Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'ही' महिला गेली 3 वर्षं नाकाने नव्हे, तर फक्त तोंडाने श्वास घेतेय...

'ही' महिला गेली 3 वर्षं नाकाने नव्हे, तर फक्त तोंडाने श्वास घेतेय...
, शुक्रवार, 23 डिसेंबर 2022 (22:55 IST)
तामिळनाडूतल्या कोईंबतूरमधली एक महिला गेली तीन वर्षं आपल्या नाकाऐवजी तोंडाने श्वास घेतेय.
त्यांचं म्हणणं आहे की एका सरकारी हॉस्पिटलमध्ये चुकीचं ऑपरेशन झाल्यामुळे त्यांच्या श्वासनलिकेला इजा झाली आणि त्यामुळे आता त्या नाकाने श्वास घेऊ शकत नाहीत. या प्रकरणी त्यांनी कोईंबतूर जिल्हाधिकाऱ्यांकडे एक याचिका दाखल केली आहे.
 
नुकतंच चेन्नईची युवा खेळाडू प्रिया हिच्या मृत्यूसाठी वैद्यकीय निष्काळजीपणा कारणीभूत ठरला ही गोष्ट बाहेर आल्यानंतर राज्यात बराच गोंधळ झाला होता. वैद्यकीय निष्काळजीपणा आता तामिळनाडूमध्ये मोठ्या वादाचं कारण बनतोय.
 
कोईंबतूरच्या रहिवासी शेबिया अशाच एका घटनेबद्दल सांगतात.
शेबिया आपले पती आणि दोन मुलींसह कोईंबतूर जिल्ह्यातल्या सोवरीपलयम शहरात राहातात. याच शहरातल्या एका खाजगी कॉलेजमध्ये दोघं नवरा-बायको हाऊसकिपिंग स्टाफ म्हणून काम करतात.
 
सन 2019 मध्ये शेबिया आजारी पडल्या होत्या आणि त्यांनी काही काळासाठी आपली नोकरी सोडली. मग कुटुंबाचा सगळा भार त्यांचे पती नागराज यांच्या खांद्यावर आला.
 
टेस्ट केल्यानंतर कळलं की शेबियाला थायरॉईड ग्रंथीत मल्टीनोड्यूलर गॉईटर नावाचा आजार आहे. 10 डिसेंबर 2019 ला कोईंबतूरच्या सरकारी मेडिकल कॉलेज आणि ईएसआय हॉस्पिटलमध्ये शेबियाचं ऑपरेशन झालं.
 
त्या म्हणतात, “त्या दिवशी मला श्वास घ्यायला खूप त्रास होत होता. मी जेव्हा दवाखान्यात पोचले तेव्हा त्यांनी माझ्या घशात एक नळी घातली पण यामुळे माझा त्रास कमी झाला नाही. त्यांनी सांगितलं की ऑपरेशनदरम्यान माझ्या श्वासनलिकेला इजा झालीये. एक दोन महिन्यात मला बरं वाटेल. तीन महिन्यांनी त्यांनी ती नळी काढून टाकली आणि घशातलं छिद्र बंद केलं. पण मला श्वास घ्यायला त्रास होतच राहिला.”
 
‘दुसऱ्यांदा ऑपरेशन करूनही उपयोग झाला नाही’
शेबिया पुन्हा दवाखान्यात गेल्या तेव्हा ते हॉस्पिटल कोव्हिड स्पेशल सेंटरमध्ये परावर्तीत झालं होतं. त्यांना कोईंबतूर सरकारी मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये रेफर केलं होतं.
 
शेबिया पुढे सांगतात, “तिथे माझ्या श्वासनलिकेचं पुन्हा ऑपरेशन झालं आणि श्वास घेण्यासाठी पुन्हा माझ्या घशात टाकली. घशात नळी टाकल्याने मला बोलता येत नव्हतं आणि बोलायचं असेल तर घशाला असलेलं छिद्र बंद करावं लागायचं.”
त्या म्हणतात, “मी जेव्हा ईएसआय हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी याबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की लाखात एक प्रकरण असं असतं. ते म्हणाले की आता काही करता येऊ शकत नाही. मी गेली तीन वर्षं तोंडाने श्वास घेतेय, नाकाने श्वास घेता येत नाहीये.”
 
शेबिया म्हणतात की त्यांची थायरॉईडची समस्याही ऑपरेशननंतर बरी झाली नाही. पुन्हा तसाच त्रास सुरू झाला आहे. “आता डॉक्टर म्हणतात की पुन्हा ऑपरेशन करावं लागेल. पण त्यांचंही असंही म्हणणं आहे की पुन्हा ऑपरेशन केलं तर मी बोलू शकेन याची काही गॅरेंटी नाही.”
 
शेबिया म्हणतात की गेल्या तीन वर्षांपासून त्यांना त्रास होतो आहे. त्या खाऊ शकत नाही, व्यवस्थितपण हिंडू-फिरू शकत नाहीत.
 
त्या म्हणतात, “आता काय करावं काहीच कळत नाही. आम्ही भाड्याच्या घरात राहातो आणि नवऱ्याच्या कमाईवर घर चालतं.”
 
त्या फारवेळ सलग बोलूही शकत नाहीत. त्यांनी 12 डिसेंबरला कोईंबतूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून मदत मागितली आहे.
 
‘हॉस्पिटलकडून समाधानकारक उत्तर नाही’
शेबियाचे पती नागराज म्हणतात की त्यांना हॉस्पिटलकडून समाधानकारक उत्तर मिळालं नाहीये.
 
ते म्हणतात की ते आपली तक्रार घेऊन जेव्हा पोलिसांकडे गेले तेव्हा पोलिसांनी सांगितलं की या प्रकरणात त्यांना काही अधिकार नाहीयेत आणि त्यांनी नागराजला आरोग्य खात्यात जायला सांगितलं. दुसरीकडे आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे ते ईएसआय हॉस्पिटलची चौकशी करू शकत नाहीत.
 
नागराज यांनी बीबीसी तामिळशी बोलताना सांगितलं की, “शेवटचा उपाय म्हणून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांनी संपर्क केला आहे.”
 
ते पुढे म्हणतात, “दर महिना 9000 च्या पगारात आम्हाला घर चालवावं लागतं. त्यात शेबियाच्या उपचाराचा खर्च, मुलींच्या शिक्षणाचा खर्च आणि घरखर्च सगळं भागवावं लागतं. शेबियाची तिच्या आजारातून सुटका झाली पाहिजे.”
 
पोलीस या प्रकरणात हस्तक्षेप करू शकत नाहीत का?
आम्ही माजी पोलीस अधिक्षक करुणानिधी यांना विचारलं की वैद्यकीय निष्काळजीपणा बाबतीत पोलीस काही करू शकत नाहीत का?
 
ते म्हणतात की, “जर चुकीचे उपचार किंवा वैद्यकीय निष्काळजीपणामुळे कोणाचा जीव गेला तर तो गुन्हा ठरतो आणि अशा प्रकरणात पोलीस हस्तक्षेप करू शकतात.”
पण कोणाचा मृत्यू झाला नसेल तर पीडित आरोग्य विभागाकडे आपली तक्रार दाखल करू शकतात. त्याची विभागीय चौकशी होईल. दुसरं म्हणजे पीडित नुकसानभरपाईसाठी कोर्टात केस दाखल करू शकतात.
 
वैद्यकीय गुंतागुंतीच्या प्रकरणांना वैद्यकीय निष्काळजीपणा म्हणता येईल का?
आम्ही याबाबतीत डॉक्टर्स असोसिएशन फॉर सोशल इक्वॅलिटीचे सदस्य डॉक्टर जी आर रवींद्रनाथ यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सांगितलं की अशी उदाहरणं आहेत जेव्हा थायरॉईड ऑपरेशननंतर रूग्णाला त्रास झालेला आहे.
 
ते म्हणतात, “पण त्या सगळ्या केसेसला आपण वैद्यकीय निष्काळजीपणा म्हणू शकत नाही. आरोग्य विभाग एक समिती नेमून या प्रकरणांची चौकशी करून पाहू शकतो की एखाद्या वेळेस निष्काळजीपणा तर झाला नाही ना.”
 
‘दुर्मीळ केस’
सरकारी मेडिकल कॉलेज आणि ईएसआय हॉस्पिटलचे डीन डॉ एम रवींद्रन यांनी बीबीसी तामिळशी बोलताना सांगितलं की ऑपरेशनदरम्यान कधी कधी वैद्यकीय गुंतागुंतही होते.
 
ते म्हणतात, “म्हणूनच रुग्णाचा (शेबिया)चा जीव वाचवण्यासाठी आम्हाला वेगळं ऑपरेशन करावं लागलं. त्यांच्या घशाला असलेलं छिद्र सील करावं लागलं. अशा प्रकारच्या ट्रेकियोस्टॉमीमध्ये बहुतांश रुग्णांचा आवाज जातो. पण हे करावं लागतं कारण त्याने रुग्णाचा जीव वाचतो.”
 
रवींद्रन पुढे म्हणतात, “ऑपरेशनदरम्यान अशी वैद्यकीय गुंतागुंत होणं दुर्मीळ असतं पण याला वैद्यकीय निष्काळजीपणा म्हणता येऊ शकत नाही. आम्ही त्या रुग्णाच्या घशात ट्रेकियोस्टोमीमुळे झालेल्या छिद्राला सील करण्यासाठी पुन्हा ऑपरेशन करू.”
 
Published By- Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

इम्रान खानची माजी पत्नी रेहम खानने केले तिसरे लग्न