Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

झिका व्हायरस म्हणजे काय?: केरळमध्ये 15 रुग्ण आढळल्याने खळबळ, सतर्कतेचा इशारा

Webdunia
शुक्रवार, 9 जुलै 2021 (18:55 IST)
केरळमध्ये झिका व्हायरसचा संसर्ग झालेले 15 रुग्ण आढळून आल्यानंतर सर्वच जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
 
केरळच्या तिरुअनंतपुरम जिल्ह्यात झिका व्हायरसचा प्रसार होत असल्याची माहिती आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी दिली.
 
याआधी भारतात 2016-17 मध्ये गुजरात राज्यात झिका व्हायरसच्या संसर्गाचे प्रकरण समोर आले होते.
 
झिका व्हायरस हा डासांमधून पसरणारा विषाणू आहे. या विषाणूमुळे लहान मुलांच्या मेंदूवर परिणाम होतो. तसंच गुलियन-बेअर सिंड्रोम नावाचा दुर्मिळ आजारही यामुळे पसरण्याची शक्यता असते.
 
प्रामुख्याने हा व्हायरस डासांमार्फत पसरतो, असं म्हटलं जात असलं तरी काही प्रमाणात त्याचा संसर्ग लैंगिक संबंधामार्फतही होत असल्याचं दिसून आलं आहे.
 
केरळमध्ये तिरुअनंतपुरम जिल्ह्यात सापडलेले सर्व नवे रुग्ण हे वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी आहेत.
 
वीणा जॉर्ज यांनी याविषयी माहिती देताना सांगितलं, "झिका व्हायरसची लागण झालेल्या पहिल्या रुग्णाची ओळख पटवण्यात आली आहे. ही व्यक्ती एक 24 वर्षांची गरोदर महिला आहे. तामिळनाडू सीमेशी लागून असलेल्या एका गावात ती राहते."
 
या महिलेला तिरुअनंतपुरम येथील एका रुग्णालयात 28 जून रोजी दाखल करण्यात आलं होतं. तिला ताप, डोकेदुखी, अंगावर पुरळ वगैरे त्रास जाणवत होता. या महिलेने बुधवारी (7 जुलै) एका बाळाला जन्म दिला आहे.
 
महिलेची प्रकृती सध्या स्थिर असून तिची प्रसूतीही 'नॉर्मल' झाली. महिलेने इतर कोणत्याही ठिकाणी प्रवास केल्याची नोंद नाही, असं जॉर्ज यांनी सांगितलं.
 
काही दिवसांपूर्वी राज्यात मॉन्सूनचं आगमन झालं. त्यानंतर सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे पाणी साठून मोठ्या प्रमाणात डासांची पैदास होऊ लागली आहे, असं जॉर्ज म्हणाल्या.
 
केरळचे आरोग्य सचिव डॉ. राजन खोब्रागडे यांनी बीबीसीशी बोलताना याविषयी अधिक माहिती दिली.
 
संसर्गाचा प्रादुर्भाव झालेल्या ठिकाणी सरकारने कठोर देखरेखीसाठी विशेष पथकं पाठवली आहेत. लोकांमध्ये या आजाराबाबत जनजागृती करणं, समुपदेशन करणं, यांसारखी कामे केली जात आहेत.
 
केरळ सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेविरुद्ध सामना करत आहे. गेल्या 7 दिवसांपासून केरळचा कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह रेट 10 टक्क्यांपेक्षाही वर गेला आहे.
 
भारतात कोरोना व्हायरसची लागण झालेला पहिला रुग्णही पहिल्यांदा जानेवारी 2020 मध्ये केरळमध्येच सापडला होता, हे विशेष.
 
झिका व्हायरस पहिल्यांदा युगांडाच्या झिका जंगलात आढळून आला होता. त्यावेळी हा व्हायरस माकडांमधून माणसात दाखल झाल्याचं सांगितलं जातं.
 
1952 साली पहिल्यांदाच झिका व्हायरसची नोंद घेतली गेली.
 
संशोधकांच्या मते भारतातील नागरिक मोठ्या संख्येने कोरोना व्हायरसच्या संपर्कात आलेले आहेत. 196 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 33 रुग्णांमध्ये झिका व्हायरसबाबत प्रतिकारशक्ती तयार झाल्याचं सांगितलं जातं.
 
1953 रोजी प्रकाशित झालेल्या एका अहवालात भारतात झिका व्हायरसची नागरिकांना लागण होत असते, हे निदर्शनास आलं होतं.
 
2016 आणि 2017 मध्ये अहमदाबाद शहरात झिका व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची नोंद झाली होती.
 
झिका व्हायरस : ठळक मुद्दे
झिका व्हायरस प्रामुख्याने डासांमार्फत पसरतो, असं म्हटलं जात असलं तरी तो लैंगिक संबंधांतूनही पसरू शकतो.
झिका व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांमधील मृत्यूदर अतिशय कमी आहे. विषाणूची लागण झालेल्या पाच व्यक्तींपैकी केवळ एका व्यक्तीला याची लक्षणे दिसून येतात.
झिका व्हायरसची लागण झाल्यानंतर साधारणपणे ताप, पुरळ आणि सांधेदुखी यांसारखी लक्षणे दिसू शकतात.
झिका व्हायरस सर्वप्रथम 1947 साली माकडांमध्ये आढळून आला होता. त्यानंतर 1954 साली पहिल्यांदा याचा संसर्ग मानवालाही झाल्याचं नायजेरियात आढळून आलं.
त्यानंतर आफ्रिका, दक्षिण-पूर्व आशिया आणि पॅसिफिक क्षेत्रातील बेटांवर अनेकवेळा झिका व्हायरसच्या संसर्गांचे प्रकरण समोर आले.
2015 साली ब्राझीलमध्ये झिका व्हारसची लागण झाल्याचं प्रकरण समोर आलं होतं. पण त्यावेळी ही साथ झपाट्याने पसरली होती.
झिका व्हायरसवरही कोणताच उपचार नाही. त्यामुळे डासांपासून स्वतःला वाचवणं, हाच एकमेव प्रतिबंधक उपाय यावर आहे, असं तज्ज्ञ सांगतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

पुढील लेख