ये आरोपींवर खटला चालवण्यात आला आणि त्यांना शिक्षा सुनावली गेली, तेच राज्य दोषींच्या शिक्षेचा निर्णय रद्द करण्यांसंबंधी आदेश देण्यास पात्र असतं. त्यामुळे या प्रकरणी निर्णय देण्याचा अधिकार गुजरात सरकारकडे नव्हता, तर महाराष्ट्र सरकार या प्रकरणी निर्णय देऊ शकतं असंही सुप्रीम कोर्टानं निर्णय देताना म्हटलं.
गुजरात सरकारने 2022 मध्ये स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सर्व 11 दोषींची सुटका केली होती. यानंतर देशभरात मोठ्या वादाला तोंड फुटलं होतं.
 
17 ऑक्टोबर रोजी एक नवी माहिती उघड झाली होती. गुजरात सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये या निर्णयाला केंद्रीय गृह खात्याची परवानगी होती असं म्हटलं आहे.
 
या दोषींची सुटका आणि त्यांचं स्वागत याबद्दल गुजरातमधील एका भाजप आमदारांनी केलेल्या एका वक्तव्यावरून सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली होती.
 
दरम्यान, या दोषींच्या सुटकेनंतर भाजपचे ग्रोधाचे आमदार सीके राऊलजी यांनी मोजो स्टोरीशी बोलताना हे लोक ब्राह्मण आहेत, चांगल्या संस्कारातील आहेत असं विधान केलं होतं.
 
ब्राह्मणांवरील संस्कारांबद्दल आपल्याला माहीत आहे. त्यांना शिक्षा व्हावी असा काही जणांचा दुर्हेतू असू शकतो, असं या आमदारांनी या मुलाखतीत म्हटलं आहे.
 
या दोषींचं तुरुंगातलं वर्तन होतं अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
 
सोशल मीडियावर त्यांच्या या वक्तव्यांची क्लिप व्हायरल होत आहे.
 
सीके राउलजी हे गुजरात सरकारने या प्रकरणी गठित केलेल्या समितीचे सदस्य होते. या समितीने काही महिन्यांपूर्वीच या प्रकरणी सर्व 11 दोषींची सुटका करण्याचा निर्णय एकमताने घेतला होता. समितीने राज्य सरकारला याप्रकरणी शिफारसही केली होती. त्यानंतरच सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींची सुटका शक्य झाली.
 
50 लाखांची नुकसान भरपाई
मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने 21 जानेवारी 2008 रोजी बिल्किस बानोच्या कुटुंबातील सात सदस्यांवर सामूहिक बलात्कार आणि हत्या केल्याच्या आरोपाखाली अकरा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
 
या दोषींच्या सुटकेबद्दल एक समिती स्थापन करण्यात आली. समितीने दिलेल्या निर्णयानुसार पुढील कार्यवाही करण्यात आली.
 
2019 मध्ये सुप्रीम कोर्टाने 2002च्या गुजरात दंगलीतल्या बिल्किस बानो प्रकरणात त्यांना 50 लाख रुपये नुकसान भरपाई, सरकारी नोकरी आणि घर देण्याचे आदेश सरकारला दिले होते.
 
"कोर्टानं न्याय दिला आहे. मी समाधानी आहे. सर्वोच्च न्यायालयानं माझ्या वेदना, माझं दुःख आणि माझा लढा समजून घेतला आणि मला न्याय दिला," तब्बल 17 वर्षं न्यायासाठी लढा देणाऱ्या बिल्कीस बानो यांनी ही प्रतिक्रिया दिली होती.
 
2002च्या गुजरात दंगलीतल्या बिल्किस बानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं नुकताच अंतिम निकाल सुनावला. न्यायालयाने बिल्किस बानो यांना 50 लाख रुपये नुकसान भरपाई, सरकारी नोकरी आणि घर देण्याचे आदेश दिले आहेत.
 
यापूर्वी गुजरात सरकारनं बिल्किस बानो यांना 5 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची तयारी दाखवली होती. मात्र, बिल्किस यांनी ते स्वीकारायला नकार देत याचिका दाखल केली होती.
 
कोर्टाने पुरावे नष्ट केल्याच्या आरोपावरून आयपीएस अधिकारी आर. एस. भगोरा यांना दोन पदवनती देण्याचे आदेशही दिले आहेत.
 
सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशावर आनंद व्यक्त करताना बिल्किस बानो म्हणाल्या होत्या, "नुकसान भरपाईचे पैसे मी माझ्या मुलांचं शिक्षण आणि त्यांना स्थिर आयुष्य मिळावं, यासाठी खर्च करेन. यातला काही निधी दंगल पीडितांसाठी खर्च करण्याची माझी इच्छा आहे."
 
बिल्किस बानो यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या, "गेली 17 वर्षं मी माझ्या सदसद्विवेकावर, राज्यघटनेवर आणि न्यायपालिकेवर विश्वास ठेवला आणि आज सर्वोच्च न्यायालयानं हे दाखवून दिलं की ते माझ्यासोबत आहेत. 2002च्या गुजरात दंगलीमध्ये माझे जे नागरी अधिकार माझ्याकडून हिरावून घेण्यात आले होते, ते सर्वोच्च न्यायालयाने मला पुन्हा बहाल केलेत."
 
'धार्मिक उन्मादाच्या लाटेत चिमुकली गेली'
दंगलीत बिल्किस यांच्या डोळ्यांदेखत त्याची तीन वर्षांची मुलगी साहेलाची हत्या करण्यात आली. पत्रकार परिषदेत साहेलाच्या आठवणीने बिलकीस भावुक झाल्या.
 
त्या म्हणाल्या, "धार्मिक उन्मादाच्या त्या लाटेत माझी चिमुकली साहेलचा मृतदेह हरवला. आम्ही तिच्या पार्थिवावर अंत्यविधीही करू शकलो नाही. आई-वडील म्हणून याकूब आणि मी तिच्याप्रती असलेलं आमचं कर्तव्य पार पाडू शकलो नाही. साहेलाची कुठेच कबर नाही. जिथे जाऊन मी अश्रू ढाळू शकेल. या दुःखाने सतत माझा पिच्छा केला आहे. हे किती मोठं दुःख आहे, हे मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. मात्र, तिच्यामुळेच मला सतत हिम्मत मिळाली. मी लढा सुरू ठेवला."
 
2002 साली उसळलेल्या गुजरात दंगलीतल्या सर्वांत भयंकर घटनेपैकी एक म्हणजे बिल्किस बानो यांचं प्रकरण. या दंगलीतली सर्वांत मोठी पीडित. पुरावा आणि या दंगलीत पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या 18-19 वर्षांच्या बिल्किस बानोवर सामूहिक बलात्कार करण्यात आला.
 
तिच्या तीन वर्षांच्या चिमुकल्या मुलीला तिच्या डोळ्यांदेखत जमिनीवर आपटून हत्या करण्यात आली. तिची आई, दोन दिवसांची बाळांतीण असलेली तिची बहिण यांच्यासह तिच्या 14 नातलगांना संतप्त जमावाने ठार केलं.
 
या घटनेने बिल्किस आणि तिचे पती याकून दोघांचही आयुष्य नेहमीसाठी बदललं. गेली 17 वर्षं जीवाच्या भीतीने त्यांना वणवण भटकावं लागलं. ओळख लपवून रहावं लागलं. वीसहून जास्त घरं बदलावी लागली. एकप्रकारे विस्थापितांचं जीणं वाट्याला आलं.
 
त्या घटनेनंतर त्यांना कधीही आपल्या गावी परत जाता आला नाही. कुटुंबीयांशी, नातलगांशी संपर्क तोडावा लागला. नातलगांच्या कुठल्याही लग्नसमारंभात, कार्यात सहभागी होता आलं नाही. मुलांनाही बरंच काही सोसावं लागलंय. बिल्कीसला तीन मुली आणि एक मुलगा आहे. मात्र, त्यांनाही परिस्थितीचे चटके बसलेत. इतके की आपण बिल्किसची मुलं आहोत, हे ते कुणालाही सांगत नाहीत.
 
बिल्किस त्या दिवसाविषयी सांगतात, "त्या गर्भवती होत्या आणि गोध्राजवळच्या रंधिकपूर गावात आपल्या आई-वडिलांकडे गेल्या होत्या."
 
त्या सांगतात, "ट्रेनला आग लागल्यानंतरचा दुसरा दिवस होता. मी स्वयंपाकघरात दुपारचं जेवण बनवत होते. तेवढ्यात माझ्या काकू आणि त्यांची मुलं धावत आले. ते ओरडून ओरडून सांगत होते की त्यांचं घर जाळलं आहे आणि आता सगळ्यांनी लवकरात लवकर घर सोडून जायला हवं."
 
"आम्ही क्षणाचाही विलंब न करता होते त्या कपड्यात घर सोडलं. चप्पल घालायलाही वेळ नव्हता."
 
बिल्किस बानो त्यांच्या कुटुंबातल्या 17 जणांसोबत होत्या. त्यांच्या सोबत त्यांची तीन वर्षांची मुलगी, एक बाळंतिण बहिण, लहान भाऊ-बहिणी, पुतणे आणि दोन पुरुष होते.
 
बिल्किस सांगतात, "आम्ही सर्वांत आधी गावच्या सरपंचाकडे धाव घेतली. मात्र, जमावाने सरपंचालाही मारण्याची धमकी दिली तेव्हा अखेर आम्हाला गाव सोडावं लागलं."
 
पुढचे काही दिवस त्या सर्वांसोबत गावोगावी भटकत होत्या. कधी मशिदींमध्ये तर कधी हिंदू कुटुंबाचा आसरा घेत राहिले.
 
तीन मार्चला सकाळी हे सर्व जेव्हा शेजारच्या गावात जाण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा दोन जीपमध्ये बसून लोक आले आणि त्यांनी हल्ला चढवला.
 
बिल्किस सांगतात, "त्यांनी तलवार आणि काठ्यांनी हल्ला केला. माझ्या मुलीला माझ्याकडून खेचून घेत जमिनीवर आपटलं. ती दगडावर पडली आणि डोक्याला दुखापत झाली."
 
हल्ला करणारे 12 जण गावातलेच होते. या लोकांसमोर बिल्कीस लहानाची मोठी झाली होती.
 
त्या लोकांनी बिल्किस यांचे कपडे फाडले. बिल्किस यांनी गर्भवती असल्याचं सांगितलं, याचना केली. मात्र जमाव भडकला होता. त्यांनी त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला.
 
बिल्किस यांची बहीणदेखील ओली बाळांतीण होती. तिच्यावरही बलात्कार करण्यात आला आणि तिच्या नवजात बाळाचीही हत्या केली.
 
बिल्किस बेशुद्ध पडल्याने त्या मेल्या आहेत, असं समजून जमाव तिथून निघून गेला आणि म्हणून बिल्कीस बचावल्या.
 
दोन-तीन तासांनी बिल्किस शुद्धीवर आल्या. तेव्हा त्यांचा पेटीकोट रक्ताने माखला होता आणि मृतदेहांच्या ढिगाऱ्यात त्या होत्या. अत्यंत वेदना होत असतानाही त्या उठल्या आणि जवळच्याच छोट्या डोंगरावर असलेल्या एका गुहेत आसरा घेतला
 
बिल्किस सांगतात, "दुसऱ्या दिवशी मला खूप तहान लागल्याने मी खाली उतरुन एका आदिवासी गावात गेले. सुरुवातीला तर गावकरी माझ्यावर धावून आले. पण, मी मदत मागितल्यावर त्यांनी मदत केली. त्यांनी मला कपडे दिले. पाणी दिलं. गावकरी त्यांना पोलीस ठाण्यात घेऊन गेले आणि तिथे त्यांनी पोलिसांना सर्व हकीगत सांगितली."
 
दुसऱ्या दिवशी त्यांना गोध्रा कॅम्पमध्ये पाठवण्यात आलं. जवळपास पंधरा दिवसांनंतर बिल्किस यांचे पती याकूब आणि भाऊ त्यांना शोधत कॅम्पमध्ये पोचले. पुढचे चार-पाच महिने ते तिथेच होते.
 
आणि तिथून पुढे बिल्किस यांचा न्यायासाठीचा लढा सुरू झाला. या दरम्यान, त्यांना अनेकदा धमक्या मिळाल्या, डॉक्टरांनी तर बिल्किसवर बलात्कारच झाला नाही, असे खोटे अहवाल दिले.
 
मात्र, बिल्किस यांनी हार मानली नाही. अखेर सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग केल्यावर 2004 साली प्रकरणात पहिली अटक करण्यात आली. 17 वर्षांनंतर बिल्किस यांना न्याय मिळाला. त्यावर बिल्किस समाधानीही आहेत.
 
बिल्किस यांचा न्यायालयीन लढा
3 मार्च 2002 : बिल्किस बानो यांच्यावर सामूहिक बलात्कार, दोन वर्षांच्या मुलीसह 14 नातेवाईकांची हत्या.
4 मार्च 2002 : पोलिसात तक्रार दाखल
2002 : अहमदाबाद न्यायालयात खटला सुरू
ऑगस्ट 2004 : साक्षीदारांना धमकावणे आणि पुराव्यांशी छेडछाड होण्याच्या शक्यतने राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या मदतीने खटला मुंबईत वर्ग
21 जानेवारी 2008 : विशेष न्यायालयाने 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर डॉक्टर आणि पोलिसांसह 7 जणांची मुक्तता केली.
4 मे 2017 : मुंबई उच्च न्यायालयाने 7 जणांना दोषी ठरवलं. यात 5 पोलीस आणि 2 डॉक्टरांचा समावेश होता. पुराव्यांशी छेडछाड आणि कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोपात दोषी सिद्ध.
10 जुलै 2017 : दोषी सिद्ध झालेल्यांपैकी आयपीएस अधिकारी आर. एस. भगोरासह 4 पोलीस आणि 2 डॉक्टरांनी उच्च न्यायालयात दाखल केलेली फेरविचार याचिका 'स्पष्ट पुरावे' असल्याचे म्हणत न्यायालयाने फेटाळली.
2019 मध्ये सुप्रीम कोर्टाने 2002च्या गुजरात दंगलीतल्या बिल्किस बानो प्रकरणात त्यांना 50 लाख रुपये नुकसान भरपाई, सरकारी नोकरी आणि घर देण्याचे आदेश सरकारला दिले होते.
 
बिल्किस बानो बलात्कार प्रकरणातील 11 दोषींची सुटका करण्यात आली आहे. गुजरात सरकारच्या माफी धोरणानुसार ही सुटका झाल्याचे सांगण्यात येत आहे.
 
2002 साली गुजरात दंगलीत एक हजारांहून अधिक लोक मारले गेले होते. यात बहुतांश मुस्लीम होते. गोध्रामध्ये साबरमती एक्स्प्रेसला लागलेल्या आगीत 60 हिंदू भाविकांचा मृत्यू झाला. मुस्लीम समाजातल्या लोकांनीच आग लावल्याचा आरोप करत हिंदू जमावाने गुजरातच्या अनेक शहरात मुस्लिमांना लक्ष्य करायला सुरुवात केली आणि दंगल उसळली. तीन दिवस ही दंगल सुरू होती.
 
Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मनोज जरांगे पाटीलांची कुणबी नोंद आढळली