Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'2032 पर्यंत कुस्ती खेळत राहिले असते', पदक हुकल्यानंतर विनेशची पहिली प्रतिक्रिया

Webdunia
शनिवार, 17 ऑगस्ट 2024 (13:20 IST)
अवघ्या काही ग्रॅम वजनामुळं ऑलिंपिक पदक मिळवण्याची संधी गमावलेल्या विनेश फोगाटची या संपूर्ण प्रकरणानंतरची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. विनेशनं सोशल मीडियावर चार पानांचं एक पत्रच पोस्ट केलं आहे.
 
विनेशनं यामध्ये तिच्या आजवरच्या संपूर्ण प्रवासाचं वर्णन करत अनेकांचे आभार मानले आहेत.
"ऑलिंपिकमध्ये 6 ऑगस्टच्या रात्री आणि 7 ऑगस्टच्या सकाळी आम्ही प्रचंड प्रयत्न केले. आम्ही एकाही क्षणाला माघार घेतली नाही. आमचे प्रयत्न सुरुच होते. पण वेळेला थांबवता आलं नाही," असं विनेश म्हणाली.
ऑलिंपिकमध्ये पदक मिळवण्यात आलेला अडथळा ही माझ्यासह माझी टीम, देश, नागरिक, माझे कुटुंब सर्वांसाठीच अत्यंत दुर्दैवी अशी बाब होती, असं विनेशनं म्हटलं आहे.
"कदाचित परिस्थिती वेगळी राहिली असती तर मी 2032 पर्यंतही कुस्तीच्या आखाड्यात उतरत राहिले असते. कारण माझ्यात अजूनही कुस्ती शिल्लक आहे. अजूनही माझ्यात संघर्ष करण्याची इच्छाशक्तीही आहे," असंही तिनं म्हटलं.
भविष्यात काय होईल, हे मी आताच सांगू शकत नाही. पण एक मात्र नक्की आहे की, सत्यासाठी आणि माझ्या मतासाठी मी कायम ठामपणे उभी राहील, असं विनेशनं या पत्रात म्हटलं आहे.
 
दरम्यान, विनेश फोगाटच्या ऑलिंपिकमधील फायनलच्या अपात्रतेविरोधात भारतानं केलेलं अपील कोर्ट ऑफ आर्बिटरेशन फॉर स्पोर्टमध्ये (CAS) ने फेटाळून लावलं.
 
ऑलिंपिकच्या महिला 50 किलो वजनी गटात विनेश फोगाटला अतिरिक्त वजनामुळं अपात्र ठरवलं होतं. त्याविरोधात विनेश फोगाट आणि भारतीय ऑलिंपिक संघटनेनं कोर्ट ऑफ आर्बिटरेशन फॉर स्पोर्टमध्ये (CAS) अपिल केलं होतं.
 
पदक जरी मिळालं नाही, तरी तिची मेहनत लक्षात असू द्या’
भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटच्या प्रकरणाबाबत नीरज म्हणाला, “तिला पदक मिळाले तर खूप छान होईल. जर ते मिळाले नाही, तर आपल्या सर्वांना माहित आहे की, जी स्थिती निर्माण झाली, ती झाली नसती तर विनेशचे पदक निश्चित होते.”
 
नीरज पुढे म्हणातो की, “पण जोपर्यंत ते पदक आपल्याकडे येत नाही, तोपर्यंत तो विचार आपल्या मनात राहतोच. लोक काही दिवस म्हणतील की, तू आमची चॅम्पियन आहेस. पण मला वाटतं की, आपण पोडियमवर राहिलो नाही तर लोकही आपल्याला लवकर विसरतात.”
 
लोकांना विनंती करत नीरज म्हणाला की, “लोक विसरले नाहीत, तर पदक मिळो किंवा न मिळो, काही फरक पडत नाही. माझी फक्त लोकांना विनंती आहे की, विनेशने जी मेहनत घेतली, ती लक्षात ठेवा.”
 
विनेश फोगाटचा कुस्तीला अलविदा
"आई, कुस्ती जिंकली मी हरले, तुझं स्वप्न आणि माझी हिंमत आता संपलीय, याहून अधिक लढण्याची ताकद माझ्यात उरली नाहीये," असं म्हणत भारताची कुस्तीपटू विनेश फोगाटने कुस्तीतून निवृत्तीची घोषणा केली आहे.
पॅरिस ऑलिंपिकमध्ये अंतिम फेरीत धडक मारल्यानंतर तांत्रिक कारणामुळे तिला अपात्र ठरवण्यात आलं होतं.
मंगळवारी (6 ऑगस्ट) विनेशनं महिलांच्या 50 किलो वजनी गटातील उपांत्य सामन्यात विनेशनं क्युबाच्या युस्नेलिस लोपेझ गझमनवर मात केली होती. मात्र, बुधवारी (7 ऑगस्ट) सकाळी विनेशचं वजन 100 ग्रॅम जास्त असल्याचं समोर आलं. त्यामुळे तिला अपात्र ठरविण्यात आलं.
7 ऑगस्टपासून देशभर विनेश फोगाटच्या अपात्रतेची चर्चा सुरु आहे. देशाच्या संसदेतही या विषयावरून मोठा गदारोळ झाला. क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांनीही या विषयावर संसदेत स्पष्टीकरण दिलं.
 
विनेशने 2022 सालच्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये 53 किलो वजनी गटात सहभागी होऊन सुवर्णपदक पटकाविले होते. आता पॅरिस ऑलिंपिकमध्ये मात्र ती खालचा वजनी गट म्हणजे 50 किलो गटात खेळली. त्याआधी झालेल्या पात्रता स्पर्धेत ती या वजनी गटात प्रथमच सहभागी होती.
पॅरिस ऑलिम्पिकमध्येही विनेश अन्न-पाणी वर्ज्य करून आपले वजन 50 किलोच्या आत ठेवत होती आणि स्पर्धेच्या पहिल्या दिवशी ती या गटात खेळण्यासाठी पात्र ठरली.
मात्र बुधवारी (7 ऑगस्ट) सकाळी वजन करताना तिचा अंदाज चुकला आणि वाढलेले वजन तिला निर्धारीत वेळेच्या आत 50 किलोच्या खाली आणता आले नाही.
 
'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
विनेश फोगाटकडे साऱ्या भारताचं लक्ष होतं. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ती कुस्तीच्या अंतिम फेरीत पोहोचली. पण वजनाच्या नियमात न बसल्याने विनेश अंतिम फेरीसाठी अपात्र ठरली, आणि सुवर्ण पदक मिळवण्याचं स्वप्न भंगलं.
 
महिलांच्या फ्री-स्टाईल कुस्तीमध्ये विनेश 50 किलो वजनी गटात खेळत होती. बुधवारी सकाळी फायनल पूर्वी वजन घेतलं गेल्यानंतर अधिकाऱ्यांना तिचं वजन प्रमाणित मर्यादेपेक्षा जास्त आढळलं.
 
भारतीय पथकाने हे काही ग्रॅम वजन घटवण्यासाठी थोडा अवधी मागितला, पण अखेर वजन घटवता न आल्याने विनेश फोगाटला अपात्र घोषित करण्यात आलं.
 
भारतीय संघासोबत यावेळी विविध क्षेत्रातील 13 डॉक्टरांचा ताफा होता. त्यामध्ये आहारतज्ज्ञांपासून मानसोपचार तज्ज्ञ आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश होता.
वैद्यकीय चमूचे प्रमुख डॉ. दिनशॉ पारडीवाला यांनी विनेश फोगाटच्या वजन प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, “अंतिम स्पर्धेसाठी म्हणजे आज तिचे वजन वाजवीपेक्षा अधिक असल्याचे लक्षात आले होते. प्रशिक्षकांनी वजन कमी करण्याचे नेहमीचे सोपस्कार सुरू केले होते. विनेशलाही आपण वजन खाली 50 किलोच्या आत आणू, याबाबत आत्मविश्वास होता."
 
मात्र 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम वजन जास्त असल्याचे लक्षात आले. 50 किलोपेक्षा हे वजन अधिक असल्याने तिला स्पर्धेतून बाद करण्यात आले.
 
पण या सगळ्यादरम्यान विनेशच्या शरीरातलं पाणी कमी झालं होतं. त्यामुळे तिच्या शरीरातील पाण्याची पातळी घटणार नाही, यासाठी तत्काळ उपचार केले गेले.
 
सुरक्षिततेचा उपाय म्हणून तिच्या रक्ताची चाचणीही करून घेतली. विनेशच्या बाबतीत कसलाही धोका आढळला नाही.
 
ती शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या ‘नॉर्मल’ असून विनेशने स्वत:ही आपण व्यवस्थित असल्याचे सांगितले असं भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्षा पीटी उषा यांनी म्हटलं आहे.
 
शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मी ठणठणीत आहे, मात्र अपात्र ठरविले गेल्यामुळे मी निराश झाले आहे असं विनेश म्हणाली आहे.
 
देशभरात दुःख, संताप आणि सहवेदनांचा महापूर
भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियाने सोशल मीडियावर विनेश फोगाटच्या निवृत्तीवर एक पोस्ट लिहून प्रतिक्रिया दिली आहे.
बजरंग पुनियाने लिहिले आहे की, “विनेश, तू हारली नाहीस, तुला हरवलं आहे. आमच्यासाठी तू नेहमीच विजेती असशील. तू फक्त भारताची कन्या नाही तर भारताची शानही आहेस."
विनेश फोगाटने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर भारतीय कुस्तीपटू साक्षी मलिकने प्रतिक्रिया दिली आहे.
साक्षी मलिकने सोशल मीडियावर लिहिले आहे की, “विनेश हा तुझा पराभव नाही तर हा त्या प्रत्येक मुलीचा पराभव आहे ज्यांच्यासाठी तू लढली आणि जिंकली होतीस. हा संपूर्ण भारताचा पराभव आहे. देश तुझ्या पाठीशी आहे. एक खेळाडू म्हणून तुझ्या संघर्षाला सलाम."
विनेश फोगाट अपात्र ठरल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स(पूर्वीचे ट्विटर)वर पोस्ट करून म्हटलं की, "विनेश, तू विजेती आहेस. भारताला तुझा अभिमान आहे आणि प्रत्येक भारतीयासाठी तू प्रेरणास्थान आहेस. आजचा हा धक्का वेदनादायक आहे. माझा उद्वेग शब्दांत व्यक्त करता येणार नाही. चिकाटी म्हणजे काय, याचं तू उत्तम उदाहरण आहेस. तू कायमच आव्हानांचा नेटाने सामना केला आहेस. अधिक जोमाने परत ये! आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत."
 
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार अखिलेश यादव यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.
 
अखिलेश यादव यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत म्हटलंय की, "विनेश फोगाटला अंतिम फेरीत खेळता न येण्याच्या गोष्टीची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि सत्य काय आहे, हे समोर आलं पाहिजे."
 
ऑलिंपिक महासंघ आणि फोगाट कुटुंबीय काय म्हणाले?
याबाबत भारतीय ऑलिंपिक असोसिएशनने (IOA) खंत व्यक्त केली आहे.
 
आयओएने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "आम्ही अत्यंत खेदाने ही बातमी सांगत आहोत की, विनेश फोगाटला महिला कुस्ती स्पर्धेच्या 50 किलो वजनी गटातून अपात्र केलं गेलंय. रात्रभर संघाच्या सर्वोत्तम प्रयत्नानंतरही विनेशचं वजन कमी भरलंय. आज सकाळी तिचं वजन 50 किलोपेक्षा जास्त असल्याचे आढळून आलंय."
विनेश फोगाटच्या काकांचा मुलगा रवी किरण याने बीबीसीला सांगितले, "आम्हाला आतापर्यंत इतकंच कळलंय की, विनेश ऑलिंपिकमधून बाहेर पडलीय. याहून अधिक आम्हाला काहीच कळलं नाही. विनेशचा भाऊ तिच्यासोबत पॅरिसमध्ये आहे. त्याचेही अद्याप कुटुंबाशी बोलणे झालेले नाही. कदाचित काही वेळाने त्याच्याशी बोलणं होईल. पण सध्या तरी आमच्याकडे सांगण्यासारखे काही नाही."
केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांनी लोकसभेत बोलताना, भारतीय ऑलिंपिक असोसिएशनने याबद्दल तीव्र विरोध प्रकट केला असून, याबाबतीत आणखी पर्यायांचा विचार करा असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असोसिएशनला सांगितल्याचं स्पष्ट केलं.
 
पैलवान महावीर फोगाट म्हणाले की, "मला काहीही बोलायचं नाहीय. संपूर्ण देशाला विनेशकडून सुवर्णपदकाची आशा आहे. नियम तर आहे, मात्र कुणी 50-100 ग्रॅमहून अधिक वजन असेल तरी त्यांना खेळण्यासाठी परवानगी दिली जाते."
"मी देशातील लोकांना सांगू इच्छितो की, निराश होऊ नका. एक दिवस ती नक्की पदक घेऊन येईल. मी तिला पुढच्या ऑलिंपिकसाठी तयार करेन," असंही महावीर फोगाट म्हणाले.
 
वजनाबाबत आधीपासूनच होती चिंता
बुधवारी (7 ऑगस्ट) सकाळी बीबीसी हिंदीचे प्रतिनिधी अभिनव गोयल यांच्याशी बोलताना बजरंग पुनिया यांनी विनेश फोगटच्या वजनाबाबत चिंता व्यक्त केली होती.
 
बजरंग पुनिया म्हणाले होते की, "कोणताही खेळाडू प्रथम सेलिब्रेशन करत नाही. आधी वजन कमी करावे लागते. 50 किलोपेक्षा कमी वजन कमी करणे अवघड असते. मुलांचे वजन लवकर कमी होते. मुलींना हे खूप अवघड असते. मुलींना त्यांचं वजन 50 किलोच्या खाली आणणे कठीण असतं."
 
बजरंग पुनिया यांनी असंही म्हटलं होतं की, "गेल्या सहा महिन्यांपासून विनेश सतत वजन कमी करण्याचा प्रयत्न करत होती. थोडंसं पाणी आणि एक-दोन रोटी असंच तिचं जेवण होतं. वजन कमी करणे खूप कठीण असतं."
 
दरम्यान, बजरंग पुनिया असेही म्हणाले होते की, ती (विनेश) तिथे उभी आहे, हेही आमच्यासाठी एकप्रकारे पदक आहे
Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Tulsi Vivah 2024: भगवान विष्णूने तुळशीशी लग्न का केले? जाणून घ्या तुळशी विवाहाचे नियम आणि पद्धत

तुळशीच्या रोपाजवळ शिवलिंग किंवा गणेश मूर्ती ठेवावी की नाही?

हे सुपर फूड 35 पेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी खूप महत्वाचे असतात

हार्मोनल मुरुमांच्या समस्येने त्रस्त असाल तर हा उपाय अवलंबवा

ओठांवर जास्त लिपस्टिक लावल्याने होऊ शकतात या 3 समस्या, वेळीच सावध व्हा

सर्व पहा

नवीन

ठाण्यातून निवडणुकीपूर्वी 13.26 कोटी रुपयांचे अवैध साहित्य जप्त

निवडणूक जिंकल्यास शरद पवारांच्या विधानसभेतील सर्व पदवीधरांचे लग्न लावून देण्याचे आश्वासन या उमेदवाराने दिले

हारिस रऊफने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास

Gold Silver Price Today सोन्या-चांदीच्या भावात वाढ ! आजचे नवीनतम दर जाणून घ्या

Champions Trophy 2025 : टीम इंडिया पाकिस्तानला जाणार नाही

पुढील लेख
Show comments