Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शाकंभरी देवीची पौराणिक कथा

shakambari devi katha
पृथ्वीवर एक राक्षस राज्य करीत होता. त्याचे नाव दुर्गमासुर. तो अत्यंत बलवान आणि पराक्रमी होता. दुर्गमासुर देवांचा, मानवांचा, ऋषीमुनींचा फार द्वेष करीत असे. दुर्गमासुराने दुष्टनीतीचा अवलंब करण्यासाठी ब्रह्मदेवाला प्रसन्न करविण्याचे ठरवले आणि तीव्र तप करू लागला. त्याच्या तपस्येने ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि समोर प्रकट होऊन म्हणाले, 'असुरा, मी प्रसन्न आहे. वर माग. 
'हात जोडून असुर म्हणाला, 'देवा, संपूर्ण वेदांचे ज्ञान माझ्याकडेच असावे. संपूर्ण मंत्रशक्ती ज्ञानासह माझ्या हातात यावी. देवतांना मी पराभूत करावे.' ब्रह्मदेवांनी राक्षसाची धूर्तता जाणली. ते हसले आणि म्हणाले, 'तथास्तु.' 
 
ब्रह्मदेवांचा एकच शब्द 'तथास्तु'; पण या एकाच शब्दाने या संपूर्ण सृष्टीमध्ये भयानक विनाशकारी शक्ती निर्माण केली. देव, मानव आणि ऋषी यांच्या जीवनाला आधार देणारे, मनाला चैतन्य देणारे संपूर्ण वेदज्ञान त्यांच्यापासून निघाले आणि दुर्गमासुराकडे आले. ओजस्वी मंत्रशक्ती सामर्थ्यासह निघाली आणि असुरामध्ये प्रविष्ट झाली. सृष्टीमधील चैतन्य संपले. सामर्थ्य लोप पावले. देव, मानव आणि ऋषिमुनी तेजोहीन झाले. प्रभाहीन झाले. शक्तीहीन झाले. वरदानामुळे शक्तीसंपन्न बनलेला दुर्गमासुर हाहाकार करीत आला आणि त्याने सर्वांचा पराभव केला. संपूर्ण जगावर अन्यायाची, असत्याची सत्ता सुरु झाली. दुर्गासुर उन्मत, बेफाम बनला. मानवांच्या हत्याकांडाचे भानक पर्व सुरु झाले. 
 
अखेर सर्व देव, ऋषी आणि मानव अरण्याकडे धावले आणि गहन अरण्यातील खोल गुहेत लपून बसले. उंच उंच पर्वतांच्या मध्ये दडलेल्या गुहेकडे असुरांचे लक्ष गेले नाही. बाहेरील जगात क्रूर राक्षसांचे थैमान चालू होते. इकडे गुहेच्या आत जीवनाचे नवे पर्व उदयाला आले. सर्व देव ऋषीं जगन्मातेला शरण गेले. आदिमाता महादेवीची उपासना चालू झाली. सर्वांच्या समोर भगवती प्रकट झाली. कसे रुप होते तिचे? आगळेवेगळे आणि भव्य सृष्टीमधील उंच-उंच पर्वत, डोंगर, हिरवीगार झाडेझुडे, नानारंगी फुले, पाने, रसरशीत डौलदार फळे या सर्वांची मिळून देवी तयार झाली. रुप विविधरंगी; पण तेजस्वी. जिकडे पाहावे तिकडे देवीचे तेजस्वी डोळे दिसत होते. सर्वजण तिला 'शताक्षी' असे म्हणू लागले. देवीच्या शंभर नेत्रांमधून कृपामृताचा वर्षाव होऊ लागला. या वर्षावामुळे सर्वजण उल्हासित झाले. नवे जीवन मिळाले. देवीने अनेक प्रकारच्या भाज्या, फळफळावळ आणि अन्न तयार केले. अनेक रुचकर पदार्थ तयार केले. आईच्या मायेने सर्वांना पोटभर खाऊ घातले. सर्वांना तृप्त केले. या देवीला सर्वजण 'शाकंभरी' देवी असे म्हणू लागले. 
 
यानंतर देवी गुहेच्या बाहेर आली. तिने गुहेच्या तोंडावर मोठे तळपते चक्र ठेवले. या चक्रामुळे गुहेतील सर्वांचे रक्षण होत होते. देवीने आपली शस्त्रेअस्त्रे बाहेर काढली आणि तिने दुर्गासुराला युध्दासाठी आव्हान दिले. दुर्गासुर आपल्या सैन्यासह लढू लागला. देवीच्या समोर कोणाचाही टिकाव लागला नाही. राक्षस आणि सैन्य पूर्णपणे मारले गेले. जगावरील मोठे संकट नाहीसे झाले. सर्व ज्ञान मंत्रसामर्थ्यासह देवांकडे, ऋषिमुनींकडे आणि मानवांकडे परत आले. 
 
देवी त्यांना म्हणाली, 'हे श्रेष्ठ ज्ञान आहे. हीच माझी वाणी आहे. ही माझी मंत्रशक्ती आहे. ज्ञानाची उपासना करा. मंत्रशक्तीची आराधना करा. हीच माझी खरी उपासना आहे. तुमचे कल्याण होवो.' एवढे बोलून देवी अंतर्धान पावली. शाकंभरी देवी ही खर्‍या अर्थाने माउली देवी होती. म्हणूनच पौष पौर्णिमेला शाकंभरी देवीची उपासना केली जाते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

श्री दत्त विजय संपूर्ण