गणेशोत्सवाच्या काळात पुण्यात सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी जमावबंदी लागू करण्यात येणार आहे. पुण्यामध्ये गणेशोत्सवाच्या काळात 10 सप्टेंबर 2021 ते 19 सप्टेंबर 2021 पर्यंत कलम 144 लागू असेल.
पुणे शहरामध्ये 10 सप्टेंबर 2021 ते 19 सप्टेंबर 2021 पर्यंत जमावबंदी तसेच संचारास मनाई करणारे आदेश लागू केले गेले आहेत. सर्व धर्माची प्रार्थना स्थळे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या गणेशोत्सवासाठी पुणे शहरामध्ये फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश पुणे शहर पोलीस सहआयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांनी लागू केले आहेत.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाच्या काळात पुण्यात अनुचित प्रकार टाळण्यासाठी 7 हजार पोलीस तैनात केले जाणार आहेत. या काळात पोलिसांकडून सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही, याची विशेष काळजी घेतली जाईल. त्यामुळे नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस सहआयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांनी केले आहे.
फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 प्रमाणे प्राप्त झालेल्या अधिकारानुसार पुणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये कोणत्याही रस्त्यात अथवा सार्वजनिक जागेत, कोणत्याही सार्वजनिक गणेश मंडळाच्या समोर कोणत्याही ज्वालाग्रही पदार्थाच्या सहाय्याने आगीचा लोळ निर्माण करण्यास किंवा हवेत सोडण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम 188 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असेही पुणे शहर पोलीस सह आयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांनी आदेशीत केलेले आहे.
गणेशोत्सवात गुन्हे घडू नयेत यासाठी वेगळा बंदोबस्त तैनात करण्यात येत असून महत्त्वाच्या ठिकाणावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर ठेवली जाईल.