Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Pune Rain : पुढील 48 तास अतिवृष्टीमुळे पुण्यात रेड अलर्ट, कलम 144 लागू, शाळा कॉलेज बंद

Pune Rain : पुढील 48 तास अतिवृष्टीमुळे पुण्यात रेड अलर्ट, कलम 144 लागू, शाळा कॉलेज बंद
, बुधवार, 13 जुलै 2022 (20:03 IST)
पुणे आणि परिसरात आगामी चार दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे परिसरातील पर्यटनस्थळांवर कलम 144 लागू करून जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच पुढील तीन दिवस शाळांनाही सुटी देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.आता पुढच्या 48 तासांत अतिवृष्टीचा  इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील काही तालुके वगळता पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 
 
प्रादेशिक हवामान केंद्राने पुणे जिल्ह्यात 14 आणि 16 जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे इंदापूर, बारामती, दौंड, शिरूर व पुरंदर हे तालुके वगळता इतर सर्व तालुक्यातील 12 वी पर्यंतच्या सर्व शाळांना 14 जुलै ते 16 जुलै पर्यंत सुट्टी जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत वरील आदेश काढले आहेत.
 
या आदेशानुसार, अतिवृष्टीमुळे कोणत्याही प्रकारची अनूचित घटना घडू नये म्हणून गुरुवार, 14 जुलै 2022 ते रविवार, 17 जुलैपर्यंत पर्यटक, गिर्यारोहक आणि ट्रेकर्स यांना पर्यटनस्थळावर प्रवेशास प्रतिबंध करण्यात आला आहे.
 
नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी या पर्यटनस्थळांवर कलम 144 अंतर्गत जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे.
 
 
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशांनुसार सिंहगड, लोहगड, विसापूर, राजगड, तोरणा किल्ले यासह इतर गडांवर 144 कलम लागू करण्यात आलं आहे. याशिवाय अंधारबन ट्रेक, प्लस व्हॅली, पानशेत धरण परिसरात सुद्धा कलम 144 लागू करण्यात आलं आहे. पर्यटनस्थळांवर जमावबंदी आदेश लागू असेल. आदेश मोडल्यास कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले आहेत. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Hockey: भारताच्या सौरभ आणि रामाचा एफआयएचच्या पंच पॅनेलमध्ये समावेश