पुणे- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कवरील सभेत कार्यकर्त्यांना संबोधित करताना मशिदीवरील भोंग्याविषयी वक्तव्य केले होते. त्यानंतर मनसेतील कार्यकर्त्ये आणि पदाधिकारी यांच्यामध्ये नाराजी असल्याचे दिसून आले आहे.
मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांबाबत मांडलेल्या भूमिकेनंतर, पक्षाचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी घेतलेली वेगळी भूमिका आणि विविध पदाधिकाऱ्यांचे राजीनामे अशा वेगवान घडामोडी सध्या घडत आहेत. त्यात वसंत मोरेंवर राज ठाकरे नाराज असल्याची चर्चा जोरात सुरू असून, त्यांना पदावरून हटवले आहे.
राज ठाकरे यांच्या आदेशानं नगरसेवक साईनाथ बाबर यांची पुणे शहराध्यपदी निवड करण्यात आली आहे. साईनाथ बाबर हे कोंढवा संघातून नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत.
राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मशिदींवरील अनधिकृत भोंग्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. यावर मनसेमधील मुस्लीम समाजातील कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर पुणे आणि इतर भागांत काही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले होते.
वसंत मोरे यांच्या मतदार संघात मुस्लिम मतांची संख्या जास्त आहे. कात्रज प्रभागात मुस्लिमांची 3 हजार 800 मतं आहेत त्यामुळे राज ठाकरे यांच्या निर्णयामुळे वसंत मोरे याना अडचण निर्माण झाली आहे.