भारतात रशियाच्या स्पुटनिक-५ या लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु झाली आहे. पुण्यातील नोबेल रुग्णालयात ही चाचणी करण्यात येत असून १७ स्वयंसेवकांना या लसीचा डोस देण्यात आला आहे. दरम्यान, या सर्वांना डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे.
नोबेल रुग्णालयाच्या प्रशासनानं सांगितलं की, “लसीच्या क्लिनिकल चाचणीमध्ये ट्रायल प्रोटोकॉलचं पूर्णपणे पालन केलं जात आहे. ज्या लोकांना ही लस देण्यात आली आहे, त्यांचं वय १८ वर्षांपेक्षा अधिक असून त्यांची प्रकृती उत्तम आहे.”
गॅमेलेया नॅशनल रिसर्च सेंटर ऑफ इपिडेमिओलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी आणि रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) हे संयुक्तरित्या स्पुटनिक-५ ही लस तयार करत आहेत. माध्यमांतील वृत्तानुसार, भारताने रशियाकडून या लसीचे १०० मिलियन (१० कोटी) डोस खरेदी केले आहेत.