Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Rajya Sabha: 6 जागांसाठी आज मतदान, 'MIMची 2 मतं शिवसेनेला जाणार'

Webdunia
शुक्रवार, 10 जून 2022 (08:09 IST)
राज्यसभेची निवडणूक आज (10 जून) ला पार पडणार आहे. 9 वाजल्यापासून मतदान सुरू होणार आहे.
 
महाराष्ट्रात 6 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. राज्यातल्या राजकीय पक्षांच्या खेळीमुळे ही निवडणूक आणखी चुरशीची होणार आहे. महाराष्ट्रातून राज्यसभेवर बिनविरोध खासदार नेमण्याची परंपरा आहे. मात्र बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. यंदा 24 वर्षांनंतर पहिल्यांदा राज्यसभेसाठी मतदान होत आहे.
महाराष्ट्रातून एकूण सात उमेदवार रिंगणात आहेत. त्यात भाजपचे पियुष गोयल, अनिल बोंडे, धनंजय महाडिक यांनी अर्ज भरले आहेत. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवार मैदानात आहेत.
 
राज्यातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी आज सकाळी 9 ते सायंकाळी4 वाजेपर्यंत मतदान होईल. त्यानंतर संध्याकाळी 5 वाजेपासून मतमोजणी होणार आहे
 
शिवसेनेला 12 अपक्षांचं समर्थन
शंकरराव गडाख
राजेंद्र पाटील येड्रावकर
मंजुषा गावित
गिता जैन
शिष जयस्वाल
किशोर जोरगेवार
चंद्रकांत पाटील
विनोद अगरवाल, गोंदिया
बच्चू कडू
राजकुमार पटेल
नरेंद्र बोंडेकर
विनोद निकोले, माकप
राजकीय पक्षांची जोरदार फिल्डिंग
राज्यसभेच्या 6 जागांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी त्यांची प्रतिष्ठा पणाला लावली आहे. सर्व राजकीय पक्षांच्या आमदारांचा मुक्काम मुंबईच्या मोठमोठ्या हॉटेल्स मध्ये आहे. मतदान होईपर्यंत त्यांना तिथून न हलण्याचा आदेश देण्यात आला आहे.  
 
त्यातच औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी भाजपला हरवण्यासाठी महाविकास आघाडीला मतदान करणार असल्याचं ट्वीट करून जाहीर केलं आहे.
 
बीबीसी मराठीशी बोलताना एमआयएमची 2 मतं शिवसेनेच्या संजय पवार यांना दिली जातील असं खासदार एम्तियाज जलील यांनी सांगितलं आहे.
 
राज्यसभा निवडणुकीत जरी ही बाब शिवसेनेसाठी दिलासा दायक ठरणार असली तरी येत्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेसाठी ही बाबत अडचणीची ठरण्याची शक्यता आहे.
 
महाविकास आघाडीच्या अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना कोर्टाने मतदान करण्यास मनाई केली आहे. त्याविरोधात त्यांनी उच्च न्यायलायात धाव घेतली आहे. त्यावर आज तातडीची सुनावणी होणार आहे.
 
त्यामुळे मतांचा कोटा 42 वरून 41 वर येणार का, याकडे सर्वांचं लक्ष आहे.
 
तर मी सांगितलं तसंच मतदान केलं तर भाजपचे उमेदवार निवडून येतील, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
 
फडणवीस यांना दोन तीन दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती त्यामुळे ते या निवडणुकीला उपस्थित राहतील की नाही अशी शंका निर्माण झाली होती. आता मात्र त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला असून ते निवडणुकीत सक्रिय सहभाग घेतला आहे.
 
देशभरात एकूण 16 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. ही निवडणूक प्रकिया कशी पार पडते यावर एक नजर टाकूया
 
लोकसभा आणि राज्यसभा ही संसदेची दोन सभागृहं. लोकसभेतील प्रतिनिधी लोकांनी प्रत्यक्षपणे निवडून दिलेले असतात. राज्यसभेतील सदस्य, राज्यसभेचं स्वरूप आणि इतर बाबींवर एक नजर टाकूया.
 
राज्यसभेचं स्वरूप
राज्यसभेला अप्पर हाऊस म्हणजेच वरिष्ठ सभागृह किंवा काऊन्सिल ऑफ स्टेट्स असंही संबोधलं जातं. स्वातंत्र्यानंतर पहिल्या निवडणुकीनंतर लोकसभेबरोबरच आणखी एक सभागृह असावं अशी कल्पना समोर आली. वरिष्ठ सभागृह असं संबोधण्यात येत असलं तरी राज्यसभेच्या तुलनेत लोकसभेचे अधिकार थोडे जास्त आहेत.
 
राज्यसभेत जास्तीत जास्त 250 जागा असू शकतात. यापैकी 12 सदस्य राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित केले जातात. तर 236 सदस्य देशातील सर्व राज्यांतून आणि 2 सदस्य केंद्रशासित प्रदेशांतून निवडले जातात.
 
सध्या राज्यसभेची सदस्य संख्या 245 इतकी आहे. यापैकी 233 सदस्य राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून निवडून येतात. तर 12 सदस्यांना राष्ट्रपती नामनिर्देशित करतात.
 
राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केलेले उमेदवार प्रामुख्याने कला, विज्ञान, सामाजिक कार्य अशा क्षेत्रांशी निगडित असतात. अभिनेत्री रेखा आणि क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांना राष्ट्रपतींनीच राज्यसभेकरिता नामनिर्देशित केलं होतं, हे आपल्याला आठवत असेल.
 
राज्यसभा हे स्थायी सभागृह
राज्यसभा स्थायी सभागृह आहे. हे कधीच भंग होत नाही. भारताचे उपराष्ट्रपती या सदनाचे सभापती असतात. इथल्या सदस्यांचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो. दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात येतो. त्यांच्या जागी नवे उमेदवार राज्यसभेवर निवडून जातात.
 
राज्यसभेच्या कार्यकाळाचा इतिहासही रंजक आहे. जेव्हा पहिल्यांदा निवडणुका झाल्या तेव्हा सहा वर्षांनी सगळेच निवृत्त झाले तर एक तृतीयांश सदस्य कसे निवृत्त होतील असा पेच उभा राहिला. तेव्हा लकी ड्रॉ काढण्यात आला. काही सदस्यांना 2 वर्षं, काहींना 4 वर्षं तर काहींना सहा वर्षं असा कार्यकाळ देण्यात आला.
 
त्यामुळे पहिल्या निवडणुकीनंतर ज्या सदस्यांचा कार्यकाळ संपला त्यांच्या जागी निवडणुका होऊ लागल्या आणि ही प्रक्रिया सुकर झाली.
 
राज्यसभा सदस्य होण्यासाठी पात्रता
भारतीय संविधानातील कलम 84 नुसार राज्यसभा सदस्यत्वासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत.
 
संबंधित उमेदवार देशाचा नागरिक असावा ही पहिली अट आहे. त्याने वयाची 30 वर्षं पूर्ण केलेली असावीत. तसंच संसदेने वेळोवेळी ठरवून दिलेल्या अटी त्याने पूर्ण केल्या पाहिजेत.
 
कोणत्या राज्यात किती जागा?
राज्यसभेत कोणत्या राज्यातून किती जागा निवडून जातील हे त्या राज्याच्या लोकसंख्येवरून ठरवलं जातं.
 
राज्यसभेच्या सदस्यांची निवड विधानसभेत निवडून गेलेल्या आमदारांकडून केली जाते. प्रत्येक राज्यातील विधानसभा आमदारांची संख्या तिथल्या लोकसंख्येवर आधारित असते.
 
उदाहरणार्थ, महाराष्ट्रात राज्यसभेच्या 19 जागा आहेत. उत्तर प्रदेशात त्या 31 आहेत. अरूणाचल प्रदेश, मणिपूर, नागालँड, मेघालय, गोवा, मिझोरम, सिक्कीम, त्रिपुरा यांसारख्या लहान राज्यांमध्ये प्रत्येकी एक जागा आहे.
 
पण राज्यसभेची निवडणूक प्रक्रिया इतर निवडणुकांपेक्षा वेगळी असते.
 
राज्यसभेत पोहोचण्यासाठी किती मतं आवश्यक?
राज्यसभा निवडणूक विजयी होण्यासाठी कोणत्याही उमेदवाराला ठराविक मतं आवश्यक असतात. या मतांची संख्या जागेच्या संख्येवर अवलंबून असते. ही निवड प्रक्रिया आपण सोप्या पद्धतीने समजून घेऊ.
 
महाराष्ट्रात 288 विधानसभा आमदार आहेत तर राज्यसभेच्या एकूण 19 जागा आपल्या राज्यात आहेत.
 
पण एकाच वेळी सर्वच्या सर्व जागांवर राज्यसभेच्या निवडणुका होत नसतात. ठराविक कालावधीनंतर ठराविक जागांसाठी निवडणूक होते.
 
राज्यसभा निवडणुकीसाठीच्या जागांच्या संख्येत 1 ही संख्या मिसळून विधानसभेच्या जागांच्या संख्येला या संख्येने विभाजित केल्यानंतर विजयासाठी आवश्यक ती मतसंख्या आपल्याला मिळते.
 
समजा यंदा राज्यातील 6 जागांवर निवडणूक होणार आहे.
 
म्हणजे 6 + 1 = 7 ही संख्या निवडणुकीसाठी गृहीत धरावी.
 
त्यामुळे विधानसभेच्या जागा 288 / 7 = 42
 
म्हणजेच या निवडणुकीत विजयी होण्यासाठी उमेदवाराला 42 मतांची आवश्यकता असेल.
 
एकल संक्रमणीय पद्धत
राज्यसभा निवडणूक प्रक्रियेची माहिती भारतीय राज्यघटनेचा कलम 8 मध्ये आहे. या प्रक्रियेला Proportional representation by single transferable vote असं म्हणतात. सर्व पक्षांना समान प्रतिनिधित्व मिळावं हा यामागचा उद्देश आहे.
 
एकल हस्तांतरणीय याचा अर्थ असा की विधानसभेच्या प्रत्येक आमदाराचं मत एक गृहित धरलं जातं. तरीही आमदारांना मतपत्रिकेवर पसंतीक्रम द्यावा लागतो. हा पसंतीक्रम दिला नाही तरी चालतो. तरी पहिली पसंती कोण हे मात्र नमूद करावंच लागतं. त्यामुळे प्रथम प्राधान्य असलेला उमेदवार त्या राज्यात जितके मतं गरजेचे असतील ते मिळाले की विजयी होतो.
 
एखाद्या उमेदवाराकडे गरजेइतके मतं नसतील आणि विजयी झालेल्या उमेदवाराकडे अतिरिक्त मतं असतील तर ते या उमेदवाराकडे जातात.
 
महाराष्ट्रात बहुतांशी ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. आता संभाजीराजेंचं काय होतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

भिवंडीतील भंगार गोदामाला भीषण आग,कोणतीही जीवितहानी नाही

LIVE:निवडणूक निकालानंतर व्हीबीए कोणाला पाठिंबा देईल, प्रकाश आंबेडकर यांचा खुलासा

निवडणूक निकालानंतर व्हीबीए कोणाला पाठिंबा देईल, प्रकाश आंबेडकर यांचा खुलासा

Baba Siddique Murder: बाबा सिद्दीक हत्याकांड प्रकरणात अकोल्यातून 26 वी अटक

आईने आपल्या दोन निष्पाप मुलांची पाण्याच्या टाकीत बुडवून हत्या केली

पुढील लेख
Show comments