Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

इगतपुरी तालुक्यातील १७८६ रेशन कार्ड अर्ज नामंजूर; भुजबळांची विधिमंडळात माहिती

chhagan bhujbal
, शनिवार, 12 मार्च 2022 (08:07 IST)
इगतपुरी तालुक्यातील गावपाडे आणि आदिवासी वस्तीतील सुमारे ३ हजार १७३ विभक्त कुटुंबातील नागरिकांच्या शिधापत्रिकांचे अर्ज नवीन डाटा एन्ट्रीसाठी प्राप्त झाले असून त्यातील ९७७ अर्ज मंजूर झाले आहेत तर १७८६ अर्ज नामंजूर केले आहेत. ४१० नागरिकांचे कागदपत्रे उपलब्ध नाहीत, तसेच डाटा एन्ट्रीसाठी ऑनलाईन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमध्ये स्प्लिट पर्याय पूर्वीपासून उपलब्ध असल्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. विधानसभा सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले की, इगतपुरी तालुक्यातील ३ हजार १७३ विभक्त कुटुंबातील नागरिकांच्या शिधापत्रिकांचे अर्ज नवीन डाटा एन्ट्रीसाठी ऑनलाईन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमध्ये स्प्लिट पर्याय उपलब्ध करुन देण्याची मागणी समर्थन संस्थेने केली होती. मागणी केलेला स्प्लिट हा पर्याय अगोदरच या ऑनलाईन प्रणालीमध्ये उपलब्ध असल्याचे मंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.
 
 गोरेगावच्या आरे कॉलनीमध्ये सहकार भांडार, युनिट क्र. २ मध्ये अनधिकृतपणे साठा केलेला तांदूळ आणि गहू पोलिसांनी जप्त केला असून ९ जणांना अटक करण्यात आली आहे. या भागात असे प्रकार घडत असल्यास पोलिसांची मदत घेऊन चौकशी करण्यात येईल आणि यातील दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. जालना, कोल्हापूर तसेच मुंबईतील शिधावाटप केंद्रावर धान्याच्या काळ्या बाजाराबाबत विधानसभा सदस्य संतोष दानवे, पराग शाह आदींनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ म्हणाले की, अनधिकृतपणे साठा केलेला ३६ हजार ६५० किलो तांदूळ आणि ४५ हजार किलो गहू आणि या गुन्ह्यातील वाहन गोरेगाव सहकार भांडार युनिट क्र. २ येथून पोलिसांनी जप्त केले आहे. या प्रकरणी आरे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून ९ जणांना अटक केली आहे. संबंधित वाहन मालकावर कारवाई करण्यात आली असल्याचे मंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.
 
 सोलापूर शहरातील शिधावाटप दुकानदारांकडून कमी धान्य देण्यासंदर्भात ९ तक्रारी प्राप्त झाल्या असून १३ दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करुन त्यांच्याकडून ९१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, असे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत सांगितले. विधानसभा सदस्य विजयकुमार देशमुख यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले की, सोलापूर शहरात ३१५ आणि सोलापूर ग्रामीण भागात १५५८ शिधावाटप दुकाने आहेत. सोलापूर शहरातील दुकानांमधून कमी धान्य देण्यासंदर्भात ९ तक्रारी प्राप्त झाल्या असून १३ दुकानदारांवर कारवाई करुन त्यांच्याकडून ९१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. धान्य मिळत नसल्याच्या ४८ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या मात्र आणि प्राधान्य यादीतील कुटुंबांनाच फक्त धान्य दिले जात असल्याने आणि प्राप्त तक्रारी या अप्राधान्य यादीतील होत्या. सोलापूर तालुक्यात धान्य मिळत नसल्याच्या ६८८ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातील ५९० अप्राधान्य यादीत असल्याने त्यांना धान्य मिळाले नाही तर ७५ शिधापत्रिकाधारकांची डाटा एन्ट्री करण्यात आली असून २३ शिधापत्रिकाधारक नियमित धान्य घेत नसल्याच्या तक्रारींमुळे धान्य मिळालेले नाही असे सांगून सर्व्हरमध्ये समस्या उद्भवल्याने ई-पॉस मशीन्स बंद पडले होते असे मंत्री श्री. भुजबळ यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अर्थसंकल्पात अजित पवार यांनी केल्या या १० मोठ्या घोषणा