दोन दिवसापुर्वीच्या तौक्ते चक्रीवादळाने केरळ महाराष्ट्र आणि गुजरात या तीनही राज्यात थैमान घातले. महाराष्ट्रातल्या कोकण विभागाला सर्वाधिक फटका बसला आहे व नागरिकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झालेले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ गुजरातचा दौरा करून गुजरातलाच एक हजार कोटी रूपयांची आर्थिक मदत केली. पण महाराष्ट्राला सापत्न वागणूक देत या वादळाने झालेल्या नुकसानभरपाईबाबत कवडीची मदतच काय पण विचारपुसदेखील केली नाही. अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसने व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे याबाबत बोलताना म्हणाले की, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरात राज्याला सढळ हस्ते १ हजार कोटी रुपयांची मदत केली, परंतु महाराष्ट्रात झालेली हानी ही त्यांना दिसली नाही. कोकणातल्या माणसावर नरेंद्र मोदी सरकारने अन्याय केला आहे. देशाचे पंतप्रधान राज्याराज्यांमध्ये भेदभाव करतील ही अपेक्षा नव्हती. वास्तविक सगळ्यांनाच चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई पंतप्रधान नरेंद्र मोदी देतील ही अपेक्षा होती परंतु जिथे सरकार तिथेच मदत कदाचित अशी भाजप सरकारची भूमिका असावी अशी टीकाही तपासे यांनी केली आहे.
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी कोकणातल्या शेतकरी बांधव व नागरिकांच्या सोबत खंबीरपणे उभी असून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे उद्या कोकणचा दौरा करणार आहे. यानंतर राज्यसरकार नुकसान झालेल्या कोकणच्या जनतेला नक्कीच आधार देईल असा विश्वास असल्याचे महेश तपासे यांनी स्पष्ट केले.