पिंपरी चिंचवड मोफत बेडसाठी रुग्णांकडून पुन्हा एकदा एक लाख ऐंशी हजार रुपये लुबाडण्यात आले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या भोसरीच्या नवीन रुग्णालयात ही धक्कादायक बाब घडली आहे. याप्रकरणी जुन्नर तालुक्यातील आळेफाटा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच बेडसाठी पैशाची मागणी करणाऱ्या आळेफाटा प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी अमोल पवारला बेड्या ठोकण्यात आल्या.
23 एप्रिलला सिन्नर येथील एकाच कुटुंबातील तिघाचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले होते. यामध्ये आई आणि दोन मुलांचा समावेश होता. पण नाशिक जिल्ह्यात त्यांना बेड उपलब्ध झाला नाही. अनेक ठिकाणी विचारणा केल्यानंतर त्यांना आळेफाटा प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी असलेल्या अमोल पवार यांच्याशी संपर्क साधण्यास सांगण्यात आलं. त्याच्याशी संपर्क केला असता, त्याने पिंपरी महापालिकेच्या नवीन भोसरी रुग्णालयात तीन बेड उपलब्ध करून देतो असं सांगितलं. पण तीन बेडसाठी एक लाख ऐंशी हजारांची मागणी केली. महापालिकेच्या रुग्णालयात मोफत बेड मिळतो, याची कल्पना होती. पण तातडीनं बेड उपलब्ध होणं गरजेचं असल्यानं मी पैसे दिले, असं तक्रारदारांनी सांगितलं आहे.
मोफत बेडसाठी पैसे मोजल्यानंतर बेड उपलब्ध झाला, मात्र उपचारावेळी आई आणि दोन्ही मुलं असा तिघांचाही मृत्यू झाला. नातेवाईकांसाठी हा धक्का होता. यातून सावरल्यानंतर पोलिसांत धाव घेत नातेवाईकांनी तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल करून अमोल पवारला अटक करण्यात आली आहे.