Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नरेंद्र दाभोलकर स्मृतिदिन: दाभोलकरांच्या हत्येपासून ते निकालापर्यंत काय काय घडलं?

Webdunia
मंगळवार, 20 ऑगस्ट 2024 (10:00 IST)
आज ( 20 ऑगस्ट ) नरेंद्र दाभोलकर यांचा स्मृतिदिन आहे. या वर्षी 10 मे रोजी नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल लागला होता. त्यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने हा लेख पुन्हा शेअर करत आहोत.
 
अकरा वर्षांपूर्वी पुण्यात देशाला हादरवून टाकणारी एक घटना घडली होती. तारीख होती 20 ऑगस्ट 2013.
 
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रणेते, महाराष्ट्राच्या विवेकवादी चळवळीतले महत्वाचे कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची याच दिवशी पुण्यातल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर गोळ्या झाडून हत्या झाली होती.
 
आज (10 मे 2024) तब्बल 11 वर्षांनंतर 10 मे 2024 रोजी या प्रकरणाचा निकाल लागला होता.
 
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळस्कर यांना दोषी ठरवण्यात आलं.
 
विरेंद्र तावडे, अॅडव्होकेट संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना निर्दोष ठरवण्यात आलं.
 
या प्रकरणात अंदुरे आणि कळस्कर यांना जन्मठेप आणि पाच लाख दंड सुनावण्यात आला.
 
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात महत्वाचे टप्पे कोणते होते, सीबीआयने केलेला तपास, सीबीआय आणि आरोपींच्या वकिलांचा युक्तीवाद, या प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलं? याचा आढावा आपण या लेखातून घेऊयात.
 
दबा धरून बसलेल्या आरोपींनी केला गोळीबार
डॉ. दाभोलकर 20 ऑगस्ट 2013 ला पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावरून मॉर्निंग वॉकसाठी निघाले होते.
 
यावेळी दबा धरून बसलेल्या दोघांनी दुचाकीवरून येत त्यांच्यावर गोळीबार केला.
 
यामध्ये डॉ. दाभोलकरांचा जागीच मृत्यू झाला. गोळीबारानंतर दोन्ही आरोपी दुचाकीवरून पळून जाण्यात यशस्वी झाले.
 
यानंतर राज्यभरात आंदोलनं झाली. दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना अटक करण्याची मागणी जोर धरू लागली.
 
‘’आम्ही सारे दाभोलकर’’ म्हणत सामाजिक चळवळीतील हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.
 
यामुळे तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारवर दबाव वाढत गेला आणि पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.
 
पुणे पोलिसांनी केली होती पहिली अटक, पण...
पुणे पोलिसांनी या प्रकरणात जानेवारी 2014 मध्ये पहिली अटक केली. ती कथित बंदूक विक्रेता मनिष नागोरी आणि त्याचा सहकारी विकास खंडेलवाल यांना. पण, याधीच्या प्रकरणात या दोघांचीही अटक वादग्रस्त ठरलेली होती.
 
ठाणे पोलिसांनी 20 ऑगस्ट 2013 ला सायंकाळी चार वाजता खंडणीच्या प्रकरणात या दोघांना अटक केली होती. दाभोलकरांच्या हत्येनंतर काही तासांतच ही अटक झाली होती. ऑक्टोबर 2013 मध्ये नागोरी आणि खंडेलवाल यांना महाराष्ट्र एटीएसच्या ताब्यात देण्यात आलं.
 
यावेळी त्यांच्याकडून 40 अवैध बंदुका जप्त केल्याचा दावा एटीएसने केला होता. यापैकी एक बंदुकीची मार्कींग ही दाभोलकरांच्या हत्या स्थळावरून जप्त केलेल्या काडतुसासोबत मिळती जुळती असल्याचं एटीएसचं म्हणणं होतं. एटीएसकडून ही माहिती मिळाल्यानंतर पुणे पोलिसांनी दोघांनाही अटक केली होती.
 
पण, सुरुवातीला 2012 च्या पुणे विद्यापीठातील सुरक्षा रक्षकाच्या हत्येच्या आरोपाखाली ही अटक होती. त्यानंतर दाभोलकरांच्या हत्येचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. पण, या प्रकरणात खरा ट्विस्ट आला तो 21 जानेवारी 2014 ला.
 
कारण, यावेळी या दोन्ही आरोपींनी कोर्टात एटीएस प्रमुखांवरच आरोप केले होते. एटीएस प्रमुख राकेश मारिया यांनी दाभोलकर हत्येचा गुन्हा कबूल करण्यासाठी 25 लाख रुपयांची ऑफर दिली होती, असा दावा आरोपींनी कोर्टात केला होता.
 
पण, त्यानंतरच्या सुनावणीत हे आरोप जाणीवपूर्वक केल्याचं त्यांनी मान्य केलं होतं. पुणे पोलिसांनी या दोघांविरोधात आरोपपत्रपही दाखल केलं नव्हतं.
 
या दोन्ही आरोपींचा या प्रकरणासोबत काहीही संबंध नसल्याचं समोर आलं. त्यानंतर कोर्टाने या दोन्ही आरोपींची जामिनावर सुटका केली.
 
पण, पुणे पोलिसांकडून तपास सीबीआयकडे कसा गेला?
पुणे पोलिसांचा तपास भरकटताना पाहून सीबीआयकडे तपास सोपवण्याची मागणी झाली. त्यानंतर मुंबई हायकोर्टानं जून 2014 मध्ये दाभोलकरांच्या हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला. या प्रकरणात सीबीआयनं पहिली अटक केली.
 
10 जून 2016 रोजी सनातन संस्थेशी संबंधित कान, नाक घसा (ENT Surgeon) तज्ज्ञ डॉ. विरेंद्रसिंह तावडेला अटक केली होती.
 
याआधी याच तावडेला पानसरे हत्या प्रकरणात 2015 ला महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली होती. दाभोलकर हत्या प्रकरणातील एक सत्रूधार तावडे असल्याचं सीबीआयचं म्हणणं होतं.
 
सनातन संस्था आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्यातील वाद हे या हत्येचं कारण असल्याचा दावा सीबीआयनं केला होता.
 
तावडेविरोधात 6 सप्टेंबर 2016 ला हत्येचं षडयंत्र रचल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. याच आरोपपत्रात सनातन संस्थेचे फरार सदस्य सारंग अकोलकर आणि विनय पवार दोघांनी दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याचा दावा सीबीआयनं दावा केला होता.
 
कोल्हापुरातील हिंदूत्ववादी कार्यकर्ते आणि धातूच्या वस्तू बनवणारे कारागीर संजय साडविलकरच्या साक्षीनुसार तावडेला अटक केली होती. तावडे आणि अकोलकर दोघेही 2013 मध्ये साडविलकरला भेटले होते.
 
तावडेला साडविलकरच्या मदतीनं शस्त्र तयार करायची होती. त्यासाठी अकोलकरनं देशी बनावटीचे पिस्टल आणि रिव्हॉल्वर आणले होते.
 
तावडेनं अकोलकर आणि पवार दोघांनाही दाभोलकरांची हत्या करायला सांगितलं होतं, असा दावा सीबीआयनं त्यांच्या आरोपपत्रात केला होता.
 
हत्या होऊन दोन वर्ष झाली तरी तपास संथ गतीनं सुरू होता. त्यामुळे दाभोलकर कुटुंबीय कोर्टात पोहोचले.
 
हायकोर्टाच्या निगराणीखाली तपास सुरू झाला
पुणे पोलिसांच्या तपासावर टीका झाल्यानंतर 2015 मध्ये डॉ. हमीद दाभोलकर आणि मुक्ता दाभोलकर यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती.
 
हायकोर्टानं स्वतःच्या देखरेखीखाली तपास करण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली होती. तब्बल आठ वर्ष हायकोर्टाच्या देखरेखीखाली या प्रकरणाचा तपास चालला.
 
हायकोर्टानं एप्रिल 2023 ला ही याचिका निकाली काढली होती. कारण, सीबीआयनं पाचही आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केलं होतं.
 
दरम्यानच्या काळात हायकोर्टाच्या देखरेखीखाली तपास सुरू असताना सीबीआयने तब्बल पाच वर्षांनंतर दोन आरोपींना अटक केली होती.
 
पण, या आरोपींवर आरोपपत्र दाखल केलं तेव्हा सीबीआयच्या तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं.
 
सीबीआयनं पहिले आरोपी सारंग अकोलकर आणि विनय पवार यांनी दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याचं म्हटलं होतं. पण, सीबीआयच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं.
 
कारण, सीबीआयनं आधी केलेल्या दाव्याच्या अगदी उलट जात ऑगस्ट 2018 मध्ये शरद कळसकर आणि सचिन अंदुरेला अटक करत या दोघांनी दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याचं म्हटलं. पण, शरद कळसकर आणि सचिन अंदुरेचा सुगावा कसा लागला? तर गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या परशूराम वाघमारेकडून मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र एटीएसनं 2018 ला नालासोपाऱ्यात वैभव राऊतच्या घरी धाड टाकली होती.
 
यात शस्त्रसाठ्यासोबतच वैभव राऊत आणि शरद कळसकरला अटक केली होती. त्याची चौकशी करताना शरद कळसकर हा दाभोलकरांच्या हत्येशी संबंधित असल्याचं समोर आलं होतं.
 
त्यानं दाभोलकरांची हत्या केल्याचं कबूल केलं होतं, असं सीबीआयचं म्हणणं होतं. त्याने माहिती दिल्यानुसार सचिन अंदुरेला औरंगाबादेतून अटक केली होती. दाभोलकर हत्या प्रकरणातील ही तिसरी अटक होती. अटक केल्यानंतर तीन महिन्यांमध्ये आरोपपत्र दाखल करणं गरजेचं असतं.
 
पण, या प्रकरणात अनेक धागेदोरे तपासायचे आहे असं सांगत सीबीआयनं कोर्टाकडे वेळ मागवून घेतली होती. अखेर 13 फेब्रुवारी 2019 मध्ये या दोन्ही आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं.
 
या दोघांनीही दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याचं सीबीआयने आरोपपत्रात म्हटलं होतं. गौरी लंकेश हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अमोल काळे याने सचिन अंदुरेला दाभोलकरांवर गोळ्या झाडण्यासाठी पिस्तुल आणि दुचाकी पुरविली होती, असा दावा सीबीआयनं पुणे कोर्टात सादर केलेल्या आरोपपत्रात केला होता.
 
मग आरोपींनी वापरलेली शस्त्र कुठे आहेत? याचा तपास करताना सीबीआयनं आणखी दोघांना अटक केली आणि त्या बंदुकीचा शोध सुरू झाला.
 
सीबीआयने 26 मे 2019 मध्ये मुंबईतील सनातन संस्थेचे वकील संजीव पुनाळेकर आणि त्याचा सहकारी विक्रम भावे या दोघांना अटक केली होती. दाभोलकर हत्या प्रकरणात शरद कळसकरने गुन्ह्यात वापरलेली पिस्तुल नष्ट करण्यासाठी पुनाळेकर यांनी सल्ला दिला. त्यानुसार कळसकरनं चार पिस्तुल ठाण्याच्या खाडीत फेकून दिल्या, तर विक्रम भावेनं शूटर्ससाठी परिसराची रेकी केली, असे आरोप सीबीआयने केले होते.
 
सीबीआय कोठडीतील चौकशीनंतर 5 जुलै 2019 ला संजीव पुनाळेकर यांची जामिनावर सुटका झाली होती. ठाण्याच्या खाडीत फेकलेल्या पिस्तुलासाठी विदेशी एजन्सीच्या मदतीनं सीबीआयनं शोधमोहिम राबवली होती. यासाठी तब्बल साडेसात कोटी रुपये खर्च आला होता.
 
अखेर 5 मार्च 2020 ला हे पिस्तुल सापडल्याचा दावा सीबीआयनं केला होता. पण, हेच पिस्तुल हत्येसाठी वापरले की नाही यासाठी फॉरेन्सिक आणि बॅलेस्टीक तज्ज्ञांकडून तपासणीसाठी पाठवलं होतं. त्याचा अहवाल अद्यापही सीबीआयनं अधिकृतपणे समोर आणला नाही.
 
पण, जुलै 2021 ला हिंदुस्तान टाईम्सने बॅलेस्टीक तज्ज्ञांच्या हवाल्यानुसार हे पिस्तुल दाभोलकरांच्या हत्येसाठी वापरलेलं पिस्तुल नाही, असा अहवाल दिल्याचं म्हटलं आहे.
 
आरोपींना अटक झाली, आरोपपत्र दाखल झाले, शस्त्रांचा शोध सुरू झाला. पण, आरोपींवर दोषारोप निश्चित व्हायला तब्बल नऊ वर्ष लागले.
 
हत्येच्या नऊ वर्षांनंतर 5 आरोपींविरोधात दोषारोप निश्चित
तब्बल नऊ वर्षानंतर 15 सप्टेंबर 2021 ला दाभोलकर हत्या प्रकरणात पुणे विशेष कोर्टानं पाचही आरोपींविरोधात आरोप निश्चित केले होते.
 
डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर आणि विक्रम भावे यांच्यावर हत्या, गुन्ह्याचा कट रचणे आणि शस्त्र अधिनियम संबंधित कलमांतर्गत, युएपीए अंतर्गत आरोप निश्चित केले होते.
 
तसेच संजीव पुनाळेकरांविरोधात IPC कलम 201 (पुरावे नष्ट करणे किंवा खोट्या सूचना देणे) अंतर्गत आरोप निश्चित करण्यात आला होता. पण, या पाचही आरोपींनी गुन्हा कबूल करण्यास कोर्टात नकार दिला होता.
 
पाचही आरोपींवर दोषारोप निश्चित झाल्यानंतर खऱ्या अर्थानं 2021 पासून खटल्याची सुरुवात झाली होती. यात तब्बल 20 साक्षीदार तपासण्यात आले.
 
आतापर्यंत कोणाकोणाची साक्ष नोंदवण्यात आली?
दाभोलकर हत्या प्रकरणात त्यांचे शेजारी अविनाश धवलभक्त यांची पहिली साक्ष नोंदवण्यात आली होती. डॉ. दाभोलकर यांच्या सदाशिव पेठेतील अमेय अपार्टमेंटमधून पुस्तक, डायरी, कपडे असं काही साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.
 
यावेळी धवलभक्त पंच होते. तसेच आरोपींच्या वकिलांनीही धवलभक्त यांची उलटतपासणी केली.
 
या प्रकरणातील काही साक्षीदारांची साक्ष तपासल्यानंतर डॉ. हमीद दाभोलकर यांचीही फेरतपासणी करण्यात आली.
 
1 जानेवारी 2022 ला डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा मुलगा डॉ. हमीद दाभोलकर यांची उलटतपासणी करण्यात आली. यावेळी आरोपीचे वकील साळशिंगीकर यांनी दाभोलकरांचे कार्य, धार्मिक संस्था, बोगस डॉक्टर यांच्याकडून आलेल्या तक्रारी, वारकरी समुदाय आणि दाभोलकर यांच्यात वाद होता का असे सगळे प्रश्न आरोपींच्या वकिलांनी हमीद यांना विचारले होते.
 
पण, यावेळी हमीद दाभोलकर यांनी वडिलांच्या कामाबद्दल अधिक माहिती नसल्याचं सांगितलं होतं. यावेळी साळशिंगीकर यांनी हायकोर्टात दाखल केलेली रीट पिटीशन वाचून दाखवली होती.
 
यामध्ये वारकरी समुदाय यांचा जादूटोणाविरोधी याचिकेला विरोध होता असं नमूद केलं होतं. यावर डॉ. हमीद यांनी उत्तर दिलं होतं की, "काही वारकऱ्यांचा अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याला विरोध होता, पूर्ण समाजाचा नाही’’
 
श्याम मानव आणि नरेंद्र दाभोलकर यांच्यात फूट का पडली? असाही प्रश्न हमीद यांना विचारण्यात आला होता.
 
यावर त्यांनी उत्तर दिलं होतं की, ‘’त्यावेळी मी 7-8 वर्षांचा होतो. त्यामुळे मला आठवत नाही. पण, त्यांच्यामध्ये कुठलेही वाद नव्हेत, मतभेद नव्हते. दोघांच्या कामात कुठलाही फरक नव्हता, फक्त काम करण्याच्या पद्धतीत फरक होता.’’
 
साक्ष नोंदवण्याचं काम सुरुच असताना सीबीआयनं कोर्टात एका महत्वाच्या साक्षीदाराला हजर केलं होतं. यावेळी या सफाई कर्मचाऱ्यानं महत्वाची साक्ष दिली होती.
 
19 मार्च 2022 ला दाभोलकर हत्या प्रकरणात झालेल्या सुनावणीत सचिन अंदुरे आणि शरद कळसकर दोघांनाही साक्षीदारानं ओळखलं होतं.
 
अंदुरे आणि कळसकर यांनी दाभोलकरांवर गोळीबार केला आणि ते तिथून फरार झाले अशी साक्ष पुणे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यानं दिली होती.
 
आरोपींच्या वकिलांकडून या साक्षीदाराची उलटतपासणी करण्यात आली. यावेळी ‘सकाळ’ने दिलेल्या बातमीनुसार, त्यानं कोर्टात सांगितलं होतं की, "कारागृहात घेतलेल्या ओळख परेडमध्ये आरोपींना ओळखलं नव्हतं. पण, सीबीआयनं अंदुरे आणि कळसकर यांचे फोटो दाखवण्याआधी वृत्तपत्रातल्या बातम्यांमध्ये या आरोपींचे फोटो पाहिले होते.’’
 
यानंतर जानेवारी 2023 मध्ये डेक्कन पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम. एस. जोशी यांनीही घटनेच्या दिवशीच मुख्य साक्षीदार विनय केळकरचा जबाब नोंदवल्याची साक्ष कोर्टात दिली होती.
 
यावेळी आरोपींच्या वकिलांनी त्यांची उलटतपासणी केली. ज्या व्यक्तीनं तक्रार दिली त्या व्यक्तीला गोळ्या झाडल्याचा आवाज ऐकला का? असा प्रश्न केला का असता जोशी यांनी 'नाही' असे सांगितलं होतं.
 
याच खटल्यात सीबीआयच्या माजी अधिकाऱ्यांचीही साक्ष नोंदवण्यात आली. त्यांनी दाभोलकरांच्या हत्येसाठी वापरलेल्या शस्त्रांबदद्ल मोठा खुलासा केला होता.
 
सुरुवातीला सीबीआयचे माजी अधिकारी एस. आर सिंह हे दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास करत होते. पण, डिसेंबर 2022 मध्ये ते निवृत्त झाले.
 
त्यानंतर सप्टेंबर 2023 मध्ये त्यांची साक्ष तपासण्यात आली होती. त्यांनी दाभोलकरांची हत्या करण्यासाठी वापरेल्या शस्त्रांबद्दल मोठा खुलासा केला होता.
 
"पत्रकार गौरी लंकेश आणि कलबुर्गी यांच्या हत्येतील प्रमुख आरोपी सनातन संस्थेचा सदस्य अमोल काळेने दाभोलकरांच्या हत्येसाठी वापरलेली शस्त्रे आणि मोटारसायकल पुरवली होती. नोव्हेंबर 2019 मध्ये आरोपपत्र दाखल झाल्यानंतर शस्त्र शोधण्यासाठी प्रयत्न झाले. पण, शस्त्र मिळाले नाही. आमच्या प्रयत्नांना अपयश आलं’’, असं सिंह तेव्हा म्हणाले होते.
 
याविषयी सुनावणीवेळी इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्रानं बातमी दिली होती.
 
सचिन अंदुरे औरंगाबादमध्ये ज्या दुकानात काम करत होता, तिथलं हजेरी पुस्तक जप्त केलं असून यात अंदुरे दाभोलकरांच्या हत्येच्या आदल्या दिवशी आणि हत्येच्या दुसऱ्या दिवशीही गैरहजर असल्याचं दिसून आलं, असं सिंह यांनी कोर्टात सांगितलं होतं.
 
सीबीआयनं काही साक्षीदार कोर्टात हजर केल्यानंतर आरोपींच्या वकिलांनीही आरोपींच्या बहिणींना पुरावा म्हणून कोर्टासमोर हजर केलं होतं.
 
जानेवारी 2024 मध्ये शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांच्या बहिणींचीही साक्ष नोंदवण्यात आली होती. यावेळी त्यांनी 20 ऑगस्ट 2013 ला रक्षाबंधनासाठी आमचे भाऊ आमच्यासोबत असल्याची साक्ष दिली होती. त्यांचीही सीबीआयचे वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी उलटतपासणी घेतली होती.
 
यामध्ये तुमचे भाऊ तुमच्यासोबत असल्याची माहिती तुम्ही तपास यंत्रणा किंवा मुंबई हायकोर्टाला दिली होती का असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी त्यांनी 'नाही' असं उत्तर दिलं होतं.
 
त्या दोघीही भावाला वाचवण्यासाठी खोटी साक्ष देत असल्याचा आरोप सीबीआयनं केला होता. पण, दोन्ही बहिणींनी हा आरोप फेटाळून लावला होता. याबद्दल टाइम्स ऑफ इंडियानं सुनावणीवेळी वृत्त दिलं होतं.
 
सगळ्या साक्षीदारांची साक्ष नोंदवली. तसंच त्यांची उलटतपासणी झाल्यानंतर अखेर खटला शेवटाकडे पोहोचला.
 
सीबीआयचा कोर्टात शेवटचा युक्तिवाद
17 फेब्रुवारी 2024 ला सीबीआयनं कोर्टात युक्तिवाद पूर्ण केला. यावेळी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे पुत्र डॉ. हमीद दाभोलकर, अनंसिचे कार्यकर्ते प्रशांत पोतदार आणि कोल्हापुरातील व्यावसायिक संजय साडविलकर यांनी दिलेल्या साक्षीतून हिंदूत्वादी संघटना आणि आरोपी तावडेच्या मनात दाभोलकरांविषयी शत्रूत्वाची, द्वेषाची भावना होती हे सिद्ध होतं.
 
या दोन्ही आरोपींनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी ओळखलं आहे. तसेच आरोपी अंदुरेनं कबुलीजबाब दिला आहे, असा युक्तीवाद सीबीआयनं कोर्टात केला होता.
 
दाभोलकरांच्या मृतदेहावर एक लांबसडक केस होता असं समोर सांगण्यात आलं होतं. पण, याबद्दल सर्व साक्षीदारांना काहीच माहिती नव्हती. पण, डॉ. तावडे यांनी उलटतपासणी दरम्यान तो केस नव्हता तर काळा धागा होता, असं ठामपणे सांगितलं होतं, असा युक्तीवाद सीबीआयनं कोर्टात केला.
 
तसेच "आरोपींच्या वकिलांकडून टेम्पोमधून दाभोलकरांचा मृतदेह पुलावर फेकण्यात आला असल्याचा युक्तीवाद झाला होता. पण, खुनाची घटना पूर्व बाजूला घडली आणि टेम्पो हा पश्चिम बाजूनं गेला. त्यामुळे आरोपींचा दावा खोटा आहे. यावरून या आरोपींनी दाभोलकरांची हत्या केल्याचं सिद्ध होतं. सनातन संस्थेशी संबंधित असलेल्या या आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा द्यावी,’’ अशी मागणी सीबीआयनं कोर्टासमोर केली होती.
 
दरम्यान, सीबीआयचा अंतिम युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर 22 फेब्रुवारी 2024 ला दाभोलकर कुटुंबीयांचे वकील अ‍ॅड. ओंकार नेवगी यांनी लेखी म्हणणं विशेष न्यायालयात सादर केलं होतं.
 
यामध्ये डॉ. दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींच्या विरोधात पुरावे सिद्ध झाले आहेत. त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त शिक्षा देण्यात यावी. तसेच डॉ. दाभोलकर यांचा खून करण्यामागे काय उद्देश होता? याची माहिती मिळावी, असं यामध्ये म्हटलं होतं.
 
सीबीआयचा अंतिम युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर आरोपींच्या वकिलांनी त्यांच्या युक्तीवादाला सुरुवात केली.
 
आरोपींच्या वकिलांचा अंतिम युक्तिवाद काय?
आरोपीचे वकील प्रकाश साळशिंगीकर यांनी 2 मार्च 2024 ला अंतिम युक्तिवादाला सुरुवात केली. यावेळी सीबीआयनं योग्य तपास केला नसल्याचा आरोप त्यांनी केला.
 
"दाभोलकर यांचे कॉल रेकॉर्ड तपासले नसून इतर शक्यतांकडे काणाडोळा करून फक्त सनातन संस्थेवरच लक्ष केंद्रीत करण्यात आलं. सीबीआयनं दाभोलकरांचे कॉल रेकॉर्ड दडपले असून त्यांना शेवटचा फोन कोणाचा होता हे अद्यापही समोर येऊ दिले नाही. दाभोलकरांच्या डायरीत सापडलेल्या आर्थिक व्यवहारांकडेही दुर्लक्ष केलं’’, असे आरोप बचाव पक्षाचे वकील प्रकाश साळशिंगीकर यांनी कोर्टात केले होते.
 
दरम्यान 14 मार्च 2024 ला आरोपींच्या वकिलांनी शेवटचा युक्तीवाद केला. यावेळी दुसऱ्या आरोपीचे वकील इचलकरंजीकर यांनी सीबीआयच्या तपासावर आरोप केले.
 
त्यांच्यानुसार, दाभोलकरांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांनी पाठीमागून पिस्तुलातून गोळ्या झाडल्या असतील, तर एक गोळी भुवईतून घुसून डोक्याच्या मागे कशी गेली? याचे स्पष्टीकरण सीबीआयनं दिलेलं नाही.
 
आरोपींची ओळख परेड न करता सीबीआयनं साक्षीदारांकडून फक्त फोटोंच्या आधारावर ओळख करून घेतली. पण, साक्षीदारांनी त्यांना नीट ओळखलं नाही.
 
सीबीआयनं हा सर्व बनाव रचला आहे. सचिन अंदुरेची कोऱ्या कागदावर सही घेऊन त्यावर हवं ते लिहिण्यात आलं. शरद कळसकरसोबतही असंच झालं. दोन्ही पंचनामे पाहिले तर एकच दिसतात. फक्त नावं बदलली आहेत, असा युक्तीवाद आरोपींचे वकील इचलकरंजीकर यांनी केला होता.
 
तसेच कळसरकरने हत्येसाठी वापरलेली बंदूक नष्ट केल्याचा दावा सीबीआयने केला होता. त्यानंतर ठाणे खाडीत विदेशी संस्थेच्या मदतीनंही शोधमोहिम राबवण्यात आली.
 
पण, यातही सीबीआयला यश आलं नाही, असाही युक्तीवाद आरोपींकडून करण्यात आला, असा आरोपींच्या वकिलांनी शेवटचा युक्तीवाद केला होता.
 
दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर विशेष न्यायलयाचे न्यायमूर्ती पी. पी. जाधव यांनी दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला आहे.
 
तब्बल 11 वर्षांनंतर 10 मे रोजी हा निकाल येणार आहे. सध्या पाच आरोपींपैकी पुनाळेकर आणि भावे हे जामिनावर बाहेर आहेत, तर शरद कळसकर, सचिन अंदुरे, विरेंद्र तावडे सध्या तुरुंगात आहेत.
 
दरम्यान, सीबीआयचे वकील अ‍ॅड. प्रकाश सूर्यवंशी यांनी प्रकरणाचा निकाल कोर्टानं राखून ठेवल्यानं या प्रकरणावर भाष्य करण्यास नकार दिला. तसेच दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल आठ दिवसांवर असल्यानं दाभोलकर कुटुंबीयांचे वकील अ‍ॅड. अभय नेवगी यांनी बोलण्यास असमर्थता दर्शवली.
 
तर दुसरीकडे आरोपींची बाजू कोर्टात मांडणारे वकील अ‍ॅड. साळशिंगीकर बीबीसी मराठीसोबत बोलताना म्हणाले, ‘’सीबीआयची सुरुवातीपासून शूटर्सबद्दलची थेअरी बदलत गेली. तसेच प्रत्यक्षदर्शींच्या साक्षीमध्येही तफावत आली आहे.
 
पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांनीही गोळीचा आवाज ऐकला नाही. या प्रकरणात 20 साक्ष तपासण्यात आली. पण, यामध्ये सीबीआयने महत्वाचे साक्षीदार कोर्टात हजर केले नाहीत. त्यामुळे ज्यांच्यावर खटला सुरू आहे त्यांची सुटका व्हावी असं वाटतं’’

Published By- Dhanashri Naik 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता नसणार चंद्रशेखर बावनकुळे यांचा काँग्रेस वर टोला

IPL 2025: श्रेयस अय्यर लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला

IND vs AUS: 16 कसोटी डावांनंतर विराटचे शतक, सचिनचा विक्रम मोडला

LIVE: अजित पवार यांची विधीमंडळ पक्षनेतेपद साठी निवड, राष्ट्रवादीच्या बैठकीत निर्णय

अजित पवार यांची विधीमंडळ पक्षनेतेपद साठी निवड, राष्ट्रवादीच्या बैठकीत निर्णय

पुढील लेख
Show comments