पुण्यातील भाजपाचे माजी राज्यसभा खासदार संजय काकडे आणि पत्नी उषा काकडे यांना चतु:श्रृंगी पोलिसांनी अटक केली. त्यानंतर शिवाजीनगर न्यायालयात हजर केले असता जामीनावर त्यांची सुटकाही करण्यात आली आहे. मेव्हण्याला जीव ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली.
माजी राज्यसभा खासदार संजय काकडे आणि मेव्हणा युवराज ढमाले दोघे २०१० पर्यंत एकत्रित बांधकाम व्यावसायात होते. पण काही कारणास्तव दोघांनी स्वतंत्र व्यवसाय करण्यास सुरुवात केला. त्यानंतर २०१८ मध्ये मेव्हणा युवराज ढमाले यांना गोळ्या घालून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी युवराज ढमाले यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला गोता. चतु:श्रृंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी संजय काकडे आणि उषा काकडे यांना अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावर न्यायालयाने संजय काकडे यांना १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला.
या प्रकरणी माजी खासदार संजय काकडे म्हणाले की, “आमच्यातील कौटुंबिक वाद आहे. दोन वर्षांपूर्वी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने आता केला आहे. या दोन वर्षात फिर्यादीबरोबर माझं आणि पत्नीचे साधं बोलणे देखील झालेले नसताना मग आत्ताच हे आरोप का केले याचं आश्चर्य वाटत आहे. आता न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. आज न्यायालयात प्रत्येकी 15 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे. आम्ही न्यायालयीन प्रक्रियेचं पालन करत आहोत”.