Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Wrestler protest : विनेश फोगाट, साक्षी मलिक यांचं जंतरमंतरवरील आंदोलन पोलिसांनी हटवलं, आंदोलक ताब्यात

Webdunia
रविवार, 28 मे 2023 (15:29 IST)
Wrestler protest News : विनेश फोगाट आणि साक्षी मलिक यांच्यासह कुस्तिगिरांचं जंतरमंतवर सुरू असलेला आंदोलन दिल्ली पोलिसांनी पूर्णपणे हाटवलं आहे. बीबीसीच्या वरील फोटोत रिकाम्या जागेत आधी हे आंदोलन आणि कुस्तिगिरांचे तंबू होते. गेले 36 दिवस हे आंदोलन सुरू होतं.
 
आंदोलक कुस्तिगिरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
 
विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासह आंदोलक कुस्तीपटू जंतरमंतरहून नव्या संसदेच्या दिशेने जाण्यासाठी जात असताना पोलीस आणि त्यांच्यात झटापट झाली.
 
नव्या संसदेसमोर महिला सन्मान महापंचायत आयोजित करण्याचा आंदोलक कुस्तीपटूंचा प्रयत्न होता.
 
"सर्व कुस्तीपटू तसंच ज्येष्ठ वयाच्या महिलांना अटक केल्यानंतर आता पोलिसांनी जंतरमंतर इथले आमचे तंबू काढून टाकायला सुरुवात केली आहे. तंबूमध्ये असलेल्या आमच्या वस्तूही घेतल्या जात आहेत. ही काय गुंडशाही आहे"? असं ट्वीट साक्षी मलिकने केलं आहे.
 
"खेळाडूंचा आदर करतो पण नव्या संसदेच्या उद्घाटन सोहळ्यात आम्ही कोणत्याही स्वरुपाचा अडथळा येऊ देणार नाही", असं दिल्लीचे विशेष पोलीस आयुक्त दीपेंद्र पाठक यांनी सांगितलं.
 
राजधानी दिल्लीत एकीकडे नव्या संसदेच्या उद्घाटनाचा सोहळा सुरू आहे तर दुसरीकडे पोलीस आणि कुस्तीपटू यांच्यात धक्काबुक्की झाली. कुस्तीपटूंना अटक झाल्याचं साक्षी मलिकने म्हटलं आहे.
 
महिला कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ जंतर मंतरला जाण्यापासून रोखल्यामुळे शेतकरी नेते राकेश टिकैत दिल्लीच्या गाझीपूर सीमेवर निदर्शनाला बसले आहेत.
 
महिला कुस्तीपटूंनी रविवारी नवीन संसद भवनासमोर पहिल्या महिला सम्मान महापंचायतीची घोषणा केली होती. त्यामुळे संपूर्ण दिल्लीत सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली आहे आणि दिल्लीकडे येणारे अनेक मार्ग बंद करण्यात आले आहेत.
 
राकेश टिकैत गाझीपूर येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, "पोलिसांनी सर्व शेतकऱ्यांना सीमेवर थांबवलं आहे. आम्ही सध्या इथेच निदर्शनला बसू आणि पुढची दिशा ठरवू. पैलवान मुलींना रस्त्यावर फरपटत नेणाऱ्या सरकारने मर्यांदाचा दाखला दिला आहे आणि त्याचा त्यांना फार अभिमान वाटतोय. त्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही गाझीपूर सीमेवरच असू."
 
दरम्यान टिकैत आणि पोलिसांमध्ये टोकाचा वाद झाला. पीटीआयने दिलेल्या बातमीनुसार गाझीपूर सीमा बंद करण्यात आली आहे आणि शेतकऱ्यांना दिल्लीत जाण्यापासून थांबवण्यात आलं आहे.
नव्या संसदेबाहेर आंदोलक कुस्तीपटूंनी महिला सन्मान महापंचायतीचं आयोजन केलं होतं. यासाठी हरियाणा इथून मोठ्या प्रमाणावर समर्थक येण्याची शक्यता होती. मात्र नव्या संसदेच्या उद्घाटनच्या सुरक्षिततेचं कारण देत या सगळ्यांना सीमेवरच रोखण्यात आलं.
 
बजरंग पुनियानेदेखील ट्वीट करुन म्हटलं आहे की, "एखादं सरकार आपल्या खेळाडूंबरोबर असं वागतं का? आम्ही काय गुन्हा केला आहे"? असा सवाल बजरंगने केला आहे.
 
आंदोलक कुस्तीपटू काही दिवसांपूर्वीच जंतरमंतरहून इंडिया गेट इथे गेले होते. इंडिया गेट इथे त्यांनी कँडल मार्च आयोजित केला होता. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रृजभूषण सिंह यांच्याविरोधात लैंगिक छळाचा आरोप कुस्तीपटूंनी केले आहेत. त्यांच्याविरुद्ध दोन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. ब्रृजभूषण यांना अटक होत नाही तोवर आंदोलन संपवणार नाही अशी भूमिका कुस्तीपटूंनी घेतली होती.
 
रविवारी नव्या संसदेच्या उद्घाटन सोहळ्यामुळे राजधानी दिल्लीला छावणीचं स्वरुप आलं आहे. आंदोलक कुस्तीपटूंनी नव्या संसदेबाहेर महिला सन्मान महापंचायत आयोजित केली होती. यासाठी ते जात असताना पोलीस आणि कुस्तीपटूंमध्ये झटापट झाली. ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ तसंच आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये पदकविजेत्या साक्षी मलिक, विनेश फोगाट यांना ढकलत, खेचत बसमध्ये कोंबण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी महिला पोलिसांचा प्रचंड फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
 
ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ, आशियाई अजिंक्यपद यांच्यासह देशविदेशातील असंख्य स्पर्धांमध्ये पदक पटकावणारे कुस्तीपटू 23 एप्रिलपासून राजधानी दिल्लीतल्या जंतरमंतर इथे आंदोलनाला बसले. आज या आंदोलनाला एक महिना पूर्ण झाला आहे.
 
या कुस्तीपटूंनी यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यातही आंदोलन केलं होतं. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन केलं होतं. महिला कुस्तीपटूंनी ब्रृजभूषण यांच्याविरोधात लैंगिक शोषणासारखे आरोप केले होते.
 
प्रकरण काय आहे?
18 जानेवारी 2023 रोजी विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी दिल्लीतल्या जंतरमंतर इथे आंदोलन सुरू केलं. तिघांनी ब्रृजभूषण सिंह यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले. पायाभूत सुविधांची कमतरता, आर्थिक गफलती, खेळाडूंशी गैरवर्तन हे आरोप होते. मात्र सगळ्यात गंभीर आरोप होता तो म्हणजे लैंगिक शोषणाचा.
 
विनेश फोगाटने रडत रडत सांगितलं होतं, "राष्ट्रीय शिबिरात ब्रजभूषण आणि कोच महिला कुस्तीपटूंचं लैंगिक शोषण करतात. आमच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करतात. आम्हाला त्रास देतात".
 
हे आरोप फेटाळताना ब्रृजभूषण यांनी म्हटलं की, "कोणत्याही खेळाडूचं लैंगिक शोषण झालेलं नाही. हे आरोप खरे ठरले तर मी फाशीवर लटकेन".
 
खेळाडूंच्या आरोपांचं गांभीर्य लक्षात घेऊन केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी त्यावेळी कुस्तीपटूंशी भेट घेतली. आरोपांसंदर्भात तपास करण्यासाठी 23 जानेवारीला त्यांनी 5 सदस्यीय समितीची स्थापना केली.
 
'ओव्हरसाईट कमिटी' असं या समितीचं नाव होतं. यामध्ये महान बॉक्सिंगपटू मेरी कोम यांच्यासह ऑलिम्पिक पदकविजेता योगेश्वर दत्त, माजी बॅडमिंटन खेळाडू तृप्ती मुरगुंडे, टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम अर्थात टॉप्सचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी राजगोपालन आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण अर्थात साईचे माजी कार्यकारी संचालक राधिका श्रीमन यांचा समावेश होता.
 
नंतर या समितीत भाजप नेता बबिता फोगाट यांचाही समावेश करण्यात आला.
 
ब्रृजभूषण यांच्यासह कोचवर झालेल्या लैंगिक छळाचे आरोप, आर्थिक गफलती आणि प्रशासकीय त्रुटी या आरोपांची छाननी करणं हे समितीचं काम होतं.
 
समितीने एक महिना भारतीय कुस्ती महासंघाचं काम पाहणंही अपेक्षित होतं.
 
चार आठवड्यात चौकशी पूर्ण करण्याचा कालावधी देण्यात आला. नंतर आणखी दोन आठवड्यांसाठी कालावधी वाढवण्यात आला.
 
खेळाडूंनी सांगितलं की, समितीची स्थापना होऊन तीन महिने झाले पण समितीने आरोपांची काय शहानिशा केली, तपासाचा काय निष्कर्ष निघाला, हे अद्यापही समोर आलेलं नाही.
 
चौकशीच्या अहवालातील काही गोष्टी मीडियात लीक होत असल्याचा आरोप खेळाडूंनी केला. दरम्यान या समितीचा अहवाल अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही.
 
समितीच्या अहवालावर असंतुष्ट कुस्तीपटूंनी 23 एप्रिल रोज आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू केला. विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी दिल्लीचं जंतरमंतर गाठलं आणि आंदोलनाला बसले.
 
Published By- Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments