Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पवित्र रमझानचे आगमन!

Webdunia
मुस्लिम वर्षाचा नववा अर्थात पवित्र रमझानचा महिना सुरू झाला आहे. या महिन्यात धार्मिक मुस्लिम माणूस 'रोझे' अर्थात कडक उपवास करतो. 

या महिन्याची व त्याच्या धार्मिक महत्त्वाची माहिती देताना पेणचे अलिखान बुबेरे म्हणाले की, रम्ज म्हणजे भाजणे किंवा पोळणे. उपवासाने पापे जळून जातात म्हणून या व्रताला रमझान हे नाव मिळाले. परिसरात संस्कृतचे विशेष जाणकार म्हणून प्रसिद्ध असलेले बुबेरे पुढे म्हणाले की, या व्रताचे पालन करणे हा आमच्या धर्माचरणाच्या पाच नियमांपैकी एक आहे. या व्रताने स्वर्ग मिळतो आणि पापक्षालन होते, असे महम्मदाचे वचन आहे. अर्थात रोजे करण्यामागे याशिवायही एक हेतू असतो तो म्हणजे गरिबीमुळे वेळप्रसंगी उपाशी राहणार्‍यांबरोबर सहवेदना दाखविणे. यामुळे भौतिक सुखातून मिळणारे अहंकार नाहीसे होतात. महिनाभर चालणार्‍या या व्रतात संपूर्ण दिवसभर काहीच खायचे नसते. पहाटे लवकर उठून अन्नग्रहण करायचे. मग चूळ भरून सकाळच्या प्रार्थनेबरोबर रोजांना सुरुवात करायची असते. दिवसभरात थुंकीही गिळायची नसते. विशेष म्हणजे रोजा केव्हा सोडायचा याची वेळही ठरलेली असते. त्याहून अधिक उशीर करून चालत नाही. रोजे कोणत्या दिवशी कोणत्या वेळेपासून धरायचे व त्या दिवशी संध्याकाळी किती वाजता सोडायचे याचे वेळापत्रक ठरलेले असते. त्याची छापील कार्डे सर्वांना वाटली जातात. सर्वजण त्याचे काटेकोर पालन करतात. मुस्लिम धर्म मूळ ज्या प्रदेशातील त्या मध्य-पूर्व देशांत विपुल प्रमाणात मिळणारा खजूर उपवास सोडताना वापरला जातो. काही लोक सरबत किंवा फळांचा वापर करतात. अर्थात दोन्ही वेळा आहार दूध, चपाती, भाजी, फळे असा साधाच असावा असा संकेत आहे.

' प्रवासी, आजारी, वृद्ध, अपंग, गरोदर व लेकुरवाळ्या स्त्रिया यांनी हा उपवास नाही केला तरी चालतो, मात्र प्रवासी व आजारी लोकांनी सवड होईल तेव्हा रोजे केले पाहिजेत, असा संकेत आहे. त्याला कज्ञा अर्थात भरपाई असे नाव आहे. लहान मुले हे व्रत करू शकतात. त्यासाठी त्यांना घरातून पाठिंबाही मिळतो, पण त्यांच्यावर सक्ती नसते. त्यांना ते झेपले नाही, तर लगेच रोजा सोडून नेहमीचे अन्न घेऊ शकतात. मुले-मुली थोडी जाणती झाल्यावर मात्र संपूर्ण रोजाचे व्रत अतिशय निग्रहाने पाळतात. अपवादाने का होईना काही मुस्लिमेतर मंडळीही रोजा करतात. यातून आपल्याला शारीरिक स्वास्थ्य मिळते', असे या मंडळींचे म्हणणे आहे.

धार्मिक मुस्लिम मंडळीही या दिवसांत मशिदीत जास्तीत जास्त वेळ काढून पुन्हा-पुन्हा प्रार्थना म्हणणे, कुराण वाचणे इ. कार्यक्रम करतात. रमझानच्या २७ व्या रात्री स्वर्गात संपूर्ण कुराण ग्रंथ तयार झाला, असे महम्मदाने म्हटले आहे. खेरीज केवळ उपवास व प्रार्थना म्हणून पुण्य लागत नाही, तर त्यावेळी सत्यभाषण, सद्‍विचार, सदाचार यांनाही महत्त्व आहे, असे पैगंबरांनी म्हटले आहे. त्यामुळे या काळात प्रत्येक मुस्लिम माणूस सदाचाराची कास धरतो. दानधर्म करतो, या काळात बहुतेक मुस्लिम महिला विविध प्रकारचे पदार्थ करण्यात गढून गेलेल्या असतात. रमझान व्रताचे पारणे, शव्वाल या दहाव्या महिन्याच्या पहिल्या दिवसाने करतात. त्याला ईद-उल-फित्र असे म्हणतात. त्या दिवशी खूप दानधर्म केला जातो, म्हणून त्याला ईदुस्सदका असेही म्हणतात. या ईदपेक्षा बकरी ईदचे महत्त्व अधिक असल्याने तिला मोठी ईद व हिला लहान ईद असे म्हणतात. या दिवशी सर्व स्त्री-पुरुष नवीन कपडे घालून व आपल्याजवळ असलेले अलंकार घालून स्नेही, सोबती व मित्रपरिवाराला भेटायला जातात. त्यांची गळाभेट करतात. रमझान ईदच्या दिवशी सामूहिक प्रार्थनेलाही महत्त्व असते. सगळे त्यासाठी एकत्र येतात.
सर्व पहा

नवीन

Guru Govind Singh jayanti : गुरु गोविंद सिंह यांच्याबद्दल खास गोष्टी

साकोरीचे सद्गुरू श्री उपासनी महाराज

आरती सोमवारची

Shiva Mantra: सोमवारी पूजा करताना महादेव मंत्राचा जप करावा

| श्री कार्तिकेय कवच ||

सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

पुढील लेख
Show comments