मुंबई-अहमदाबाद महामार्ग 8 वर घोडबंदर जवळ असलेल्या जुन्या वर्सोवा ब्रिजच्या गर्डरला सप्टेंबर महिन्यात तडे गेले होते. दुरुस्तीच्या कामासाठी अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद होता. केवळ हलक्या वाहनांना ये-जा करण्यासाठी हा ब्रिज खुला ठेवण्यात आला होता. मात्र 14 मे ते 17 मे या चार दिवसांच्या कालावधीत लोड टेस्टिंगसाठी हा ब्रिज पूर्णपणे बंद ठेवण्यात आला. ब्रिजवरील वाहतूक बंद ठेवण्यात आल्याने या मार्गावरुन नियमित प्रवास करणाऱ्या अनेक वाहनचालकांची मोठी गैरसोय होत होती. इतकंच काय, तर अनेक हिंदी-मराठी मालिकांचे सेट्स या भागात असल्यामुळे कलाकारांनाही इच्छित स्थळी पोहचण्यात अडचणी आल्या. मुंबई आणि दिल्ली, गुजरातला जोडणारा हा ब्रिज होता. तास-दीड तास वाहनचालकांना वाहतुक कोंडीचा त्रास सहन करावा लागत होता.